घारगाव येथील ‘शिव कलेक्शन’ कापड दुकान चोरट्यांनी फोडले मोठ्या प्रमाणात कपडे चोरले; व्यापार्यांत पसरले भीतीचे वातावरण
नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील घारगाव येथील ‘शिव कलेक्शन’ हे कापड दुकान चोरट्यांनी सोमवारी (ता.29) पहाटे फोडून मोठ्या प्रमाणात कपडे चोरुन नेले आहे. गेल्या काही दिवसांपासून पठारभागात चोर्यांचे सत्र सुरू झाल्याने नागरिकांसह व्यापार्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरु लागली आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, घारगाव येथे किरण गागरे यांचे ‘शिव कलेक्शन’ नावाचे कापड दुकान आहे. रविवारी नेहमीप्रमाणे गागरे हे दुकान बंद करून घरी निघून गेले होते. सोमवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या छताचा पत्रा उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर दुकानातील महागाड्या जिन्स पॅन्ट, टी शर्ट, शर्ट, नाईट पॅन्ट आदित्य कपडे चोरून पोबारा केला. दुसर्या दिवशी सोमवारी (ता.29) दुकानाचे संचालक गागरे यांनी दुकान उघडले असता तर सर्वत्र कपडे आस्ताव्यस्त अवस्थेत दिसले. त्यामुळे ते घाबरून गेले. वर पाहिले तर पत्रा उचकटलेला दिसला. त्यामुळे चोरट्यांनी हा प्रकार केला असल्याची त्यांची खात्री पटली.
या घटनेची माहिती घारगाव पोलिसांना समजताच सहाय्यक फौजदार राजू खेडकर, मुख्य हवालदार दशरथ वायाळ आदिंनी घटनास्थळी येवून पाहणी केली. दरम्यान काही दिवसांपूर्वी अशाच पद्धतीने घारगाव येथील सतीश आहेर यांचेही महालक्ष्मी कापड दुकान चोरट्यांनीफोडून एक लाख एक हजार रुपयांचा मुद्देमाल चोरला होता. आता पुन्हा चोरट्यांनी कापड दुकान फोडल्याने व्यापार्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांसह व्यापार्यांतून जोर धरु लागली आहे.