दोन वर्षांनंतर साजर्या झालेल्या रंगोत्सवात तरुणाईचा अलोट उत्साह! कोरड्या रंगांचा वापर वाढला; मात्र पारंपरिक कढायांची संख्या घटली

नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोविड संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षांपासून सार्वजनिक पातळीवर सण-उत्सव साजरे करण्यास निर्बंध घालण्यात आले होते. आजच्या स्थितीत देशासह राज्यातील संक्रमित रुग्णांची संख्या नगण्य असली तरीही शासनाकडून देण्यात आलेल्या सण-उत्सवांबाबतच्या निर्देशांमध्ये स्पष्टता नाही. त्यामुळे खुद्द यंत्रणाच गोंधळात असताना मंगळवारी साजर्या झालेल्या रंगोत्सवात तरुणाईच्या अलोट उत्साहाचेच दर्शन घडले. अर्थात शहरात पारंपरिक पद्धतीने चौकाचौकात लावल्या जाणार्या रंगांच्या कढायांची संख्या घटल्याचे चित्रही दिसून आले, मात्र तरुणांच्या उत्साहावर त्याचा कोणताही परिणाम झाला नाही.

मार्च 2020 मध्ये देशात शिरलेल्या कोविड संक्रमणाने नागरीकांना आपले दैनंदिन जीवन बदलण्यास भाग पाडले आहे. पहिल्या, दुसर्या आणि तिसर्या संक्रमणाचे एकामागून एक धक्के सहन करणार्या भारतीय नागरीकांनी कोविड संक्रमणाच्या गेल्या दोन वर्षात केंद्र व राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या सर्वच सूचनांचे पालन केल्याचेही दिसून आले. मात्र तिसर्या संक्रमणानंतर म्हणजेच तब्बल दोन वर्षांनंतर देशासह राज्यातील कोविडची स्थिती पूर्णतः नियंत्रणात आल्याने व मागील मोठ्या कालावधीत विविध उत्सवांवरील निर्बंधांमुळे यावर्षीच्या सर्वच उत्सवांमध्ये तरुणांसह नागरीकांचाही उत्साह शिखरावर असल्याने यावर्षभरात येणारे सर्वच सण-उत्सव धूमधडाक्यात साजरे होतील असा अंदाज होताच.

त्या पार्श्वभूमीवर राज्यात (मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र व कोकण) सर्वत्र होळीच्या दुसर्या दिवशी साजर्या होणार्या धूलिवंदनानिमित्त सरकारने नव्याने निर्बंध लागू केले होते. मात्र त्या विरोधात सूर निघू लागल्याने शासनाने आधी जाहीर झालेल्या निर्बंधांमध्ये काही सुधारणा करीत पुन्हा नव्याने मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. मात्र या आदेशात धूलिवंदन (रंगपंचमी) सारखे उत्सव कसे साजरे करावेत याबाबत स्पष्टता नसल्याने यंत्रणेचाच गोंधळ उडाल्याची स्थिती होती. त्यामुळे पोलिसांनी रंगपंचमीची परवानगी मागणार्यांचे अर्जही स्वीकारण्यास नकार दिला, त्यामुळे या गोंधळात आणखी भर पडल्याने त्याचा परिणाम शहरातील पारंपरिक कढायांमध्ये घट होण्यात झाला.
![]()
एकीकडे कढायांची संख्या कमी झाली असली तरीही त्यामुळे तब्बल दोन वर्षांनंतर साजर्या होणार्या रंगपंचमीच्या उत्साहावर मात्र त्याचा कोणताही परिणाम झाला नाही. मंगळवारी सकाळपासूनच तरुण-तरुणींसह लहान मुले विविध रंगांची उधळण करीत शहराच्या गल्लीबोळात आनंद साजरा करीत असल्याचे दिसून आले. अनेकांनी आपल्या समुहासह गंगामाई, प्रवरा परिसर, खांडगाव, कपारेश्वर, रामेश्वर, बाळेश्वर, कर्हे घाटातील संकटमोचन मारुती मंदिर अशा वेगवेळ्या ठिकाणी जावून रंगपंचमीचा आनंद लुटला. या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी शहरात सर्वत्र चोख बंदोबस्तासह शहरातील गस्तही वाढवली होती. त्यामुळे अलोट उत्साहाच्या रंगपंचमीला शहरात कोठेही अनुचित प्रकार घडल्याचे कोणतेही वृत्त नाही.
