जीवन शिक्षण संपादन मंडळावर वाकचौरे यांची निवड
जीवन शिक्षण संपादन मंडळावर वाकचौरे यांची निवड
नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्य शासनाच्या प्राथमिक शिक्षणाचे मुखपत्र असलेल्या जीवन शिक्षण मासिकासाठी संपादन मंडळात संदीप वाकचौरे यांची निवड करण्यात आली आहे. नियुक्तीचे पत्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे संचालक दिनकर पाटील यांनी दिले आहे.
राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्यावतीने गेल्या 150 वर्षांपासून हे मासिक प्रकाशित करण्यात येत आहे. राज्यातील प्राथमिक शिक्षणातील बदल व शिक्षकांना अध्ययन-अध्यापनाच्या प्रक्रियेत मदत करण्याच्या दृष्टीने मासिक प्रकाशित होते. या मासिकाच्या संपादक मंडळावर संदीप वाकचौरे यांची निवड झाली आहे. वाकचौरे हे गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षण विषयावरती राज्यातील विविध नियतकालिकामध्ये सातत्यपूर्ण लेखन करत आहेत. त्यांची शिक्षणासंबंधी तीन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. राज्य अभ्यासक्रम समिती, बालभारती, तसेच शालाबाह्य मुलांचा अभ्यासक्रम निर्मिती सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन, शासन राज्य स्तरावरील अनेक प्रशिक्षणात साहित्यनिर्मितीत तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून त्यांचा सहभाग राहिला आहे. वाकचौरे यांच्या निवडीबद्दल संचालक दिनकर पाटील, सहसंचालक दिनकर टेमकर, किरण धांडे, प्राचार्य अचला जडे, ज्येष्ठ अधिव्याख्याता दगडू सूर्यवंशी, शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे, अरुण धामणे आदिंसह अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.