ऐन पावसाळ्यातही पिंपळगाव देपा परिसर तहानलेलाच! टँकरने होतोय पाणी पुरवठा; तर शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत..

नायक वृत्तसेवा, घारगाव
यंदा वरुणराजाने कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत अक्षरशः हाहाकार उडवून दिला. मात्र, अहमदनगर जिल्ह्याकडे कानाडोळा केला. यामुळे जिल्ह्यातील मुळा, भंडारदरा व निळवंडेसह इतर धरणेही अद्याप भरलेली नाहीत. याचबरोबर संगमनेर तालुक्यातील कायमच दुष्काळाच्या झळा सोसणार्या पठारभागात ऐन पावसाळ्यात टँकर सुरू असल्याचे दुर्दैवी चित्र दिसत आहे. पिंपळगाव देपासह पाच वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे पावसाळ्यातही हे गाव तहानलेलेच आहे.

मागील तीन-चार वर्षात पावसाने सर्वदूर हजेरी लावल्याने पाण्याचे स्त्रोत तुडूंब भरले होते. पठारभागातीलही ओढे-नाले, जलाशये भरलेली होती. यंदा याच्या उलट चित्र दिसत आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने कडक ऊन पडले आहे. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त असतानाच सामान्य नागरिकही पिण्याच्या पाण्यासाठी पावसाची प्रतीक्षा करत आहे. कायमच दुष्काळाच्या छायेत राहण्याची सवयच झाल्याने पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो. दोन-तीन किलोमीटरची पायपीट करुन डोक्यावर हंडाभर पाणी वाहून आणावे लागते. अशी दैनंदिन कसरत बाया-बापड्यांना करावी लागते.

मात्र, शासनाकडून पिंपळगाव देपासह मोधळवाडी, खंडेरायवाडी, उपळीवस्तीसह इतर दोन वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा होत आहे. ठिकठिकाणी ग्रामस्थ मोठ-मोठ्या प्लास्टिक टाक्या व ड्रम उभे करुन ठेवतात. हे पाणी साठवून काटकसरीने वापरतात. सध्या पावसाळा सुरू आहे. तरी देखील टँकरने पाणी पुरवठा होत असल्याने सामान्य नागरिकांसह शेतकरी मोठ्या पावसाची वाट बघत आहे.

टोमॅटोचे आगार म्हणून पिंपळगाव देपा परिसर सुप्रसिद्ध आहे. येथील शेतकरी पावसाचे पाणी अडवून, वेळप्रसंगी टँकरद्वारे विकतचे पाणी आणून टोमॅटोचा हंगाम काढतात. यावरच त्यांचे उत्पन्न अवलंबून असते. मात्र, वरुणराजाने दडी मारल्याने शेतकरी देखील चिंताग्रस्त आहेत.
