अबब! संगमनेरातील कत्तलखान्यांवर राज्यातील सर्वात मोठा छापा! एक कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत; 31 हजार किलो गोवंश मांस जप्त तर 71 जनावरांची सुटका..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
विविध अवैध व्यवसायांचे केंद्र ठरु पाहणार्‍या आणि गोवंशाच्या बेकायदा कत्तलीसाठी संपूर्ण राज्यात कुप्रसिद्ध असलेल्या संगमनेरातील कत्तलखान्यांवर आजवरची सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. भिवंडी येथील प्राणी कल्याण अधिकारी यतीन जैन यांच्या माहितीनुसार पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशाने शनिवारी रात्रभर ही कारवाई सुरु होती. या कारवाईत पाच कत्तलखान्यांमधून जवळपास 62 लाख रुपयांच्या 31 हजार किलो गोवंशाच्या मांसासह पोलिसांनी 1 कोटी 4 लाख 50 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला असून पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईने संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली असून अवघ्या राज्याचे लक्ष्य पुन्हा एकदा संगमनेरवर खिळले आहे.


याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार भिवंडी (जि.ठाणे) येथील प्राणी कल्याण अधिकारी यतीन कांतिलाल जैन यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी अमदनगरचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना संगमनेरातील गोवंश कत्तलखान्यांबाबत सविस्तर माहिती देवून कारवाईची मागणी केली होती. त्यानुसार त्यांनी श्रीरामपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, पो.नि.हिरालाल पाटील, विजय करे यांना जैन यांच्यासह घटनास्थळी जावून कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार या दोन्ही अधिकार्‍यांनी जैन यांच्यासह नगर, श्रीरामपूर व संगमनेर पोलिसांच्या मदतीने भारतनगर व जमजम कॉलनी परिसरातील साखळी कत्तलखान्यांवर एकाचवेळी छापा घातला. यावेळी सुरु असलेल्या पाच कत्तलखान्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जनावरांची कत्तल झाल्याचे व अनेक जनावरे कत्तलीच्या वेदीवर असल्याचे भयानक दृष्य पोलीस पथकाला दिसले.


पोलिसांच्या आगमनाची कल्पना येताच कत्तलखान्यांचे मालक आपल्या कामगारांसह कत्तलखान्यांना कुलपे ठोकीत पळून गेले. पोलिसांनी कारवाई केलेल्या सर्व कत्तलखान्यांचे दरवाजे तोडावे लागले. यावेळी आढळून आलेली गोवंश जनावरे, कापलेले मांस इतक्या मोठ्या प्रमाणात आढळले की शनिवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास सुरु झालेली ही कारवाई आज सकाळपर्यंत सुरु होती. या कारवाई दरम्यान कत्तलखान्यांच्या परिसरात वारंवार तणावही निर्माण होत होता. काही टवाळखोरांनी पोलीस कारवाईत अडथळा निर्माण करण्यासाठी दगडे फेकून रस्त्यावरील पथदिवे फोडण्याच्याही घटना समोर आल्या, मात्र पोलिसांनी त्याला न जुमानता जमाव पांगवला व आपली कारवाई सुरुच ठेवली.


