… तर त्यांनी राज्यातील कोरोना घालवून दाखवावा!
… तर त्यांनी राज्यातील कोरोना घालवून दाखवावा!
खासदार डॉ.सुजय विखेंचा शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊतांना जोरदार टोला
नायक वृत्तसेवा, राहाता
महाविकास आघाडी सरकार केंद्र सरकारकडे बोट दाखवून आपली जबाबदारी टाळणार असेल तर त्यांनी सत्तेवरून पायउतार व्हावे आणि भाजपकडे राज्य सुपूर्द करावे,’ असे आव्हान खासदार डॉ.सुजय विखे यांनी दिले. ‘इतरांना काही कळत नाही आणि सर्वकाही आपल्यालाच कळते असे जर त्यांना वाटत असेल तर त्यांनी राज्यातील कोरोना घालवून दाखवावा,’ अशी टीकाही त्यांनी शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्यावर केली.

राहाता तालुक्यातील लोणी (प्रवरानगर) येथे प्रसार माध्यमांशी खासदार विखे बोलत होते. ‘डॉक्टरांपेक्षा कंपाउंडरलाच जास्त कळते’ असे विधान राऊत यांनी केले होते. त्यांच्यावर डॉक्टरांच्या संघटनांसह सर्वच स्तरातून टीका होत आहे. डॉ.विखे यांनीही राऊत यांच्यावर निशाणा साधला. विखे म्हणाले, ‘माझ्यासह सर्व डॉक्टर आपला जीव धोक्यात घालून कोरोनाच्या संकटात सेवा देत आहेत. अशा परिस्थितीत राऊत यांनी डॉक्टरांच्या संदर्भात केलेले विधान अतिशय आक्षेपार्ह आहे. याबद्दल त्यांनी देशातील डॉक्टरांची माफी मागितलीच पाहिजे. इतरांना काही कळत नाही आणि यांनाच सर्व कळत असेल तर राज्यातील कोरोना त्यांनी घालवून दाखवावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारनेच सर्व काही करावे, अशी अपेक्षा असेल तर जनतेने नाकारल्यानंतरही स्वत:च्या स्वार्थाकरिता तीन पक्षांनी एकत्रित येऊन स्थापन केलेल्याच महाविकास आघाडी सरकारला आमच्या मागण्या मान्य कराव्याच लागतील. राज्यातील महाविकास आघाडी सरकार केवळ केंद्र सरकारकडे बोट दाखवून आपली जबाबदारी टाळणार असेल तर त्यांनी सत्तेवरून पायउतार होवून भाजपाकडे सत्ता सुपूर्त करावी,’ असेही आव्हान डॉ.विखे यांनी दिले.

डॉ.विखे यांनी गेल्या काही काळापासून अहमदनगर जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन करण्याची मागणी लावून धरली आहे. मात्र, त्याची गरज नसल्याचे मंत्री आणि प्रशासन सांगत आहे. आपले ऐकले जात नसेल तर राजीनामा देतो, असा उद्वेगही विखे यांनी व्यक्त केला होता. यासंबंधी विचारले असता ते म्हणाले, ज्यांचे जिल्हे लॉकडाऊन आहेत असे पालकमंत्री आणि आरोग्यमंत्री अहमदनगर जिल्ह्यात येऊन येथे लॉकडाऊची गरज नाही, असे जाहीर वक्तव्ये करतात. आपल्या जिल्ह्यास वेठीस धरण्याचा हा प्रकार आहे. जिल्ह्यात रॅपिड अँटिजेन टेस्ट होत असल्या तरी आर्टिफिशियल टेस्ट केली जात नाही. यावर आमचा आक्षेप कायम असून, जिल्ह्यात झालेल्या मृत्यूंबाबत आपण सविस्तर अहवाल तयार करून लवकरच यावर भाष्य करणार आहोत,’ असेही डॉ.विखे म्हणाले.
