तहसीलदारांचा बनावट शिक्का व सही करुन सोळा लाखांचा अपहार देडगावच्या कोतवालाचा कारनामा; नेवासा पोलिसांत गुन्हा दाखल

नायक वृत्तसेवा, नेवासा
तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीची रक्कम 16 लाख 14 हजार रुपये बेकायदेशीररित्या स्वतःच्या खात्यात वळविल्याप्रकरणी नेवाशाचे तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्या फिर्यादीवरून देडगावच्या कोतवालाविरुद्ध पोसिलांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

योजनेच्या अनुषंगाने तहसील कार्यालयांतर्गत वेगवेगळ्या सजा व गावचे तलाठी हे नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, टंचाईच्या अनुषंगाने नुकसानग्रस्त शेतकर्यांचे पंचनामे करून त्यानुसार यादी सादर करीत असतात. सदर प्राप्त यादीच्या अनुषंगाने संबंधित कामकाज पाहणारे महसूल सहायक व अव्वल कारकून हे दोघेजण यादीत नमूद केल्यानुसार शेतकरीनिहाय, बँकनिहाय धनादेश तयार करून सदर धनादेशाचे संबंधित खातेदारांच्या बँक खात्यात रक्कम वर्ग करण्याकामी सदरचे धनादेश बँकेत जमा करण्याकरीता संबंधित गावचे तलाठी व कोतवाल यांच्याकडे दिले जातात.

त्यानुसार देडगाव या गावातील लाभार्थी शेतकर्यांचे धनादेश राजेंद्र दगडू वाघमारे, महसूल सहायक यांनी देडगावचे कोतवाल अविनाश हिवाळे यांना बोलावून हे धनादेश बँकेत जमा करण्याबाबत आदेश दिले होते. त्यावरून संबंधित कोतवाल अविनाश हिवाळे यांनी देडगाव गावचे धनादेश बँकेत जमा करण्याकामी ताब्यात घेतले होते. तसेच काही धनादेश कोतवाल हिवाळे याने जेऊर हैबती येथील कोतवाल राजू इनामदार यास घेऊन येण्याबाबत कळविले व त्यानुसार काही धनादेश हे इनामदारकरवी प्राप्त करुन घेतले. तर काही धनादेश हे स्वतः तहसील कार्यालयात येऊन प्राप्त करण्यात आले. सदर धनादेश संबंधित नुकसानग्रस्त शेतकर्यांना वाटप न करता धनादेशामध्ये परस्पर तहसीलदारांचा बनावट शिक्का वापरुन व बनावट सही करुन तसेच बँकेचे नाव बदलून व रकमेमध्ये खाडाखोड करून बँकेच्या नावे देण्यात आला होता. ही रक्कम तब्बल 16 लाख 14 हजार रुपये इतकी आहे. यावरुन पोलिसांनी कोतवाल हिवाळेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
