कोपरगाव पालिकेची सर्वसाधारण ऑनलाईन सभा नेटवर्कमुळे गोंधळात

कोपरगाव पालिकेची सर्वसाधारण ऑनलाईन सभा नेटवर्कमुळे गोंधळात
सर्व विषयांवर पालिकेत साधक-बाधक चर्चा व्हावी; भाजप-शिवसेना नगरसेवकांची मागणी
नायक वृत्तसेवा, कोपरगाव
पालिकेची मंगळवारी (ता.15) असलेली सर्वसाधारण ऑनलाईन (व्हिडीओ कॉन्फरन्स) सभा वेब पोर्टलवर आयोजित करण्यात आली होती. मात्र सभेत नेटवर्क व तांत्रिक अडचणी आल्यामुळे शहरातील प्रलंबित प्रश्न व नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर चर्चा घडवून ती सोडविण्यासाठी सदरच्या सभेतील विषय क्रमांक 1 ते 26 हेच सर्व विषय पुन्हा आठ दिवसांनी सुरक्षित अंतराचे नियम पाळून सभागृहात घेण्यात यावेत. त्यावर साधक-बाधक चर्चा व्हावी अशी मागणी भारतीय जनता पक्ष व शिवसेनेच्या वीस नगरसेवकांनी लेखी पत्राद्वारे नगराध्यक्ष व मुख्यधिकारी यांच्याकेडे केली आहे. परंतु सदरची मागणी नगराध्यक्ष व पालिका प्रशसनाने गांभीर्याने न घेता त्यास केराची टोपली दाखवून सभेचे कामकाज पुढे चालू ठेवल्यामुळे भाजप-शिवसेनेच्या नगरसेवकांनी सभेतील विषयांचे विषयान्वये अभिप्राय पत्राद्वारे देवून त्याची नोंद सभेच्या इतिवृत्तामध्ये करण्याची मागणी केली आहे.


या बैठकीबाबतचे सविस्तर अभिप्राय भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक गटनेते रवींद्र पाठक व शिवसेनेचे गटनेते नगरसेवक योगेश बागुल यांनी पुढीलप्रमाणे दिले आहेत. या सभेत आस्थापना विभागाकडून स्वेच्छानिवृत्तीबाबत आलेल्या अर्जाचा विचार करता स्वेच्छानिवृत्ती देताना सक्षम वैद्यकीय अधिकार्‍याचा दाखला व त्यांच्या वयाचा विचार व्हावा. नियमाप्रमाणे सर्वांना एक संधी देण्यात यावी. कोरोना संसर्गजन्य आजाराचा फैलाव पाहता शहरातील मिळकतीचे तूर्त फेर मूल्यांकन न करता त्यावर नंतर विचार विनियम करावा. सन 2019-20ची शास्ती माफ करावी. भविष्यात नगर-मनमाड मार्ग चारपदरी होणार असल्याने तद्नंतरच सेंट्रल लाईन व स्ट्रीट लाईट, हायमास्ट बसविण्याचा विचार व्हावा व पालिकेचे आर्थिक नुकसान टाळावे याकरिता एक समिती नेमावी. जुन्या घंटागाड्यांवर किती मेंटनन्स खर्च झाला व ठेकेदारांकडून भाडेपोटी किती रक्कम मिळाली, कचरा संकलन करुन वाहतुकीसाठी घंटागाडी ठेकेदारानेच घ्यावेत व त्याचा मेंटनन्सही त्यांनी करावा.


गायत्री कन्स्ट्रक्शनने सदर तलावाच्या जागेवरील अंदाजे पंधरा कोटी किंमतीचे माती व मुरुम समृध्दी रस्त्यासाठी मोफत उचलेले असताना सदर तलावाचे बांधकाम संदर्भात गायत्री कन्स्ट्रक्शनसोबत चर्चा करावी. तसेच साठवण तलाव क्रमांक पाचच्या बांधकामाकरिता प्रकल्प सल्लागार नेमण्याकरिता आपण निविदा प्रसिद्ध केली होती त्यावर 4 निविदा पालिकेस प्राप्त झाल्या. परंतु त्यावर कोणत्याही स्वरुपाची बैठकीत चर्चा झालेली नाही. सदरच्या निविदा नगरसेवकांच्या समोर आवश्यक असतानाही तसे झालेले नाही. परस्पर मानवसेवा कन्सलटंट धुळे यांना तांत्रिक सल्लागार म्हणून नेमणे योग्य होईल असे बांधकाम अभियंत्याने नमूद केले आहे. परंतु आम्ही घेतलेल्या माहितीनुसार त्यांचे काम असमाधानकार असल्याचे समजते. त्यामुळे त्यांची नेमणूक करण्यात येवू नये. पूर्वी तलाव क्रमांक पाच संदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांना तांत्रिक सल्लगार शुल्कअदा केले त्याचे पुढे काय झाले? त्यांनी तांत्रिक सल्लगार म्हणून काम करण्यास असमर्थ असल्याचे आपणास कळविले आहे का? किंवा कसे?. तलाव क्रमांक पाचचे बांधकाम हा विषय जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असल्याने त्यावर सविस्तर प्रत्यक्ष चर्चा होणे आवश्यक आहे. तसेच त्याचे काम दर्जेदार होणे हे नागरिकांच्या हिताचे आहे. या सर्व बाबींचा विचार करता तलाव क्रमांक पाच व 49 कोटींची पाणी पुरवठा योजना यावर सविस्तर विचार विनिमय करण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभा प्रत्यक्ष नगरपालिकेच्या सभागृहात सुरक्षित अंतराचे सर्व नियम पाळून बोलविण्यात यावी.

Visits: 9 Today: 1 Total: 116443

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *