शासनाच्या निषेधार्थ अकोले तहसीलवर एल्गार मोर्चा कोविड सोयी-सुविधांबाबत सापत्न वागणूक; दुकानांबाबतही घेतला महत्त्वाचा निर्णय
नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यातील कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस भयानक होत असताना शासनाचे ढिसाळ नियोजन आणि सापत्न वागणुकीच्या निषेधार्थ अकोले तहसील कार्यालयावर सामाजिक अंतर ठेवून शनिवारी (ता.17) दुपारी 1 वाजता एल्गार मोर्चा काढण्यात आला. यावेळी व्यापार्यांनी तहसीलदारांसमवेत बैठक घेऊन दुकाने उघडण्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव डॉ.अजित नवले यांनी फेसबुक लाईव्हद्वारे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना आवाहन केले होते ते म्हणाले, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून संगमनेर प्रांत कार्यालयाकडे 482 रेमडेसिवीर इंजेक्शन्स आली. परंतु प्रांत कार्यालयाने ती इंजेक्शने वाटण्यासाठी संगमनेर तहसीलदारांकडे दिली. त्यांनी 472 इंजेक्शने संगमनेरसाठी ठेवून केवळ 10 इंजेक्शने अकोल्याला दिली. वास्तविक, संगमनेर व अकोल्यातील रुग्णसंख्येत थोडाफार फरक म्हणजेच ‘उन्नीस-बीस’चा फरक असताना प्रांत कार्यालयाने न्याय वाटप करणे गरजेचे असताना अकोल्यावर हा अन्याय कशासाठी केला?
अकोल्यात दोन कोविड रुग्णालय असताना एकाला 10 तर दुसर्याला एकही नाही. अकोल्यात जी परिस्थिती आहे तशीच परिस्थिती महाराष्ट्रात आहे. ज्या तालुक्यांचा वरदहस्त आहे, त्या तालुक्यांना प्राणवायू व रेमडेसिवीरचा पुरवठा सुरळीत तर कमजोर तालुक्यांना कमी प्रमाणात पुरवठा हा अन्याय असून याच्या निषेधार्थ प्रातिनिधीक स्वरूपात अकोले तहसील कार्यालयावर एल्गार पुकारण्यात आला.
अकोले तहसील कार्यालयात काही प्रातिनिधीक व्यापार्यांबरोबर बैठक होऊन दुकाने उघडण्यासंदर्भात महत्वाचा निर्णय घेण्यात आला. यानुसार सोमवार ते शुक्रवारपर्यंत अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंतच चालू राहतील आणि शनिवार व रविवारी दवाखाने व औषधालये सोडता सर्व दुकाने बंद राहतील, असा निर्णय घेतला.