मेहेंदुरीमध्ये संतप्त शेतकर्‍यांनी निळवंडेच्या कालव्यांचे बंद पाडले! माजी आमदार वैभव पिचडांकडून पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांची कानउघडणी

नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यातील मेहेंदुरी येथील संतप्त शेतकर्‍यांनी सोमवारी (ता.21) एकत्र येऊन निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचे काम बंद पाडले. यावेळी माजी आमदार वैभव पिचड यांनी अधिकार्‍यांची चांगलीच कानउघाडणी करून शेतकर्‍यांच्या समस्यांचे निराकरण करण्याबाबत खडसावले.

मेहेंदुरी ते फरगडे वस्ती दरम्यान निळवंडे डाव्या कालव्याचे काम जलद गतीने चालू आहे. या कामाचा ठेकेदार बेजबाबदारपणे काम करत आहे. अनेक ठिकाणी शिवार रस्ते फोडल्यामुळे ऊस तोडणी बंद झाली आहे. तोडलेला ऊस शेतातच पडून आहे. तसेच पाईपलाईनची मोडतोड झाल्यामुळे शेताला पाणी देणे मुश्कील झाले आहे. चारीच्या कडेने असणार्‍या घरांच्या जवळच दहा पंधरा फुटाचे खड्डे केल्याने त्यात पाळीव प्राणी, मुले व वृध्द माणसे पडून छोटे-मोठे अपघात होत आहेत. शिवार रस्ते फुटल्यामुळे जनावरांचा चारापाणी, ऊस वाहतूक, दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाल्याने शेतकर्‍यांनी अधिकार्‍यांकडे तक्रार केली. परंतु अधिकार्‍यांनी दुर्लक्ष केल्याने ठेकेदाराचा बेजबाबदारपणा वाढतच गेला.

अखेर सोमवारी संतप्त शेतकर्‍यांनी एकत्र येऊन माजी आमदार पिचड यांच्या नेतृत्वाखाली निळवंडे डाव्या कालव्याचे काम बंद पाडले. तात्काळ पाटबंधारे विभागाचे अधिकारी वाणी घटनास्थळी आले असता त्यांना घेराव घालण्यात आला. यावेळी पिचड यांनी त्यांना शेतकर्‍यांच्या अडचणी समजावून घेऊन त्या सोडविल्यानंतर कालव्याचे काम चालू करा; नाहीतर उग्र आंदोलन केले जाईल असा इशारा दिला.

यावेळी उपसरपंच संजय फरगडे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गिरजाजी जाधव, तालुका सरचिटणीस यशवंत आभाळे, अमोल येवले, सुधाकर आरोटे, राहुल देशमुख, विकास बंगाळ, कैलास आरोटे, नाजिम शेख, पांडुरंग फरगडे, भाऊसाहेब येवले, चंद्रभान आरोटे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Visits: 13 Today: 1 Total: 115711

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *