डॉक्टरांच्या क्रेडिट कार्डमधून परस्पर 74 हजार रुपये काढले सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह माहिती-तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल

नायक वृत्तसेवा, शेवगाव
डॉक्टरांच्या क्रेडिट कार्डमधून परस्पर 74 हजार 250 रुपये काढण्यात आले. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणूक आणि माहिती-तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेवगाव येथील डॉ. मयूर सोनाजी लांडे (वय 34, रा. लांडेगल्ली, शेवगाव) हे 28 डिसेंबर, 2021 रोजी वैजापूर येथून भाऊ मनोज यांच्यासमवेत रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास शेवगावकडे कारने येत होते. डॉ. लांडे यांच्याकडे भारतीय स्टेट बँकेचे क्रेडिट कार्ड होते. या कार्डमधून 14 हजार 850 रुपये कपात झाल्याचा त्यांच्या मोबाइलवर मेसेज आला. त्यानंतर सलग अशा स्वरुपाचे पाच मेसेज येऊन खात्यातून 74 हजार 250 रुपये कपात झाले. त्यांनी या मेसेजचे मोबाइलवर स्क्रीनशॉट काढून घेतले. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

बँकेच्या ग्राहक सेवा केंद्राशी क्रेडिट कार्डमधून पैसे कपात झाल्याची तक्रार केली होती. त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यामुळे त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सायबर पोलिसांनी फसवणूक आणि माहिती-तंत्रज्ञान कायदा 66 (डी) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले आणि उपनिरीक्षक प्रतीक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार योगेश गोसावी पुढील तपास करीत आहेत.

Visits: 74 Today: 2 Total: 1100531

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *