‘अताएसो’ संस्थेत पिचड पिता-पुत्रांपैकी कोण राजीनामा देणार? पत्रकार परिषदेमध्ये विनय सावंत यांचे खुले आव्हान; पिचड पिता-पुत्रांच्या निर्णयाकडे लक्ष
नायक वृत्तसेवा, अकोले
माजी आमदार वैभव पिचड यांनी दोन दिवसांपूर्वी अकोले महाविद्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत विनय सावंत यांच्या संस्थेतील कुटुंबाबद्दल केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर म्हणून आपल्या वडिलांचा संस्थेच्या सचिव व सदस्य पदाचा राजीनामा सादर केला आणि आता अकोले तालुका शिक्षण संस्थेत पिचड पिता-पुत्रांपैकी कोण राजीनामा देणार असे खुले आव्हान दिले.
बुधवारी (ता.11) शासकीय विश्रामगृहावर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये विनय सावंत बोलत होते. यावेळी कॉ. डॉ. अजित नवले, डॉ. संदीप कडलग, चंद्रकांत सरोदे, सुरेश खांडगे, सुरेश नवले, शांताराम संगारे, राजेंद्र कुमकर, श्री मौनगिरी सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष धुळा खाडे व उपाध्यक्ष सदाशिव खाडे आदी उपस्थित होते.
तालुक्यातील श्री संत सद्गुरू मौनगिरी महाराज सेवा संघ राजूर हे मंडळ धर्मादाय आयुक्तांकडून 20 जून, 1986 रोजी स्थापन केले. या मंडळाने राजूर येथे पहिले इंग्लिश मीडियम स्कूल व जहागिरदारवाडी, पेंडशेत येथे माध्यमिक विद्यालय सुरू केले. या संस्थेचे भरत बाळासाहेब सावंत (वय 88) हे सेवानिवृत्त प्राचार्य संस्थापक सचिव आहेत. ‘अताएसो’ कायम विश्वस्त व माजी आमदार वैभव पिचड यांनी मंगळवारी ‘अताएसो’वरच्या पत्रकार परिषदेतील आव्हानास प्रतिसाद देऊन बुधवारी आपल्या संस्था सचिव व सदस्य पदाचा राजीनामा संस्थेच्या घटनेनुसार अध्यक्षांकडे दिला. भरत सावंत यांच्या स्वाक्षरीत हा राजीनामा विनय सावंत यांनी पत्रकार परिषदेत सादर केला व म्हणाले, आता माजी आमदार वैभव पिचड यांनी दिलेल्या आव्हानाला कृतिशीलतेची जोड देत दिलेला शब्द पाळण्याची वेळ आली आहे. पिचड त्यांचा शब्द पाळतील व आदर्शाचा नव्याने पायंडा घालून देतील असे सांगितले. त्यांनी किंवा पिताश्री मधुकर पिचड यांनी आता अताएसो विश्वस्त व संस्था सदस्यत्वाचा तत्काळ राजीनामा देऊन आता अताएसो शुद्धीकरण करण्यास सुरुवात करावी असे प्रतिआव्हान दिले.
यावेळी कॉम्रेड डॉ. अजित नवले म्हणाले, हे आंदोलन अताएसो सार्वजनिक मालकीची होती व यापुढे ती तशीच राहावी कोणाची खाजगी मालमत्ता होऊ नये म्हणून सुरू आहे. पण माजी आमदार वैभव पिचड यांनी सार्वजनिक शैक्षणिक संस्थेची तुलना छोट्या खेडेगावातील मंडळाच्या संस्थेशी करून चुकीचा पायंडा पाडला आहे. तरी देखील सावंत यांनी सचिव व सदस्य पदाचा राजीनामा देऊन पिचड पिता-पुत्रांना समोर आदर्श निर्माण केला आहे. आता पिचड पिता-पुत्रांनी सावंत यांनी दिलेल्या आदर्शास योग्य प्रतिसाद द्यावा असे यावेळी सांगितले.