शुभवार्ता! जायकवाडी धरणाचा उपयुक्त पाणीसाठा सत्तर टक्के! समन्यायीचे संकट टळले; साडेतीन महिन्यात 27 टीएमसी पाणी दाखल..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
अंमलबजावणीपासूनच संघर्षाची ठिणगी पेटलेल्या समन्यायी पाणी वाटप कायद्याची यंदा अंमलबजावणी होण्याची शक्यता आता मावळली आहे. त्यामुळे गोदावरी उर्ध्व भागातील नगर व नाशिक जिल्ह्यातील शेतकर्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. दीर्घकाळ ओढ देणार्या पावसामुळे यंदा उर्ध्वभागातील धरणांचे पाणीसाठे अर्धवट असतांना जायकवाडी तहाणल्याने या दोन्ही जिल्ह्यांसमोर यक्षप्रश्न उभा राहीला होता. मात्र मागील दहा दिवसांतील पावसाने चिंतेचे मळभ दूर सारतांना चैतन्य निर्माण केले आहे. एकीकडे या दोन्ही जिल्ह्यातील बहुतेक धरणांतील पाणीसाठे समाधानकारक स्थितीत पोहोचले असतांना, दुसरीकडे जायकवाडी धरणाच्या उपयुक्त पाणीसाठ्याने सत्तर टक्क्यांची पातळी ओलांडल्याने यावर्षी गोदावरी उर्ध्वभागातील धरणांमधून जायकवाडीसाठी पाणी सोडण्याचे संकटही आता दूर झाले आहे. आज सकाळी जायकवाडीच्या महाकाय जलाशयाचा एकूण पाणीसाठा 79 हजार 758 दशलक्ष घनफूट तर उपयुक्त पाणीसाठा 53 हजार 692 दशलक्ष घनफूट झाला आहे.
सन 2005 साली राज्य विधीमंडळाने समन्यायी पाणीवाटपाचा कायदा मंजूर केला. मात्र त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होण्यासाठी 2012 साल उजेडावे लागले. त्यावर्षी मराठवाड्यातील पाणीस्थिती अतिशय बिकट झाल्याने नाशिक जिल्ह्यातील दारणा धरण समूहासह नगर जिल्ह्यातील भंडारदरा व मुळा धरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडावे लागले होते. त्यावेळची परिस्थिती बिकट असल्याने या दोन्ही जिल्ह्यातून शासनाच्या अंमलबजावणीस कोणताही विरोध झाला नाही. मात्र त्यानंतर अशीच परिस्थिती दोनवेळा उद्भवल्याने व त्यावेळी केवळ कायद्याच्या अंमलबजावणीचा आग्रह सुरु झाल्याने मराठवाडा विरुद्ध उर्ध्वगोदावरी खोरे असा संघर्ष उभा राहीला, तो आजही कायम आहे. समान पाणीवाटपाच्या धोरणा विरोधात या दोन्ही जिल्ह्यातील शेतकरी उभा राहीला, त्यातूनच संघर्ष समित्या निर्माण होवून न्यायालयात दाद मागण्यात आली. मात्र त्याचाही फारसा फायदा न झाल्याने दुष्काळी परिस्थितीत मराठवाडा विरुद्ध नगर व नाशिक असा कायमस्वरुपी वाद उभा राहीला आहे.
यावर्षी वेळेवर दाखल होवूनही मान्सूनने दीर्घकाळी पाणलोटातून काढता पाय घेतल्याने सह्याद्रीचा घाटमाथाच पावसाच्या प्रतीक्षेत होता. मात्र जुलैचा शेवटचा आठवडा आणि सप्टेंबरच्या पहिल्या दोन आठवड्यात नगर व नाशिकसह जायकवाडीच्या लाभक्षेत्रातही समाधानकारक पाऊस झाल्याने गोदावरी उर्ध्वभागातील धरणांमधील जलसाठे फुगण्यासोबतच गोदावरी व प्रवरा नदीमधून मोठ्या प्रमाणात पाणी वाहील्याने खपाटीला गेलेल्या महाकाय जायकवाडीच्या जलाशयातील पाणीसाठा वाढत गेला आणि महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने जलसाठ्यांची मोजणी करण्यापूर्वी समन्यायी पाणीवाटपाच्या धोरणानुसार जायकवाडी धरणाचा उपयुक्त पाणीसाठा 65 टक्क्यांची मर्यादा ओलांडून पुढे गेल्याने उर्ध्व भागातील शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
6 जून रोजी जायकवाडी धरणाचा एकूण पाणीसाठा 52 हजार 977 दशलक्ष घनफूट (54.42 टक्के), तर उपयुक्त पाणीसाठा 26 हजार 914 दशलक्ष घनफूट (35.11) इतका होता. मागील साडेतीन महिन्यात जायकवाडीच्या पाणलोटासह गोदावरी उर्ध्वभागातील नद्यांमधून मोठ्या प्रमाणात पाणी वाहिल्याने या महाकाय जलाशयात 26 हजार 781 दशलक्ष घनफूटाची भर पडली. आजच्या स्थितीत जायकवाडी धरणाचा एकूण पाणीसाठा 79 हजार 758 दशलक्ष घनफूट (77.64 टक्के) तर उपयुक्त पाणीसाठा 53 हजार 692 दशलक्ष घनफूट (70.03 टक्के) इतका झाला आहे. समन्यायी पाणीवाटपाच्या सूत्रानुसार 15 ऑक्टोबर रोजी जायकवाडी धरणातील उपयुक्त पाणीसाठा 65 टक्क्यांपेक्षा अधिक असणे आवश्यक आहे. त्यानुसार आजच्या स्थितीतच धरणाने पातळीची मर्यादा ओलांडल्याने गोदावरी उर्ध्व भागातील जलसंकट आता दूर झाले आहे.
चार दिवसांच्या झंझावाती पावसानंतर धरणांच्या पाणलोटात आता सूर्यदर्शन होवू लागले आहे. बहुतेक ठिकाणच्या पावसाने विश्रांती घेतल्याने धरणातील पाण्याची आवकही कमी झाली असून नदीपात्रात सोडला जाणारा विसर्गही बंद करण्यात आला आहे. त्यामुळे मागील रविवारपासून गोदावरी, मुळा व प्रवरा नद्यांच्या खोर्यात निर्माण झालेली पूरस्थिती पूर्णतः ओसरली आहे. मागील चोवीस तासांत भंडारदर्याच्या पाणलोटातील रतनवाडीत 13 मिलीमीटर, घाटघर 08 मिलीमीटर, पांजरे 02 मिलीमीटर, भंडारदरा 02 मिलीमीटर व वाकी येथे अवघ्या एक मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. आज सकाळी सहा वाजता मुळा धरणाचा पाणीसाठा 25 हजार 322 दशलक्ष घनफूट (97.43 टक्के), भंडारदरा 11 हजार 39 दशलक्ष घनफूट (100 टक्के), निळवंडे 8 हजार 170 दशलक्ष घनफूट (98.19 टक्के), आढळा 874 दशलक्ष घनफूट (82.45 टक्के) व भोजापूर 188 दशलक्ष घनफूट (52.08 टक्के) इतका झाला आहे. भंडारदरा धरणाच्या विद्युतगृहातून 816 क्युसेक्स, निळवंडे धरणातून प्रवरा नदीपात्रात 660 क्युसेक्स तर कोतुळनजीकच्या मुळा नदीपात्रातून 1 हजार 273 क्युसेक्स पाण्याचा प्रवाह सुरु आहे.