या कारवाईत पोलिसांनी जमजम कॉलनीतील वाहीद कुरेशी व मुद्दत्सर हाजी याच्या वाड्यातून 24 लाख रुपये किंमतीचे 12 हजार किलो गोवंशाचे मांस, 4 लाख रुपये किंमतीची 30 जिवंत जनावरे, 3 लाख 10 हजार रुपये किंमतीचा टेम्पो (क्र.एम.एच.04/4846), नवाज कुरेशी याच्या वाड्यातून 20 लाख रुपये किंमतीचे 10 हजार किलो गोवंशाचे मांस, 5 लाख 45 हजार रुपये किंमतीची 41 जिवंत जनावरे, 1 लाख 50 हजार रुपये किंमतीचा टेम्पो (क्र.एम.एच.03/सी.पी.8858), जहीर कुरेशी याच्या वाड्यातून 11 लाख रुपये किंमतीचे 5 हजार 500 किलो गोवंशाचे मांस, परवेझ कुरेशी याच्या वाड्यातून 7 लाख रुपये किंमतीचे 3 हजार 500 किलो गोवंशाचे मांस, तसेच कत्तलखान्यांच्या बाहेरील बाजूला उभे असलेले 18 लाख रुपये किंमतीचे दोन टेम्पो (क्र.एम.एच.04/जी.आर.0090 व एम.एच.17/बी.वाय.2478) तसेच नवाज कुरेशी याच्या कार्यालयावरील छाप्यात 4 लाख 28 हजारांची रोकड व 10 हजार रुपयांचा मोबाईल, आणि या सर्व कत्तलाखान्यांमध्ये कत्तलीसाठीचे साहित्य असा एकूण 1 कोटी 4 लाख 50 हजार 50 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. या कारवाईत कोणालाही अटक झालेली नाही.

राज्यात संगमनेरातील बेकायदा कत्तलखाने कुप्रसिद्ध आहेत. येथील भारतनगर, जमजम कॉलनी, मदीनानगर, मोगलपूरा या भागात एकूण दहा मोठे आणि अनेक छोटे कत्तलखाने आहेत. मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या सातत्याच्या कारवायात यातील बहुतेक कत्तलखाने बंद झालेली असून सध्या वरील पाच ठिकाणी मोठ्या प्रमाणात गोवंशाची कत्तल करुन त्यांचे मांस मुंबई, गुलबर्गा (कर्नाटक), मालेगाव व औरंगाबाद सारख्या ठिकाणी पुरविले जाते. वारंवारच्या कारवायांनंतरही येथील कत्तलखाने बंद होत नसल्याने येथील स्थानिक पोलिसांचे कसायांशी आर्थिक साटेलोटे असल्याचे आरोपही यापूर्वी वेळोवेळी झालेली आहेत. मात्र प्रत्येक वेळी येथील अधिकार्‍यांनी कत्तलाखाने पूर्णतः बंद असल्याच्याच दर्पोक्ती केल्या आहेत. शनिवारच्या कारवाईने मात्र स्थानिक पोलिसांचे पितळ उघडे पाडले असून संगमनेरात दररोज किती मोठ्या प्रमाणात गोवंशाची कत्तल होते हे अगदी सुस्पष्ट झाले आहे.

भिवंडी येथून संगमनेरात आलेले प्राणी कल्याण अधिकारी यतीन कांतिलाल जैन हे बजरंग दलाशी संबंधित आहेत. गेल्या तीन दिवसांपासून ते संगमनेरात ठाण मांडून बसले होते. सदरच्या कारवाईसाठी त्यांनी आपला जीव धोक्यात घालून या कत्तलखान्यांची अतिशय बारकाईने माहिती मिळविली. शनिवारी या कत्तलखान्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जनावरे कापली जाणार असल्याची विश्‍वसनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेवून कारवाईची मागणी केली. त्यानुसार त्यांनीही सदर प्रकरणाची गोपनीयता बाळगीत ही कारवाई पूर्ण करण्याचे आदेश दिल्याने गोवंश हत्याबंदी कायदा लागू झाल्यानंतरची राज्यातील सर्वात मोठी कारवाई संगमनेरात झाली आहे.


या प्रकरणी सहाय्यक फौजदार रफियोद्दीन शेख यांच्या फिर्यादीवरुन वरील पाच जणांवर भा.द.वी कलम 269, 429, महाराष्ट्र गोवंश हत्याबंदी कायद्याचे कलम 5(अ), 1/9, 5 (क), 9 (अ) व प्राण्यांना निर्दयीपणाने वागणूक देण्यास प्रतिबंध करणार्‍या कायद्याचे कलम 3, 11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Visits: 45 Today: 1 Total: 117581

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *