राहुरी कारागृहातील 31 बंदीवानांना कोरोनाची लागण

राहुरी कारागृहातील 31 बंदीवानांना कोरोनाची लागण
पाच महिला बंदीवानांचा समावेश; कोठड्यांनी घेतला मोकळा श्वास
नायक वृत्तसेवा, राहुरी
राहुरीच्या कारागृहात अखेर कोरोनाचा बॉम्ब फुटला आहे. मंगळवारी (ता.15) तब्बल 31 बंदीवान कोरोनाबाधित आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. यामध्ये पाच महिला बंदीवानांचा समावेश आहे. आता, राहुरीच्या कारागृहात एक महिला व 13 पुरुष असे अवघे 14 बंदीवान कोरोना निगेटिव्ह राहिले आहेत. त्यामुळे पहिल्यांदाच कारागृहातील कोठड्यांनी मोकळा श्वास घेतला आहे.


दरम्यान, बुधवारी (ता.16) दुपारपर्यंत 26 बंदीवानांना अहमदनगर येथील जिल्हा कारागृहाच्या कोविड केअर सेंटरमध्ये हलविण्यात आले. पाच महिला कैद्यांना दुपारपर्यंत हलविले नव्हते. राहुरीचे पोलीस निरीक्षक मुकूंद देशमुख यांचा हटवादीपणा कारागृहातील बंदीवानांना भोवणार असल्याची चर्चा आहे. आरोपींना अटक करताना कोरोना तपासणीचा अहवाल प्राप्त होण्यापूर्वी त्यांना इतर बंदीवानांच्या बरोबर कोठडीत टाकण्याचा अट्टाहास इतरांच्या जीविताला धोकेदायक ठरणार आहे. परंतु, शिस्तीच्या अधिकार्‍यांनी अखेर बेशिस्तीचे दर्शन घडविल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.


याबाबत आवश्यक ती खबरदारी घेतली असती तर, चार भिंतीच्या कडेकोट बंदोबस्तात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झालाच नसता. वेळच्या वेळी कोठड्या निर्जंतुकीकरण करणे, न्यायालयात व दवाखान्यात हलविण्यात येणार्‍या बंदीवानांना सुरक्षित अंतर ठेवण्यास सांगून वारंवर सॅनिटायझरचा वापर करण्यास सांगणे, आजारी बंदीवानांचे विलगीकरण करणे, बंदीवान व कारागृहाचे सुरक्षा पोलीस कोरोनाबाधित होऊ नयेत; यासाठी उपाययोजना करणे गरजेचे होते. परंतु, तसे घडलेच नाही. पंधरा दिवसांपूर्वी अटक केलेल्या दोन आरोपींना कोरोना अहवाल येण्यापूर्वी कोठडीत टाकले होते. पैकी, एक आरोपी कोरोना पॉझिटिव्ह आढळला. त्याचवेळी कारागृहात कोरोना संक्रमण होऊन लवकरच कोरोना बॉम्ब फुटणार याचे सूतोवाच करण्यात आले होते. सोमवारी (ता.14) रात्री आजारी पाच बंदीवानांचा कोरोना तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे, मंगळवारी (ता.15) कारागृहातील उर्वरित 45 बंदीवानांची कोरोना तपासणी करण्यात आली. पैकी 31 कैदी कोरोना पॉझिटिव्ह आढळले.

Visits: 46 Today: 1 Total: 432569

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *