ग्रामसेवकावर उपसरपंचाचा हल्ला तर ग्रामसेवकाकडून महिलेचा विनयभंग! सारोळे पठार ग्रामपंचायत आली चर्चेत; ‘अजब’ घटनांनी पठारभागात रंगले चर्चेचे फड..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
पूर्वग्रह मनात ठेवून ग्रामपंचायत कार्यालयात कर्तव्य बजावणार्या ग्रामसेवकाला शिवीगाळ व धक्काबुक्की करुन त्याचा हात पिरगळला व सरकारी कागदपत्रे फाडली अशा आशयाच्या तक्रारीवरुन उपसरपंचावर. तर मंजूर असलेल्या घरकुलाचे काम करुन देण्यासाठी 15 हजारांची लाच घेवूनही काम केले नाही, विचारणा केली असता वारंवार शरीरसुखाची मागणी करीत विनयभंग केला अशा आशयाच्या फिर्यादीवरुन चक्क त्याच ग्रामसेवकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल होण्याची अजब घटना तालुक्यातील सारोळे पठार ग्रामपंचायत कार्यालयात घडली. या दोन्ही घटना एकाच दिवशी घडल्याने संपूर्ण पठारभागात त्यावरुन चर्चेचे फड रंगले आहेत. विशेष म्हणजे यातील आरोपी उपसरपंचावर यापूर्वी अपहाराचा गुन्हा दाखल असून तो सध्या जामिनावर बाहेर आहे.

यातील पहिली तक्रार वरुडी पठारचे ग्रामसेवक अजीत वसंत घुले यांनी घारगाव पोलिसांकडे दाखल केली आहे. त्यानुसार गुरुवारी (ता.30) सकाळी 11 वाजता सारोळे पठार ग्रामपंचायतीची मीटिंग होती. त्यामुळे ते सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास ग्रामपंचायत कार्यालयात आले होते. यावेळी त्यांच्यासोबत कार्यालयातील मदतनीस महिलाही होती. मीटिंगच्या अनुषंगाने ग्रामसेवक घुले हे काही अहवाल तयार करीत असतानाच उपसरपंच प्रशांत गवराम फटांगरे तेथे आले व त्यांनी उद्घाटन व टॅब खरेदीबाबत त्यांच्याकडे विचारणा केली. त्यानुसार त्यांनी आवश्यक असलेली माहिती त्यांना दिली व बाकीची चर्चा मीटिंगमध्ये करण्याची सूचना त्यांना केली.

यावेळी उपसरपंच फटांगरे यांनी ग्रामसेवकाकडे पाहून सारोळे पठारच्या महिला सरपंचांविषयी अपशब्द काढण्यास सुरुवात केली असता ग्रामसेवक घुले यांनी त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांना राग येवून त्यांनी ग्रामसेवकासोबतच शाब्दिक वादावादी करण्यास सुरुवात केली व आपल्या मोबाईलमधून या सर्व घटनाक्रमाचे चित्रणही करण्यास सुरुवात केली. त्यामुळे ग्रामसेवकानेही आपल्या मोबाईलमध्ये हा वाद चित्रीत करण्यास सुरुवात केली. त्याचा राग येवून त्या उपसरपंचाने ग्रामसेवकाच्या हातातील टँकरचे प्रस्ताव हिसकावून घेत काही फाडले तर काहींचा चुरगळा केला व ग्रामसेवकाचा हात पकडून तो पिरगळला. यावेळी त्याने ग्रामसेवकाची कॉलर पकडून त्यांच्याशी बाचाबाची करीत सरकारी कामात व्यत्यही आणला.

याच फिर्यादीत सदरच्या उपसरपंचाने आपल्यावर अनेकदा त्याच्या काळातील नोंदी ओढण्यासाठी दबाव आणल्याचे व त्यांनी ग्रामपंचायतीत मोठा अपहार केल्याचेही म्हंटले आहे. सदरची तक्रार गुरुवारी (ता.30) सायंकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास घारगाव पोलिसांकडे दाखल झाली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी उपसरपंच प्रशांत गवराम फटांगरे याच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी कलम 353 सह 332 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक एस. एस. सातपुते यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

