तालुक्याच्या रुग्णसंख्येत आजही पडली 20 बाधितांची भर!
दररोजच्या रुग्णवाढीने संक्रमितांची संख्या चौदाव्या शतकाच्या उंबरठ्यावर!!
नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या वाढण्याची शृंखला कायम आहे. तालुक्याच्या रुग्णसंख्येत आजही वीस रुग्णांची भर पडली आहे. आज खासगी प्रयोगशाळा व रॅपिड चाचणीतून शहर व तालुक्यातील संक्रमितांमध्ये वाढ झाली असून रुग्णसंख्या 1 हजार 373 वर जाऊन पोहोचली आहे. आजचा अहवालातून शहरातील 11 तर तालुक्यातील नऊ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
गेल्या पंधरवड्यापासून दररोज सायंकाळी मोठ्या रुग्ण संख्येचा धक्का देणाऱ्या कोविडच्या विषाणूंनी मध्यंतरीच्या काळात आपली तीव्रता काही प्रमाणात कमी केल्याने दररोज सापडणाऱ्या रुग्ण संख्येत घट झाली होती. मात्र गेल्या तीन ते चार दिवसांपासून कोविडच्या विषाणूंचे संक्रमण पुन्हा वाढू लागल्याने तालुक्याच्या रूग्ण संख्येत जलद गतीने वाढ होत आहे. त्यामुळे दोनच दिवसांपूर्वी बाधितांचे तेरावे शतक ओलांडणाऱ्या संगमनेर तालुक्याची रुग्णसंख्या आज चौदाव्या शतकाच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे.
आज सायंकाळी 20 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यातील 3 अहवाल खासगी प्रयोगशाळेचे तर उर्वरित सतरा जणांचे अहवाल रॅपिड अँटीजेन चाचणीतून समोर आले आहेत. खासगी प्रयोगशाळेच्या अहवालातून शहरातील रंगारगल्ली येथील 35 वर्षीय तरुण, बडोदा बँक कॉलनीतील 35 वर्षीय महिला व रायतेवाडी येथील चाळीस वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव आला आहे.
यासोबतच रॅपिड अँटीजेन चाचणीतून गुंजाळवाडी शिवारातील गोल्डन सिटी परिसरातून 45 वर्षीय व वीस वर्षीय तरुण तसेच 45 वर्षीय व 18 वर्षीय महिला, साळीवाडा परिसरातील 55 वर्षीय महिला, गुंजाळवाडी शिवारातील कृष्णानगर वसाहतीतून 49 वर्षीय पुरुष, घुलेवाडी परिसरातील 54 वर्षीय व 57 वर्षीय महिला, शहरातील साळीवाडा परिसरातील 70 वर्षीय व 55 वर्षीय महिलेसह 47 वर्षीय इसम,
खंडोबा गल्ली परिसरातून 58 वर्षीय इसमासह 52 वर्षीय महिला व 14 वर्षीय मुलगी, मालदाड रोड परिसरातून 22 वर्षीय तरुण, नांदुरी दुमाला येथून 45 वर्षीय तरुण, घासबाजारातील 64 वर्षीय महिला, तर उपासणी गल्ली परिसरातील 74 वर्षीय महिलेला संक्रमण झाले आहे. तालुक्याच्या रूग्ण संख्येत आजही वीस रुग्णांची भर पडल्याने बाधितांची संख्या चौदाव्या शतकाच्या उंबरठ्यावर 1 हजार 373 वर जाऊन पोहोचली आहे.
दिलासादायक बातमी…
जिल्ह्यातील रुग्ण संख्येत दररोज भर पडत असली तरीही जिल्ह्यातील विविध कोविड केअर हेल्थ सेंटर मधून उपचार पूर्ण करून घरी परतणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही मोठी वाढ होत आहे. काल प्रमाणे आजही जिल्ह्यातील विविध कोविड केअर हेल्थ सेंटरसह विविध रुग्णालयातून तब्बल ४२४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला…
आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांमध्ये अहमदनगर महानगरपालिका क्षेत्रातून १९७, संगमनेर २९, राहाता ९, पाथर्डी ८, नगर ग्रामीण ३७, श्रीरामपूर १२, अहमदनगरचे लष्करी केंद्र १४, नेवासा १३, श्रीगोंदा १९, पारनेर ३०, राहुरी ७, शेवगाव १२, कोपरगाव १७, जामखेड २ व कर्जतमधील १८ रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या १३ हजार ४७८ झाली आहे.
- जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या : १३ हजार ४७८
- जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७८.९४ टक्के
- उपचार सुरु असलेले रूग्ण : ३ हजार ३६५
- जिल्ह्यातील एकूण मृत्यू : २३१
- जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या : १७ हजार ७४