हिवरगाव पावसा टोलनाका विरोधात ‘आम्ही संगमनेरकरां’ची अभूतपूर्व एकी! ठिय्या आंदोलन करत टोलनाका प्रशासनाला विविध मागण्यांचे दिले निवेदन

नायक वृत्तसेवा, संगमनेर
अपुरी कामे, रस्त्याची चाळण, सुविधांची मारामार तरीही सक्तीची ‘वसुली’ असे सूत्र असलेल्या हिवरगाव पावसा टोलनाका प्रशासनाविरोधात संगमनेरकरांची सहनशीलता आता संपुष्टात आलेली आहे. यापूर्वी काही पक्ष व संघटनांनी यावर आवाज उठविला होता. यावेळी मात्र बिगर संघटना व पक्षविरहित ‘आम्ही संगमनेरकर’ अशा बॅनरखाली बुधवारी (ता.8) सकाळी 10 वाजता एकत्र येत अभूतपूर्व एकीचे दर्शन घडवत हिवरगाव पावसा टोलनाक्यावर ठिय्या आंदोलन केले. यावेळी टोलनाका प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.

गेली पाच वर्ष नूतनीकरणाचे काम चाललेला पुणे-नाशिक महामार्ग 2017 साली 70 टक्के पूर्णत्त्वाच्या नियमावर टोल वसुलीसह सुरु झाला. त्यानंतरच्या कालावधीत ठेकेदार असलेल्या मॉन्टो कार्लो कंपनीने संगमनेर तालुक्यातून जाणार्‍या जवळपास 50 किलोमीटर लांबीच्या या महामार्गावरील प्रलंबित असलेली कामे पूर्ण करणे क्रमप्राप्त होते. मात्र टोल वसुलीसह हा महामार्ग सुरु होवून चार वर्षांहून अधिक लोटूनही ठेकेदाराने या कामांकडे दुर्लक्ष केले असून अनेक ठिकाणचे उपरस्ते (सर्व्हिसरोड) चक्क गिळून टाकले आहेत. त्यामुळे महामार्गाच्या लगत असलेल्या वाड्या-वस्त्यांकडे जाण्यासाठी नागरिकांनी धोकादायकरित्या महामार्ग ओलांडण्याची वेळ आली आहे.

या अपुर्‍या कामांमुळे महामार्गावरील अपघातांमध्येही मोठी वाढ झाली असून आत्तापर्यंत अनेक निष्पापांचे बळीही गेले आहेत. ठेकेदार कंपनीने नाशिकहून संगमनेरकडे येताना कोल्हार-घोटी राज्यमार्गावर खाली उतरण्याचा रस्ताच गिळून टाकल्याने वाहनधारकांना चुकीच्या पद्धतीने आपला व प्रवाशांचा जीव धोक्यात घालून अकोले रस्त्यावर खाली उतरावे लागते. यामुळे गेल्या चार वर्षात मालपाणी स्क्वेअरजवळ धोकादायक वळण घेतांना अनेक वाहनांना भिषण अपघात झाले असून त्यात अनेकांचा बळी जाण्यासह गंभीर दुखापतीही झाल्या आहेत. मात्र भ्रष्टाचाराची किड लागलेल्या ठेकेदार कंपनीला अजूनही नागरी जिवाची किंमत समजली नसल्याने हा महामार्ग सुरु करताना जी स्थिती होती, त्यात आजही कोणताही बदल झालेला नाही.

मॉन्टो कार्लो या कंपनीने 2017 साली महामार्ग सुरु करताना सरसकट टोल वसुलीचे सूत्रही राबविले होते. मात्र स्थानिकांनी त्याविरोधात आंदोलन उभे केल्यानंतर ठेकेदाराला त्यापुढे झुकावे लागले. तेव्हापासून स्थानिक असल्याचे ओळखपत्र दाखवणार्‍या सर्व वाहनांना हा मार्ग ‘टोल फ्री’ होता. मात्र सध्या याच कारणावरुन हिवरगाव पावसा येथील टोलनाका पुन्हा चर्चेत आला असून ओळखपत्र पाहून सोडून देण्यात आलेल्या वाहनाकडूनही ‘फास्ट टॅग’चा आधार घेवून ‘टोलधाड’ टाकली जात आहे. त्यामुळे संगमनेरात मोठा असंतोष खदखदू लागला असून त्याविरोधात आवाज उठविण्यासाठी आता दस्तुरखुद्द सामान्य माणूसच पुढे सरसावला.

यासाठी स्थानिक सामाजिक कार्यकर्ते अमोल खताळ, किशोर डोके, जनार्दन आहेर, अण्णासाहेब काळे, रमेश काळे, अविनाश थोरात, नारायण खुळे, नीलिमा घाडगे, सचिन साळवे, दीपक साळुंके, अक्षय थोरात, अजिंक्य उपासनी, हाफिज शेख, नानासाहेब पर्बत, शीतल हासे, सदाशिव हासे, विलास डमाळे, योगेश सूर्यवंशी, दत्तू नाईक, विजय आढाव, श्याम रहाणे, योगेश बिचकर, बुवाजी खेमनर, लखन घोरपडे आदिंनी ‘आम्ही संगमनेरकर’ या बॅनरखाली एकत्रित येत बुधवारी (ता.8) सकाळी 10 वाजता अभूतपूर्व एकीचे दर्शन घडवत हिवरगाव पावसा टोलनाक्यावर धडक देत स्थानिकांना मोफत प्रवासाची सुविधा असताना सक्तीने टोल वसुली कशी केली जाते याचा जाब टोलनाका प्रशासनाला विचारला. यावेळी पुणे-नाशिक महामार्ग रोखून ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर ठेकेदार कंपनीने रस्त्याची अर्धवट राहिलेली सर्व कामे पूर्ण करावीत, संपूर्ण महामार्गाची दुरुस्ती करावी, बंद असलेले पथदिवे त्वरीत सुरु करावेत व अपूर्ण राहिलेल्या उपरस्त्यांची (सर्व्हिस रोड) त्वरीत कामे पूर्ण करावी अशा महत्त्वाच्या मागण्या केल्या. हे आंदोलन राजकारणविरहित नागरिकांनी नागरिकांसाठी करण्याचा निर्णय घेतला होता म्हणून, आंदोलनात संगमनेरकर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता.

Visits: 13 Today: 2 Total: 115118

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *