राजस्थानी ब्राह्मण समाजाचे विश्वस्त वसंत गिल यांचे निधन! संगमनेरच्या सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातील एका युगाचा अस्त

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेरच्या सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात सर्वपरिचित असलेल्या वसंत लादुराम गिल यांचे रविवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर पुण्यात उपचार सुरु होते. अतिशय शांत, संयमी, मनमिळावू आणि दानशूर असलेले गिल संगमनेर परिसरात ‘महाराज’ या नावाने परिचित होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते, त्या दरम्यान रविवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने संगमनेरच्या सामाजिक आणि धार्मिक क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. काल सायंकाळी त्यांच्यावर येथील अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.

वसंत लादुराम गिल हे नाव संगमनेरातील बहुतेकांना परिचयाचे. पूर्वी पुणे नाक्याजवळ मिठाईचे दुकान चालविणार्या गिल यांनी नंतरच्या कालावधीत कन्फेक्शनरीच्या व्यवसायात पदार्पण करुन आपली प्रगती साधली. या दरम्यान त्यांनी आपले सामाजिक आणि धार्मिक दायित्वही तितक्याच ताकदीने पूर्ण केले. दररोज पहाटे स्नानविधी उरकून ते घराबाहेर आणि संगमनेरातील सर्व सार्वजनिक मंदिरांमध्ये जावून पूजा अर्चना करीत. त्यानंतर गावात फिरणार्या मोकाट गायींना ते नित्यनेमाने घास भरवित व त्यानंतर मोकाट कुत्र्यांनाही अन्न देत.

राजस्थानी ब्राह्मण समाजात ‘दानशूर’ म्हणून त्यांच्याकडे आदराने पाहीले जात. मनात प्रचंड भूतदया असलेले महाराज अतिशय मनमिळावू प्रवृत्तीचे होते. त्यांच्या सानिध्यात आलेल्या प्रत्येकावर त्यांच्या स्वभावगुणांची सहज छाप पडत, त्यातूच त्यांच्यावर प्रेम करणारा मोठा वर्ग संगमनेरात निर्माण झाला होता. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थामुळे सुरुवातीला संगमनेर व नंतर पुण्यातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्या दरम्यानच रविवारी (ता.12) सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन सूना, विविाहित मुलगी व नातवंडे असा परिवार आहे. रविवारी सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर येथील अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजस्थानी ब्राह्मण समाजातील अनेकांसह शहराच्या विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.