तर याच ग्रामपंचायत कार्यालयात नेमके याच घटनेच्या कालावधीत दुसरी एक धक्कादायक घटना घडल्याचा प्रकारही रात्री साडेदहाच्या सुमारास दाखल झालेल्या तक्रारीतून समोर आला. सारोळे पठारमध्ये राहणार्या एका 36 वर्षीय विवाहितेने याबाबत चक्क आधीच्या प्रकरणात फिर्यादी असलेल्या ग्रामसेवक अजीत वसंत घुले याच्यावर अत्यंत गंभीर आरोप केला आहे. सदर महिलेला घरकुल मंजूर झालेले आहे, महिन्यापूर्वी त्या महिलेने ग्रामपंचायत कार्यालयात जावून आपले नाव पाहिले असता यादीत त्यांचे नाव तिसर्या क्रमांकावर होते. मात्र त्यानंतर महिना उलटूनही कोणतीही कारवाई न झाल्याने त्यांनी पुन्हा यादी तपासली असता त्यांचे नाव तिसर्या क्रमांकावरुन शेवटच्या क्रमांकावर गेले.

याबाबत ग्रामसेवक अजीत घुले याच्याकडे चौकशी केली असता त्याने 15 हजारांची मागणी केली, त्यानुसार पीडितेने त्याला तेवढी रक्कम दिल्याचेही फिर्यादीत म्हंटले आहे. मात्र त्यानंतरही कोणतीही कारवाई होत नसल्याने पीडित महिला गुरुवारी (ता.30) सकाळी 10 ते 11 वाजण्याच्या सुमारास पुन्हा ग्रामपंचायत कार्यालयात गेली व तिने घरकुलाबाबत विचारणा केली. आपणास राहण्यासाठी घर नाही, वरती तुमच्या मागणीप्रमाणे 15 हजार रुपये देखील दिले असे असतानाही घरकुल का मिळत नाही असा सवाल त्यांनी केला. त्यावर त्या ग्रामसेवकाने पीडितेकडे शरीरसुखाची मागणी केली, त्याला नकार दिला असता त्याने पीडितेचा हात धरुन जवळ ओढळे व महिलेस लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.

या प्रकाराने घाबरलेल्या पीडितेने सुरुवातीला स्वतःच आपली सुटका करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात अपयश आल्यानंतर तिने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्या ग्रामसेवकाने पीडितेचा हात सोडला व कार्यालयाबाहेर जाताजाता पीडितेला लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत तुला मी सोडणार नाही अशा आशयाचा दमही भरला. या घटनेनंतर रात्री उशिराने संबंधित पीडितेने घारगाव पोलिसांकडे जावून सारोळे पठारचा ग्रामसेवक अजीत वसंत घुले याच्या विरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी त्याच्या विरोधात भारतीय दंडसंहितेचे कलम 354 (अ), 323, 504 प्रमाणे गुन्हा दाखल करुन पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल ए. आर. गा हीींिं://श.रार.क्षा/ंधले यांच्याकडे सोविला आहे. एकाच दिवशी, एकाच ठिकाणी घडलेल्या या दोन वेगवेगळ्या घटनांमुळे पठारभागात चर्चेला उधाण आले आहे.

या दोन्ही घटनांच्या केंद्रस्थानी सारोळे ग्रामपंचायत कार्यालय आहे. ग्रामसेवकाने आपल्या फिर्यादीत सकाळी 11 वाजता कार्यालयात बैठक असल्याचे नमूद केले आहे. साडेदहाच्या सुमारास त्याचा वाद उपसरपंचासोबत सुरू होता असेही या तक्रारीत म्हंटले आहे, तर सकाळी 10 ते 11 या दरम्यान आपण ग्रामपंचायत कार्यालयात गेलो असता त्या ग्रमसेवकाने आपला विनयभंग केल्याची तक्रार पीडित महिलेने केली आहे. मीटिंग सुरु होण्याचा आणि दोन्ही घटना घडण्याचा कालावधी एक तासाचा आहे. त्यामुळे यातील कोणता प्रकार खरा आणि कोणता खोटा याची उकल होण्याची गरज आहे. सदरच्या ग्रामसेवकाने संबंधित उपसरपंचासोबत अनेकवेळा वाद झाल्याचेही म्हंटले आहे, त्यामुळे त्याने दाखल केलेली तक्रार पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी तर नाही ना? अशीही चर्चा सध्या पठारभागात सुरू आहे.

