बाळेश्वर डोंगरावर साजरा झाला जागतिक पर्वत दिन अहमदनगर गिर्यारोहण संघटना; पर्वताचे पूजन करुन महिलांविषयी कृतज्ञता

नायक वृत्तसेवा, संगमनेर
डोंगर, टेकड्या व तेथील परिसंस्थांची जपवणूक व्हावी, त्यासाठी मानवामध्ये जागृकता निर्माण व्हावी, पर्वतांप्रती मानवी समाजामध्ये कृतज्ञतेचा भाव निर्माण व्हावा यासाठी दरवर्षी जागतिक पातळीवर 11 डिसेंबर हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय पर्वत दिन’ म्हणून साजरा केला जातो. अहमदनगर जिल्हा गिर्यारोहण संघटनेकडूनही या दिवसाचे औचित्य साधून तालुक्यातील पठारभागातील बाळेश्वराच्या डोंगरावर हा दिवस उत्साहाने साजरा करण्यात आला. ‘वूमेन्स मूव्ह माऊंटेन’ असे घोषवाक्य घेवून साजर्या झालेल्या या कार्यक्रमात सुनीता मालपाणी व किरण झंवर या दोन महिला संगमनेरातून सायकलवरुन येवून सहभागी झाल्या होत्या.

मानवी जीवन सुखकारक होण्यासाठी निसर्गाने आपल्याला भरभरुन दिले आहे. त्यात पर्वतांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. पर्वतांच्या याच दातृत्त्वाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी 11 डिसेंबर रोजी जागतिक पातळीवर हा दिवस साजरा केला जातो. डोंगर वाचवण्यात, त्यावरील साधनसंपदा वाचवण्यात महिलांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी या उत्सवासाठी ‘वूमेन्स मूव्ह माऊंटेन’ असे घोषवाक्य ठरविण्यात आले होते.

महिलांनी पर्वत व डोंगर यांच्या संरक्षण व संवर्धनात मोलाचे योगदान दिले आहे. डोंगरातल्या संसाधनांचा काटकसरीने केलेला वापर आणि तेथील आर्थिक व सामाजिक विकास साधण्यात त्यांचे इपार कष्ट आहेत. डोंगरावरील व त्याच्या पायथ्याशी असलेल्या लोकवस्त्या टिकून राहण्यातही महिलांचे योगदान मोठे आहे. त्यांच्यामुळेच आजही डोंगर राबते असून अनागोंदी आणि अविचारी विकासापासून बचावले आहेत. महिलांनी पेललेल्या या जबाबदारीची जाणीव म्हणून यावर्षीचा उत्सव त्यांना समर्पित करण्यात आला.
या दिनानिमित्ताने अहमदनगर जिल्हा गिर्यारोहण संघटनेकडून बाळेश्वराच्या डोंगराचे पूजन करण्यात आले. संगमनेरहून बाळेश्वरला सायकलवरुन पोहोचलेल्या सुनीता मालपाणी व किरण झंवर या महिलांचे संघटनेकडून विशेष स्वागत करुन पर्वत वाचविण्यात प्रमुख भूमिका बजावणार्या महिलांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. याप्रसंगी ज्येष्ठ गिर्यारोहक भरत रुपवाल, श्रीकांत कासट, प्रा. जयसिंग सहाणे, गोविंद झंवर, शरयू झंवर, ऋतुजा नावंदर आदी उपस्थित होते.
