सलग सुट्ट्यांमुळे भंडारदरा परिसरात पर्यटकांची तोबा गर्दी वाहतुकीत बदल आणि राजूर पोलिसांचा ठिकठिकाणी कडक ‘वॉच’

नायक वृत्तसेवा, राजूर
अहमदनगर जिल्ह्याचे चेरापुंजी असलेल्या भंडारदरा परिसरात दरवर्षी स्वातंत्र्य दिनी मोठी गर्दी होते. यंदा कोविडचे सावट असल्याने गर्दी अपेक्षेप्रमाणे कमी होईल असा अंदाज होता. मात्र, दुसरा शनिवार, रविवारी स्वातंत्र्य दिन आणि सोमवारी पारशी नववर्ष असल्याने सलग तीन सुट्ट्या आल्याने तोबा गर्दी झाली होती. पावसाबरोबर निसर्गाचा मनमुराद आनंद पर्यटकांनी लुटला.

पर्यटकांची पंढरी असलेल्या भंडारदरा धरण परिसरात भटकंती करण्यासाठी रविवारी (ता. 15) साधारण 15 ते 20 हजार पर्यटक आले होते. तसेच कळसूबाई गडावरही तुफान गर्दी झाली होती. मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे व अहमदनगर येथील पर्यटकांची संख्या जास्त होती. तर रंधा धबधबा परिसरात गर्दी ओसंडून वाहत होती. याचबरोबर कोकणकडा, हरिश्चंद्रगड, अमृतेश्वर मंदिर रतनवाडी, सांदण दरी येथेही पर्यटकांनी गर्दी केली होती.

सध्या पावसामुळे रस्ते मोठ्या प्रमाणात खराब झालेले आहेत. त्यातच अरुंद रस्ते असल्यामुळे वाहतूक कोंडी होवून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून वाहतूक नियमांत बदल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी तसे आदेश दिले होते. त्यानुसार रंधा फाटा येथून भंडारदरा येथे जाण्यासाठी प्रवेश बंद करण्यात आला होता. शेंडी-भंडारदरा येथे जाण्यासाठी वाकी फाटा, वारंघुशी फाटा येथून प्रवेश होता. एकेरी वाहतुकीचा मार्ग वारंघुशी फाटा – वाकी फाटा – चिचोंडी फाटा – यश रिसॉर्ट – शेंडी – भंडारदरा धरण स्पील्वे गेट – भंडारदरा गाव – गुहिरे – रंधा मार्गे इच्छित स्थळी मार्ग केला होता. यावेळी राजूर पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन खैरनार, कर्मचारी फटांगरे, मोरे, डगळे, आघाडे आदी पोलीस विशेष लक्ष ठेवून होते.

पर्यटकांनी कोरोनाचा प्रादुर्भाव बघता नियमावलीचे पालन करणे बंधनकारक असतानाही काही पर्यटक मास्क न घालणे पसंत करताना दिसले. विशेष म्हणजे तपासणी नाक्यावर दारु सापडल्यास ओतून देण्यात येत होती. अपघात आणि गुन्हे टाळण्यासाठी पोलीस वारंवार पर्यटकांना सूचना देत होते. तत्पूर्वी दरवर्षी 15 ऑगस्टला भंडारदरा धरण भरण्याचा विक्रम यंदा पुन्हा खंडित झाला. यामुळे अनेक पर्यटकांचा हिरमोड देखील झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *