संगमनेरकर अनुभवताहेत ‘महाबळेश्वर’ची हुडहुडी! अनिश्चितता घेवून उगवलेल्या वर्षात मानवाचे अपरिमित नुकसान

नायक वृत्तसेवा, संगमनेर
अरबी समुद्रावरील हवामान बदलाचा फटका सध्या राज्यातील अनेक भागात अनुभवण्यास मिळत असून राज्यातील काही भागात पावसासह गारपीटही झाली आहे. जिल्ह्यातही अनेक ठिकाणी हाच अनुभव असल्याने वातावरणातील गारवा कमालीचा वाढला आहे. त्यातच गेल्या तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण कायम असल्याने पहाटेच्या सुमारास दाट धुक्यासह थंड वारे वाहत असल्याने दिवसभर वातावरणातील गारवा टिकून असल्याने संगमनेरकर सध्या महाबळेश्वरच्या हुडहुडीचा अनुभव घेत असून दिवसा स्वेटर व टोप्या घालाव्या लागत आहेत. पहिल्या दिवसापासून अनिश्चितता घेवून उगवलेल्या या वर्षाने हजारो नागरिकांचे बळी घेण्यासह शेतीचे व व्यवसायाचेही मोठे नुकसान केले आहे.

पहिल्या दिवसापासूनच अनिश्चितता घेवून उगवलेल्या 2021 सालात कोविड संक्रमणाच्या दुसर्‍या लाटेने अक्षरशः हाहाकार माजवला. या वर्षातील एप्रिल व मे या दोन महिन्यात कोविड संक्रमणाच्या लाटेने उच्चांक गाठल्याने या कालावधीत संक्रमित झालेल्या रुग्णांचा श्वासासाठीचा भयानक संघर्ष आणि त्यातून गेलेले असंख्य बळी आजही स्मरणात आहेत. महामारीच्या दहशती सोबतच चालू वर्षात निसर्गाचे दृष्टचक्रही अनुभवयाला मिळाले. पावसाळ्याच्या काळात दीर्घकाळ ओढ देणारा पाऊस उशीराने दाखल झाला, त्यातून चैतन्य निर्माण होत असतांना त्यानेही अतिरेक केल्याने राज्यात अनेकभागात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ते सहन करीत बळीराजा मार्गक्रमण करीत असतानाच गेल्या दोन महिन्यात अवकाळी आणि गारपीटीसारख्या घटनांनी पुन्हा एकदा शेती आणि शेतकरी संकटात सापडला आहे. अरबी समुद्रावरील हवामान बदलाचा परिणाम सध्या राज्यातील बहुतेक ठिकाणी अनुभवण्यास मिळत असून मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात ढगांचे आच्छादन असल्याने सूर्यनारायणाचे दर्शन दुर्लभ झाले आहे.

त्यातच संगमनेरच्या आसपासच्या तालुक्यांमध्ये दोन दिवसांत पाऊस व गारपीटही झाल्याने त्याचा परिणाम वातावरणातील गारवा वाढण्यात झाला असून या हंगामात दुसर्‍यांदा नागरिकांना दिवसा स्वेटर, टोप्या परिधान करण्यासह शेकोट्या पेटविण्याची वेळ आली आहे. त्यातच राज्यावर ओमिक्रॉन विषाणूंचे संकटही घोंगावत असताना सध्याच्या वातावरण बदलांचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होवून सर्दी-खोकल्याचे रुग्ण वाढू लागले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा नागरी आरोग्याबाबत चिंता निर्माण झाल्याचे चित्र दिसू लागले आहे. सध्याच्या काळात विवाह सोहळ्यांचीही धूम असल्याने नागरिकांनी अधिक सतर्कता बाळगण्याची गरज निर्माण झाली असून तसे आवाहन शासन व प्रशासनाकडून वारंवार केले जात आहे.

Visits: 128 Today: 1 Total: 1108549

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *