शेवगावमधील शेतकर्याच्या आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण भावाने घेतले राज्यातील एका बड्या पोलीस अधिकार्याचे नाव

नायक वृत्तसेवा, शेवगाव
येथील तरुण शेतकरी भाऊसाहेब घनवट याच्या आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. त्याचा भाऊ अंबादास घनवट याने या प्रकरणात राज्यातील एका बड्या पोलीस अधिकार्याचे नाव घेतले आहे. या पोलीस अधिकार्याने शेवगाव पोलिसांना फोन करून दबाव आणल्याचा आरोप त्याने केला आहे.

शेवगावमध्ये तहसीलदार कार्यालयासमोर भाऊसाहेब घनवट या तरुण शेतकर्याने आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी त्याने बनवलेला व्हिडिओ आता समोर आला आहे. ‘सर्व काही मोबाईलमध्येच’ असे स्टेटस ठेवत त्याने आत्महत्या केली होती. सुरुवातीला त्याने लिहून ठेवलेली चिठ्ठी अंतर्वस्त्रात आढळून आली. त्यामध्ये त्याने तालुक्यातील गंगामाई शुगर या खासगी साखर कारखान्याच्या अधिकार्यांनी त्रास दिल्याने आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे.

सदर कारखाना घनवट यांच्या शेताशेजारीच आहे. कारखान्यामुळे होणार्या प्रदूषणामुळे घनवट यांच्या शेतीचे नुकसान होत होते. त्याची तक्रार कारखान्याकडे केली असता घनवट यांच्यावरच खंडणीचा गुन्हा दाखल केला गेला. सुसाईड नोटमधील या मजकुरावरून शेवगाव पोलिसांनी गंगामाई साखर कारखान्याच्या तीन अधिकार्यांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. आता आत्महत्या केलेल्या भाऊसाहेब सर्जेराव घनवट याने आत्महत्येपूर्वी मोबाईलध्ये करून ठेवलेला व्हिडिओ समोर आला आहे. त्यात त्याने आपली व्यथा कथन केली आहे. तर दुसरीकडे या प्रकरणी फिर्याद दिलेला त्याचा भाऊ अंबादास सर्जेराव घनवट याने पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. कारखान्याची बाजू घेत पोलिसांनी आम्हांलाच मारहाण केली. त्यांना एका वरीष्ठ पोलीस अधिकार्याचा फोन येत होता, असा आरोप करून घनवट यांनी मारहाण करणार्या शेवगावमधील पोलिसांवरही कारवाईची मागणी केली आहे.
