राहाता तालुक्यातील जिरायत भागाचे स्वतंत्र महसूल मंडळ होणार?
राहाता तालुक्यातील जिरायत भागाचे स्वतंत्र महसूल मंडळ होणार?
नायक वृत्तसेवा, राहाता
तालुक्यातील जिरायत भागाचे स्वतंत्र महसूल मंडळ तयार करावे; याबाबत राहाता तालुका काँग्रेसच्या मागणीची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली आहे. महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव नितीन करीर यांना पुढील कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे राहाता तालुक्यातील जिरायत भागाचे स्वतंत्र महसूल मंडळाचे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राहाता तालुक्यात बारा जिरायती गावे आहेत. त्यामध्ये पिंपरी निर्मळ, केलवड खुर्द, केलवड बुद्रूक, लोणी खुर्द, आडगाव खुर्द, आडगाव बुद्रूक, खडकेवाके, गोगलगाव, कोर्हाळे, वाळकी, डोर्हाळे, पिपंरी लोकाई या भौगोलिक सलगता असलेल्या जिरायती गावांचा समावेश आहे. स्वतंत्र महसूल मंडळ नसल्याने बागायत गावांच्या पंक्तीत ही जिरायत गावे भरडली जात आहेत. पीक विम्यांचे परतावे, टंचाई अनुदान, कृषी विभागाच्या कोरडवाहू भागासाठी असलेल्या विविध योजना मिळण्यास या गावांवर वर्षानुवर्षे अन्याय होत असल्याने राहाता तालुका काँग्रेस समितीने डॉ.एकनाथ गोंदकर यांच्या नेतृत्वाखाली तालुकाध्यक्ष रावसाहेब बोठे, सचिव श्रीकांत मापारी, युवक तालुकाध्यक्ष राजेंद्र निर्मळ यांनी सरकारकडे या महसूल मंडळाच्या फेररचनेसाठी मागणी केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दखल घेत महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव नितीन करीर यांना कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. स्वतः मुख्यमंत्र्यांनीच लक्ष घातल्यामुळे तालुक्यातील जिरायत भागाचे स्वंतत्र महसूल मंडळ होण्याचे स्वप्न पूर्ण होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.