केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्याचे संगमनेरातही पडसाद संतप्त शिवसैनिकांनी बसस्थानकावरील शौचालयाला दिले राणेंचे नाव
नायक वृत्तसेवा, संगमनेर
मोठ्या प्रतिक्षेनंतर केंद्रीय मंत्रीमंडळात वर्णी लागलेले व सध्या जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने राज्याच्या दौर्यावर असलेले केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग खात्याचे मंत्री नारायण राणे पुन्हा एकदाअडचणीत आले आहेत. सोमवारी महाड येथील पत्रकार परिषदेत बोलतांना त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करीत अत्यंत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्याचे पडसाद आता राज्यभर उमटू लागले असून ठिकठिकाणी त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यासह निषेध आंदोलनेही सुरु झाली आहेत. संगमनेरातील शिवसैनिकांनीही आज सकाळी बसस्थानकाजवळ जोरदार निदर्शने करीत घोषणाबाजी केली. यावेळी संतप्त शिवसैनिकांनी बसस्थानकातील शौचालयास ‘नारायण राणे’ यांचे नाव देत आपला संताप व्यक्त केला.
मोठ्या प्रतीक्षेनंतर केंद्रीय मंत्री मंडळात वर्णी लागलेले नारायण राणे सध्या जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने राज्याच्या दौर्यावर आहेत. या दरम्यान त्यांनी शिवसेनेसह पक्षप्रमुखांवर टिका करण्याची एकही संधी सोडली नसून वारंवार शिवसैनिकांना डिवचूनही त्यांना प्रत्युत्तर मिळाले नव्हते. मात्र सोमवारी कोकण दौर्यादरम्यान रायगड जिल्ह्यातील महाड येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी देशाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य वर्षाचे निमित्त साधून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करीत अतिशय वादग्रस्त वक्ता केल्याने राज्यात वादाची ठिणगी पडली आहे. त्याचे पडसादही आता राज्यातून उमटू लागले असून ठिकठिकाणी निषेधाचे कार्यक्रम होवू लागले आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात फौजदारी तक्रारीही दाखल झाल्या असून नाशिक पोलिसांनी तर त्यांना अटक करण्याची प्रक्रियाही सुरु केली आहे. अहमदनगरमध्येही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्यावतीने आज सकाळी संगमनेरातही निषेध आंदोलन करण्यात आले. शहरातील बसस्थानक परिसरात जमलेल्या आज-माजी पदाधिकार्यांसह अनेक शिवसैनिकांनी आज जोरदार घोषणाबाजी करीत परिसर दाणाणून सोडला. यावेळी संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी बसस्थानकाच्या अंतर्गत भागात असलेल्या सार्वजनिक शौचालयावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नावाचा फलक लावून शौचालयाने नामकरण करण्याचे अथीनव आंदोलन केले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे यांना यावेळी निषेधाचे निवेदन सोपविण्यात आले. यावेळी संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी पुणे-नाशिक महामार्गही रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र आपल्या आंदोलनाचा फटका सर्वसामान्यांना नको म्हणून ऐनवेळी हे आंदोलन मागे घेण्यात आले.
आज सकाळी झालेल्या आंदोलनात शिवसेनेच्या शहर प्रमुखांसह तुमसर विधानसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख नरेश माळवे, भारतीय कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष मुजीब शेख, संगमनेर शिवसेनेचे कार्याध्यक्ष दीपक साळुंके, तालुका महिला आघाडीच्या अध्यक्ष शीतल हासे, रवींद्र कानकाटे, अमोल कवडे यांच्यासह अनेक आजी-माजी पदाधिकारी व शिवसैनिक या आंदोलनात सहभागी झाले होते.
संगमनेर बसस्थानकाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे अशी येथील शिवसैनिकांची जुनी मागणी आहे. जिल्ह्यातील सर्वात आधुनिक आणि आकर्षक पद्धतीने उभारण्यात आलेल्या येथील बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावर काही शिवसैनिकांनी परस्पर तसा फलकही लावला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा निषेध करण्यासाठी शिवसैनिकांनी याच बसस्थानकातील शौचालयास त्यांचे नाव दिल्याने संगमनेरात वेगळ्याच चर्चा सुरु झाल्या आहेत. असे असले तरीही या आंदोलनामागील शिवसैनिकांच्या भावना मात्र वेगळ्या आहेत.
शिवसेना तालुकाप्रमुख हरवले कुठे…?
मध्यंतरीच्या काळात शिवसेनेच्या तालुका प्रमुखांनी राजीनामा दिल्याच्या चर्चा तालुक्यात पसरल्या होत्या. मात्र नंतर त्याचे काय झाले हे गुलदस्त्यात असतानाच आज चक्क शिवसेनेच्या पक्षप्रमुखांवरील वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करण्यासाठी शिवसेनेचे आजी-माजी पदाधिकारी एकवटलेले असताना या गर्दीत तालुकाप्रमुख मात्र कोठेही दृष्टीस पडले नाहीत, त्यामुळे काही दिवसांपूर्वी थांबलेली त्यांच्या राजीनाम्याची चर्चा आज या आंदोलनाच्या निमित्ताने पुन्हा उफाळून आली.