माहुली घाटात सत्तर फूट खोल दरीत कार कोसळली सुदैवाने तीन तरुण बालंबाल बचावले; मात्र कारचे मोठे नुकसान

नायक वृत्तसेवा, घारगाव
पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील डोळासणे शिवारातील माहुली घाटात गुजरात येथून भीमाशंकरला देवदर्शनासाठी चाललेल्या भाविकांच्या वाहनाला रविवारी (ता.7) हा अपघातात झाला. कार सुमारे सत्तर फूट दरीत कोसळल्यामुळे या कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवानं या विचित्र अपघातात कोणाचाही मृत्यू झालेला नाही. कारमधील तीन तरुण प्रवासी सुखरूप आहे.

महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरातमधील मितेश कथेरिया (वय 35), भार्गव रामोलिया (वय 25), स्नेहल पोकीया (वय 30) हे तिघे कार (जी.जे.16, सी.जी.7336) देवदर्शनासाठी नाशिक-पुणे महामार्गाने भीमाशंकरला निघाले होते. रविवारी सकाळी माहुली घाटातून जात असताना चालक मितेश याचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट महामार्ग सोडून सत्तर फूट खोल दरीत कोसळली. कारचे मोठे नुकसान झाले. तिघेही किरकोळ जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळाल्यावर डोळासणे महामार्ग वाहतूक पोलीस मदत केंद्राचे अरविंद गिरी, साईनाथ दिवटे, रमेश शिंदे, योगीराज सोनवणे यांनी अपघातग्रस्तांना तत्काळ मदत केली. जखमींना उपचारासाठी खाजगी रुग्णालयामध्ये दाखल केले. यापूर्वी माहुली घाटाच्या परिसरात असेच अनेक अपघात झाले आहे. उतार व अचानक वळण असल्याने वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज येत नसल्याने घाटातील रस्त्यावर जागोजागी गतिरोधक टाकण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.

Visits: 87 Today: 1 Total: 1113697

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *