वनकुटे घाट ते ब्राम्हणवाडा रस्त्याची दयनीय अवस्था एसटी बसही बंद झाल्याने ग्रामस्थांनी व्यक्त केला संताप
नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्यातील वनकुटे घाट ते ब्राम्हणवाडा या डांबरी रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्याचे काम व्हावे म्हणून वारंवार मागणी करूनही काम होत नसल्याने गेल्या काही महिन्यांपासून एसटी बसही बंद झाल्याने ग्रामस्थ आता आंदोलनाच्या पावित्र्यात आहे.
ब्राम्हणवाडा ते वनकुटे, कोठे बुद्रुक, बोरबन व घारगाव हा डांबरी रस्ता दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा म्हणून ओळखला जात आहे. मात्र पावसामुळे हा डांबरी रस्ता मोठ्या प्रमाणात खराब झाला आहे. ठिकठिकाणी खडीही निघाली असून खड्डेही पडले आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करताना छोट्या-मोठ्या वाहनांसह शालेय विद्यार्थ्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्याचबरोबर पूर्वी संगमनेर ते कल्याण ही एसटी बस वनकुटे मार्गे जात होती. मात्र रस्ता खराब असल्याने बसही गेल्या अनेक महिन्यांपासून बंद झाली आहे.
परिणामी, दळणवळणाची सुविधा नसल्याने नागरिकांचे मोठे हाल होत आहे. पावसामुळे खराब झालेल्या डांबरी रस्त्याचे काम व्हावे म्हणून ग्रामस्थांनी अनेकवेळा मागणी करून लोकप्रतिनिधींची भेटही घेतली आहे. परंतु, ग्रामस्थांना केवळ आश्वासनेच मिळाली आहेत. त्यामुळे वनकुटेचे उपसरपंच सीताराम हांडे, भीमा पाबळे, सामाजिक कार्यकर्ते अशोक हांडे, सुरेश हांडे, दत्तात्रय हांडे, भाऊसाहेब पवार, शांताराम औटी, संदीप हांडे, राजकुमार हांडे आदिंनी संताप व्यक्त केला असून जर लवकर या रस्त्याचे काम सुरू झाले नाहीतर आम्ही तीव्र स्वरुपाचे आंदोलन करणार आहोत, असा इशारा दिला आहे.