आमदार लंकेंकडून नेवासाफाटा येथील वृद्धाश्रमास किराणा भेट
आमदार लंकेंकडून नेवासाफाटा येथील वृद्धाश्रमास किराणा भेट
नायक वृत्तसेवा, नेवासा
पारनेरचे आमदार नीलेश लंके यांच्याकडून नेवासाफाटा येथील वृद्धाश्रमातील वृद्धांसाठी एक महिन्याभर पुरेल एवढा किराणा नुकताच सुपूर्द करण्यात आला आहे.

नेवासाफाटा येथे रावसाहेब मगर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या वृध्दाश्रमात धान्य होते; पण किराणा संपला होता. या संदर्भात मगर यांनी आमदार नीलेश लंके यांच्या व्हाट्सअॅपवर एक महिन्याचा किराणा देण्यासाठी विनंती केली. या विनंतीची दखल घेत आमदार लंके यांनी गोडेतेल एक डब्बा, तूप एक डब्बा, तर प्रत्येकी दहा किलो बेसनपीठ, तूरडाळ, मठडाळ, हरभराडाळ, मसूरडाळ, मूगडाळ, वाटाणे, साखर 40 किलो, चहापावडर दोन किलो, साबण वीस नग, अंगाचा साबण वीस नग, खोबरेल तेल दोन किलो, शेंगदाणे दहा किलो इत्यादी महिनाभर पुरेल इतका किराणा गाडी पाठवून वृद्धाश्रमाला सुपूर्द केला. दरम्यान, आमदार लंके यांनी वृद्धाश्रमाच्या मदतीसाठी निम्म्या रात्री फोन करा असा दिलासा देत साहित्य मिळाले का म्हणून विचारणाही केली. त्यांच्या या दानशूर वृत्तीचे वृद्धाश्रमात प्रार्थना म्हणत स्वागत केले. तर वृद्धाश्रम समितीच्या सर्व सदस्यांनी देखील आमदार लंके यांच्या कृतिशील कार्याचे कौतुक करत त्यांना धन्यवाद दिले आहे.

