ज्ञानेदव दहातोंडे हत्या प्रकरणातील आरोपी अद्यापही मोकाटच! राज्याच्या गृहमंत्र्यांसह पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना निवेदन

नायक वृत्तसेवा, नेवासा
तालुक्यातील चांदा येथील तरुण ज्ञानदेव सोपान दहातोंडे यांची हत्या होऊन महिना उलटत आला तरी सदर प्रकरणातील आरोपींना अद्यापही अटक झाली नाही. तसेच गावात गुंडगिरी, अवैध धंद्यांचा बंदोबस्त करा यांसह इतर मागण्यांसाठी चांदा येथील सर्वपक्षीय पदाधिकारी व ग्रामस्थांनी आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे. त्यासंदर्भात गृहमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले असून, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनाही निवेदन देण्यात आले आहे.

चांदा येथील नदीजवळ भरचौकात 3 जून रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास ज्ञानदेव दहातोंडे (वय 42) यांची धारदार शस्त्राने हत्या करून हल्लेखोर पळून गेले होते. या घटनेला महिना उलटत आला असून अजूनही या प्रकरणातील आरोपींना अटक झाली नाही. या संदर्भात चांदा येथील सर्वपक्षीय पदाधिकारी आणि प्रमुख ग्रामस्थांची बैठक झाली. त्यामध्ये पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर सर्वांनीच तीव्र नाराजी व्यक्त करत आंदोलनाचा निर्णय घेतला.

सदर निवेदनात म्हटले आहे की, ज्ञानदेव दहातोंडे यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी मोकाट असून दहातोंडे यांच्या नातेवाईकांनी तपासी अधिकार्यांना तपासाबाबत विचारणा केली तर त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे देऊन बोळवण केली जात आहे. गावात खुलेआम अवैध धंदे सुरू आहेत. दादागिरी, गुंडगिरी वाढली असून सामान्य जनतेला त्याचा प्रचंड त्रास होत आहे. गावात गावठी कट्ट्यासारखी हत्यारे मोठ्या प्रमाणावर असल्याचा संशय व्यक्त होत आहे. या सर्व प्रकरणात पोलिसांकडून कोणतीच कारवाई होत नसून उलटपक्षी पोलिसांचे गुन्हेगारांना अभय असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत.

दहातोंडे हत्या प्रकरणाचा तपास लावावा, गावातील गुंडगिरीचा बंदोबस्त करावा आणि तपासात दिरंगाई करणार्या अधिकार्यांवर कारवाई करावी. अन्यथा तपास दुसर्या सक्षम अधिकार्यांकडे द्यावा या मागण्यांसाठी मंगळवार दिनांक 6 जुलै रोजी गाव बंद ठेवण्यात येणार असून सकाळी बाजारतळावर निषेध सभा घेण्यात येणार आहे. त्यानंतरही जर तपास लागला नाही तर अहमदनगर-औरंगाबाद रस्त्यावरील घोडेगाव चौफुला येथे 12 जुलै रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

या निवेदनावर शेतकरी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजी दहातोंडे, पंचायत समितीचे माजी सभापती कारभारी जावळे, अनिल अडसुरे, मुळाचे संचालक बाबुराव चौधरी, तंटामुक्ती अध्यक्ष मोहन भगत, राष्ट्रवादी सेलचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब जावळे, भाजपा तालुका उपाध्यक्ष कैलास दहातोंडे, माजी सरपंच डॉ. विकास दहातोंडे, माजी सरपंच संजय भगत, उपसरपंच चांगदेव दहातोंडे, बन्सी गायकवाड, ज्ञानदेव दहातोंडे, सुदाम जावळे, ग्रामपंचायत सदस्य पोपट दहातोंडे, नितीन दहातोंडे, अॅड. योगेश दहातोंडे, अरुण दहातोंडे, शिवाजी दहातोंडे, संतोष दहातोंडे, अण्णा दहातोंडे, शरद दहातोंडे, बाबासाहेब दहातोंडे, सुजित दहातोंडे आदिंसह ग्रामस्थांच्या सह्या आहेत.

