शेतकर्याची कमाल; वाहून जाणार्या पाण्यावर फुलविला नऊ एकर टोमॅटोचा फड! वासुदेव गुंड यांनी सूक्ष्म सिंचन व्यवस्थापनासह पाणी बचतीचा इतर शेतकर्यांनाही दिला संदेश

नायक वृत्तसेवा, घारगाव
निसर्गाचा सहवास लाभूनही कायमच संगमनेर तालुक्यातील पठारभाग दुष्काळी छायेत असतो. त्यातच येथील लोकांचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून असल्याने दरवर्षी शेतीचे उत्पादन काढताना कस लागतो. शिवाय एकामागोमाग एक संकटे येऊनही येथील शेतकरी मोठ्या हिंमतीने हंगाम यशस्वी करतात. याचाच प्रत्यय यावर्षी आला असून, पिंपळगाव देपा येथील प्रयोगशील तरुण शेतकरी वासुदेव पुंजा गुंड यांनी वाहून जाणारे पाणी पाईपलाईनच्या माध्यमातून शेततळ्यात अडविले. त्यावर तब्बल नऊ एकर टोमॅटोचा फड फुलवून सूक्ष्म सिंचन व्यवस्थापनातून पाणी बचतीचा संदेशही दिला. त्यांच्या या अनोख्या प्रयोगाची परिसरात चर्चा असून, अनेक शेतकरी भेट देऊन पाहणी करत आहे.

पठारभागातील पिंपळगाव देपा, खंडेरायवाडी, मोधळवाडी या गावांसह आजूबाजूच्याही गावांमधील शेती ही निसर्गावरच अवलंबून आहे. विशेष या भागात दरवर्षी टोमॅटोची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. त्यादृष्टीने अनेक शेतकर्यांनी शेततळे व इतर जलस्त्रोतांची निर्मिती केलेली आहे. परंतु, पावसाची अवकृपा झाली तर संपूर्ण नियोजन कोलमडून जाते. यावरही मात करत अनेक शेतकरी मल्चिंग पेपर व टँकरद्वारे विकतचे पाणी आणून हंगाम यशस्वी करतात. दरम्यान, गेल्या वर्षी या परिसरात चांगला पाऊस झाल्याने ओढे-नाले खळाळत होते. याच्या उलट यंदाचे चित्र असल्याने पिंपळगाव देपा येथील प्रयोगशील तरण शेतकरी गुंड यांनी पावसाचे वाहून जाणारे पाणी पाईपलाईनद्वारे शेतळ्यात अडविले. त्यानंतर हे पाणी मल्चिंग पेपरचा वापर करुन पावसाच्या भरवशावर मे महिन्यात तब्बल नऊ एकरावर टोमॅटोची लागवड केली.
![]()
सिंचनाच्या दृष्टीने नियोजनही केले. मात्र, ऐनवेळी पावसाने हुलकावनी दिल्याने हंगाम यशस्वी करण्यासाठी ऐनकेन प्रकारे पाणी उपलब्ध करण्याच्या हेतूने पावले उचलली. मग, वाहून जाणारे पावसाचे पाणी शेततळ्यात अडवून फड जिवंत ठेवण्यासाठी सुयोग्य नियोजन केले. दररोज पंधरा ते वीस मिनिटे पाणी टोमॅटो पिकाला देतात. याचा फायदा होवून आत्तापर्यंत दोन-अडीच हजाराच्या आसपास जाळ्या गेल्या आहेत. तर दहा लाख रुपयांच्या वर खर्च आला आहे. यातून किमान पंधरा ते वीस लाख रुपयांचे उत्पन्न काढण्याचा मनोदयही शेतकरी गुंड यांनी व्यक्त केला आहे.

या अनोख्या प्रयोगातून इतर शेतकर्यांनाही नवी दिशा मिळाली असून, अनेक शेतकरी हा सूक्ष्म सिंचनाचा प्रकल्प पाहण्यास भेटी देत आहेत. तर सर्वत्र त्यांच्या अनोख्या प्रयोगाची चर्चा होत असून एकीकडे कोविड तर दुसरीकडे निसर्गाच्या संकटात धोक्यात आलेल्या शेती व्यवसायाला यातून नवसंजीवनीच मिळाल्याचे अनेक शेतकरी बोलत आहे.
