पाणी फाउंडेशनची योजना प्रभावी राबविल्यास गावे समृद्ध होतील ः डॉ.मंगरुळे संगमनेर प्रांत कार्यालयात नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांसाठी एकदिवसीय कार्यशाळा
नायक वृत्तसेवा, संगमनेर
नव्याने निवडून आलेल्या सर्व ग्रामपंचायत सदस्यांकरिता समृद्ध गाव योजना अधिक चांगल्या पद्धतीने राबवण्यासाठी पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून केले जात असलेले काम दिशादर्शक आहे. ही योजना नवनिर्वाचित सदस्यांनी अधिक प्रभावीपणे राबविल्यास गावे अधिक समृद्ध होतील असा विश्वास प्रांताधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे यांनी व्यक्त केला आहे.
संगमनेर प्रांत कार्यालय येथे झालेल्या एकदिवसीय कार्यशाळेसाठी गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, पाणी फाउंडेशनचे विभागीय समन्वयक विक्रम फाटक, संदेश कारंडे, राजेंद्र जाधव आदी उपस्थित होते. या कार्यशाळेत नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य, जलमित्र, गावकरी, शासकीय ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, सीसी जनसेवक अशा 102 कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.
यावेळी पुढे बोलताना प्रांताधिकारी डॉ.मंगरुळे म्हणाले, पाणी हा सर्वात महत्त्वाचा घटक असून पाणी अधिक जमिनीमध्ये मुरविल्याने त्या गावात समृद्धी येते. पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून राज्यभर झालेले काम हे संपूर्ण देशासाठी अनुकरणीय असून आता प्रत्येक गावोगावी हे काम अधिक चांगले जर झाले तर गावे समृद्ध होतील. गाव समृद्ध झाले तर राज्य समृद्ध होईल म्हणून नवनिर्वाचित सदस्यांसाठी ही एक चांगली संधी असून प्रत्येकाने अधिक सक्रियतेने काम करावे असे आवाहन त्यांनी केले. गटविकास अधिकारी शिंदे म्हणाले, ग्रामपंचायत हा लोकशाही व्यवस्थेचा पाया आहे. तो अधिक सक्षमतेने चालविल्यास गावे विकसित होतील. यासाठी पंचायत समितीच्या माध्यमातून विविध योजना अधिक प्रभावीपणे राबवल्या गेल्या पाहिजे.
फाउंडेशनचे विक्रम फाटक यांनी विहिरीची पाणी पातळीचा अहवाल समजावून सांगितला. तर संदेश कारंडे यांनी पाणी फाउंडेशनच्या उपक्रमांची माहिती दिली. यावेळी अनेक जलमित्र व गावकर्यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यानंतर प्रत्यक्ष विहीर, बोरवेल गणना व हंगामनिहाय पिकांची माहिती प्रत्येकाला देण्यात आली.