कॉटेजमधील संक्रमित कोविड रुग्ण खरेदीसाठी बिनधास्त फिरला! दोन दिवस माळीवाडा परिसरात संचारणार्या ‘त्या’ रुग्णाने उडवली अनेकांची झोप
नायक वृत्तसेवा, संगमनेर
लक्षणे नसलेल्या मात्र पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांसाठी वरदान ठरलेले संगमनेर नगरपालिकेचे कॉटेज रुग्णालय आता वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत येवू लागले आहे. सुरुवातीपासून या रुग्णालयाची संपूर्ण जबाबदारी घेणार्या धन्वंतरीच्या प्रामाणिक सेवेकालाच मध्यंतरी कोविडने जायबंदी केल्याने सध्या या रुग्णालयाची जबाबदारी अन्य कोविड योद्ध्यावर सोपविण्यात आली आहे. मात्र त्यांच्याकडून काही प्रमाणात दुर्लक्ष होत असल्याने या रुग्णालयात दाखल असलेले संक्रमित रुग्ण थेट प्रवेशद्वाराबाहेर बिनधास्त फिरत असल्याचे आढळून आले आहे. या चर्चेने पालिका परिसरातील अनेक दुकानदारांची झोप उडविली आहे. अर्थात सदरचे वृत्त प्रसिद्ध होण्यापूर्वीच ‘त्या’ संक्रमित रुग्णाला रविवारीच तेथून डिस्चार्जही देण्यात आला आहे.
संगमनेर शहरासह तालुक्यातील रुग्णसंख्या वाढू लागल्याने संगमनेर शहरातील आरोग्य यंत्रणांवरील ताण वाढला. त्याचवेळी काही खासगी रुग्णालयांनी सशुल्क उपचारांची सोय केल्याने काही प्रमाणात हा ताण कमी झाला. त्यातच लक्षणे नसणार्या रुग्णांची संख्याही दिवसोंदिवस वाढू लागल्याने स्थानिक यंत्रणेने पालिकेच्या कॉटेज रुग्णालयातील जून्या जनरल वॉर्डची (केनडी हॉल) डागडूजी करुन हा वॉर्ड लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गेल्या जुलैपासून पालिकेच्या प्रांगणातील कॉटेज रुग्णालयाच्या परिसरात पालिकेचे कोविड हेल्थ सेंटर सुरु झाले.
संगमनेर तालुक्यात कोविडचा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर तालुक्यातील बहुतेक खासगी डॉक्टरांनी भितीपीेटी आपले बाह्यरुग्ण बंद केले. त्यामुळे अन्य आजारांचे उपचार मिळवण्यासाठी रुग्णांची दमछाक होवू लागली. सुरुवातीच्या काळात प्रशासनाकडून वारंवार आवाहन करुनही खासगी वैद्यकीय क्षेत्र पुढे येईना अशी अवस्था निर्माण झाल्याने शेवटी प्रशासनानेच पुढाकार घेत पालिकेच्या प्रांगणातील कॉटेज रुग्णालयात शासकीय बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) सुरु केली. या रुग्णालयाची जबाबदारी कोणाला सोपवायची असा प्रश्न जेव्हा निर्माण झाला. तेव्हा तीन वर्षापूर्वी निवृत्त झालेल्या डॉ.किशोर पोखरकर यांनी स्वतः यासाठी पुढाकार घेतला.
‘माझ्या गावाला, माझ्या माणसांना माझी गरज आहे’ ही भावना मनात घेवून त्यांनी या रुग्णालयाची जबाबदारी घेतली आणि ती त्यांनी अगदी समर्थपणे सांभाळलीही. पालिकेतच कोविड बाह्यरुग्ण विभाग सुरु झाल्याने संगमनेरकरांना त्याचा मोठा फायदाही झाला. नंतरच्या काळात तालुक्यासह शहरातील रुग्णसंख्या वाढू लागल्याने शहरात उपलब्ध असलेल्या आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढू लागला. त्यामुळे शहरी भागातील रुग्णांसाठी स्वतंत्र शासकीय रुग्णालयाचा विषय चर्चेत आला. महसुलमंत्री बाळासाहेब थोरात व नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांनी त्यासाठी पालिकेच्या कॉटेजमध्येच अशी व्यवस्था करण्याबाबत सकारात्मक प्रयत्न करीत गेल्या अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत असलेल्या केनडी हॉल (जून्या रुग्णालयातील जनरल वॉर्ड) पुन्हा कार्यान्वीत केला. नव्याने उभ्या राहीलेल्या या कोविड हेल्थ सेंटरची जबाबदारीही डॉ.पोखरकर यांनी स्विकारली.
मात्र रुग्णसेवा करता करता या योद्ध्यालाच कोविडने मिठी मारल्याने गेल्या पंधरवड्यापासून ते उपचार घेत असल्याने रजेवर आहेत. त्यामुळे येथील व्यवस्था अन्य वैद्यकीय अधिकार्याकडे सोपविण्यात आली आहे. मात्र त्यांच्याकडून या रुग्णालयाच्या नियंत्रणात कमतरता राहत असल्याचे गेल्या काही दिवसांत दिसून आले आहे. 22 रुग्णांना दाखल करुन घेण्याची क्षमता असलेल्या या रुग्णालयात आजच्या स्थितीत 18 रुग्णांवर एकाचवेळी उपचार सुरु असतात. उपचारादरम्यान कोणताही रुग्ण येथून बाहेर पडणार नाही यासाठी केनडी हॉलच्या बाह्य बाजूला अडथळे (बॅरिकेटस्) उभारण्यात आले आहे. आत जाण्यासाठी व येण्यासाठी मात्र हत्ती जाईल इतका रस्ता ठेवण्यात आला आहे.
पालिका प्रांगणातील कॉटेज रुग्णालयात केवळ शहरी भागातील रुग्णांवरच उपचारांची व्यवस्था आहे. मात्र गेल्या आठवड्यात ग्रामीणभागातील एका प्राथमिक केंद्राचे वैद्यकीय अधिकारी कोविडग्रस्त झाल्याने त्यांना ‘खास बाब’ म्हणून पालिकेच्या कॉटेजमध्ये दाखल करण्यात आले होते. रविवारीच (ता.13) त्यांना उपचारांती घरीही सोडण्यात आले. विशेष म्हणजे स्वतः वैद्यकीय क्षेत्रातील असल्याने व त्यातही कोविडच्या लढ्यातही सक्रीय असल्याने या महाशयांना कोविडचा संसर्ग आणि त्याचे परिणाम या दोन्हीची सखोल माहिती असणारच. मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचेच समोर आले आहे.
या वैद्यराजांनी आपल्या ‘आयसोलेशन’ कालावधीत कॉटेज रुग्णालयाचा केनडी हॉल सोडून अनेकवेळा पालिकेच्या परिसरात आणि चक्क मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरही अनेकवेळा मुक्त संचार केल्याचे दाखले परिसरातील अनेकजण देत आहेत. आपल्याजवळ आपले कोणीही नातेवाईक नसल्याचे सांगत हे वैद्यराज स्वतःला गरज असलेल्या वस्तु खरेदी करण्यासाठी स्वतःच थेट दुकानांमध्ये, हॉटेलमध्ये जावूनही आले. त्याची ही कृती अत्यंत असंवेदनशील आणि अशिक्षित असल्याचे प्रमाण देणारी होती. त्यांच्या या कृतीतून परिसरातील कोणाचे काय बिघडले हे येत्या दोन-चार दिवसांत ठळकपणे बाहेर येईलही. पण स्वतः कोविड योद्धा असलेल्या व्यक्तिने अशी कृती करणं कितपत योग्य आहे? हा सवाल मात्र त्यांनतरही कायम राहणार आहे.
ग्रामीणभागातील रुग्ण असतांना केवळ कोविड लढ्यातील योद्धा म्हणून त्यांना पालिकेच्या कॉटेजने मदतीचा हात दिला. मात्र त्यांनी त्याचा गैरफायदाच घेतल्याचे त्यांच्या या कृतीतून दिसून आले. केवळ हे एकच उदाहरण नाहीतर यापूर्वीही कॉटेज रुग्णालयात दाखल झालेल्या काही संक्रमित महाभागांनी चक्क आपली खाट सोडून पालिकेच्या मुख्य कार्यालयासमोरील लक्ष्मणबाबांच्या मंदिरातही प्रवेश केला आहे. याचाच अर्थ पालिकेने शहरी रुग्णांची सोय तर केली खरी, पण ती सोय पालिकेच्या परिसरात राहणार्यांसाठी ‘जीवघेणी’ तर ठरणार नाही ना? असा प्रश्न निर्माण झाला आहे. असे प्रकार यापुढे पुन्हा घडणार नाहीत यासाठी पालिका प्रशासनाने अधिक कठोर पावले उचलण्याची गरज आहे, अन्यथा कॉटेज म्हणजे एका संक्रमिताच्या उपचारातून दहा संक्रमित वाढण्याचे ‘मॉडेल’ बनेल याचा गांभिर्याने विचार करण्याची गरज आहे.
गेल्या दिड महिन्यांपूर्वी सुरु झालेल्या संगमनेर नगरपालिकेच्या कॉटेज रुग्णालयाने संगमनेरकरांची मोठी सोय केली आहे. शहरी रुग्णांसाठी संजीवन ठरलेल्या या रुग्णालयात आत्तापर्यंत दिडशेहून अधिक संक्रमित रुग्ण उपचार घेवून घरी परतले आहेत. येथील डॉक्टरांची समर्पित सेवा, आरोग्य कर्मचार्यांकडून दररोज राखली जाणारी स्वच्छता व येथील वातावरण यामुळे संक्रमित झालेल्या शहरातील भल्याभल्यांना पालिकेच्या कॉटेजमध्ये आपल्याला खाट मिळावी अशी अपेक्षा असते. मात्र अशा कृत्यातून या रुग्णालयाबाबत ‘गैरप्रचार’ होण्याची शक्यता असल्याने पालिकेने असे प्रकार पुन्हा घडणार नाहीत यासाठी आणखी कठोर उपाययोजना करण्याची गरज आहे.