अहमदनगरच्या कुप्रसिद्ध नयन तांदळे टोळीवर ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई! पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके करणार तपास; इतरही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता
नायक वृत्तसेवा, नगर
अहमदनगर जिल्ह्यात मालमत्ता विषयक गुन्ह्यांकरिता कुप्रसिद्ध असलेल्या नयन तांदळे टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे. तर तपास पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, नगर येथील नयन तांदळे टोळी कोणताही कामधंदा न करता संघटितपणे बेकायदेशीररित्या स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी हिंसाचाराचा वापर करून जबरी चोरी, दरोडा टाकून दहशत करीत होती. याप्रकरणी सुपा पोलिसांत अक्षय चखाले (रा.निगडी, पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुरनं.504/2020 भादंवि कलम 395, 341 नुसार गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्हा कुप्रसिद्ध नयन तांदळे टोळीने केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर नयन तांदळेसह टोळीतील अन्य चार सदस्यांना अटक करण्यात आली होती. या गुन्ह्याची गांभीर्याने दखल घेऊन पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अजित पाटील मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांना सादर केला होता. सदर प्रस्तावास त्यांनी मंजुरी दिली असून तपास पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे.
दरम्यान, या टोळीचा म्होरक्या नयन राजेंद्र तांदळे याच्यावर सुपा पोलिसांत दोन तर तोफखाना पोलिसांत सहा गुन्हे दाखल आहेत. दुसरा सदस्य विठ्ठल साळवे याच्यावर सुपा पोलिसांत दोन व तोफखानामध्ये एक, तिसरा अक्षय ठोंबरे याच्याविरुद्ध सुपा येथे एक, चौथा शाहुल पवार याच्यावर सुपा पोलिसांत चार गुन्हे दाखल आहेत. पाचवा सदस्य अमोल पोटे याच्यावर सुपा पोलिसांत तीन गुन्हे दाखल आहेत. पुढील तपास पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके हे करीत असून त्यांना पोलीस निरीक्षक नितीन गोकावे, पोलीस नाईक अमोल धामणे, साहेबराव ओहोळ, यशवंत ठोंबरे यांचे पथक सहाय्य करीत आहे.
संदीप मिटकेंची दमदार कामगिरी..
पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांनी नगर शहरात कार्यरत असताना गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घातला आहे. त्यांच्या कामगिरीची पोलीस वर्तुळासह सर्वसामान्यांत वेगळी ओळख निर्माण झाली आहे. त्यामुळेच कुप्रसिद्ध नयन तांदळे टोळीचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांच्याकडे तपास वर्ग करण्यात आला आहे.