चंदनापुरी घाटात टेम्पोला कारची पाठीमागून धडक! एकजण ठार तर चार जण किरकोळ जखमी; कारचा चुराडा
783
नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चंदनापुरी घाटात पुढे चालणार्या आयशर टेम्पोला पाठीमागून येणार्या कारने जोराची धडक दिली. या अपघातात कारचा चालक ठार झाला असून, अन्य चार जण किरकोळ जखमी झाले आहेत. सदर अपघात शुक्रवारी (ता.25) सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडला आहे.
519
याबाबत डोळासणे महामार्ग पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, आयशर टेम्पो (क्र. एम.एच.15/एफ.व्ही. 0951) हा पुणे येथून आळेफाटा मार्गे संगमनेरच्या दिशेने जात होता. दरम्यान, हा टेम्पो पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चंदनापुरी घाटात आला असता त्याच दरम्यान पाठीमागून भरधाव वेगाने येणारी कार (क्र. एमएच.05/डी.एक्स. 6364) हिने टेम्पोला जोराची धडक दिली. या अपघाताची माहिती समजताच डोळासणे महामार्ग पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली साईनाथ दिवटे, रमेश शिंदे, अरविंद गिरी, योगिराज सोनवणे, यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातात कारची मोठी मोडतोड झाल्याने जखमींना बाहेर काढताना पोलिसांसह नागरिकांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली.

त्यानंतर जखमींना रुग्णवाहिकेद्वारे उपचारार्थ संगमनेरच्या खासगी रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र कारचे चालक राजाराम नारायण म्हात्रे (वय 57, रा.बदलापूर, जि.ठाणे) यांचा अपचारापूर्वीच मृत्यू झाला. या अपघातात इतर चार जण किरकोळ जखमी झाले आहेत. दरम्यान या अपघातामुळे बराच वेळ वाहतूक ठप्प झाली होती. यामुळे पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने महामार्गाच्या बाजूला करुन वाहतूक सुरळीत केली.

