लाचखोरांच्या पापाचे मडके पोलीस निरीक्षकांच्या माथ्यावर फुटले..! संगमनेर व अकोले ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांची मुख्यालयात रवानगी..!!
नायक वृत्तसेवा, संगमनेर
लाचखोरी, बेशिस्ती आणि बेअदबी खपवून घेणार नाही असा सज्जड इशारा देणार्या पोलीस उपअधीक्षक मनोज पाटील यांनी ‘बोले तैसा चाले’ या तत्त्वाचे पूर्णतः पालन केले आहे. संगमनेर शहर व अकोले पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी लाच घेताना रंगेहाथ पकडले गेल्याने त्याचे मडके त्या त्या पोलीस ठाण्यांच्या प्रभार्यांवर फोडण्यात आले असून या दोघांनाही तात्काळ मुख्यालयात हजर होण्याचे आदेश बजावण्यात आले आहेत. या वृत्ताला नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.प्रताप दिघावकर यांनी संगमनेर येथे दुजोरा दिला आहे.
दोनच दिवसांपूर्वी शनिवारी (ता.12) संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील लाचखोर पोलीस नाईक बापूसाहेब देशमुख हा नाशिच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला होता. एका कापड व्यावसायिकाची पत्नी घरातून निघून गेल्या प्रकरणी त्या व्यावसायिकाने शहर पोलीस ठाण्यात ‘हरविल्या’ची तक्रार दाखल केली होती. मात्र त्या दरम्यान ती आढळून आल्याने संबंधित व्यावसायिकाने तपासी अधिकारी असलेल्या पोलीस नाईक बापूसाहेब देशमुख याला संबंधितेचा तपास थांबविण्याची विनंती केली, त्याबदल्यात त्या लाचखोराने एक हजारांची मागी केली.
पत्नी हरविल्याचे दुःख घेवून पोलीस ठाण्यात आलेल्या इसमाला धीर देण्याऐवजी फिर्यादी आणि आरोपी अशा दोहींकडून केवळ मलिदा लाटणार्या या कर्मचार्यांच्या यापूर्वीही अनेक तक्रारी होत्या. मात्र त्याविरोधात कोणी एसीबीचे दार वाजवले नव्हते. मात्र यावेळी शेराला सव्वाशेर मिळाला आणि त्या कापड व्यावसायिकाने थेट नाशिकच्या लाचलुचपतकडे तक्रार केली आणि हा लाचखोर त्यात अलगद सापडला.
त्यानंतर अवघ्या दोनच दिवसांत संगमनेर शहर पोलीस ठाण्यापासून अवघ्या 22 किलो मीटर अंतरावर असलेल्या अकोले पोलीस ठाण्यात दुसरा अध्याय घडला. काल सोमवारी (ता.14) दुपारी एका कौंटुबिक वादाला सामोपचाराची झालर चढविल्याचा मोबादला म्हणून 10 हजारांची लाच मागीतली गेली. याप्रकरणी तक्रार दाखल होताच नाशिकच्या पथकाने अकोले पोलीस ठाण्याच्या आवारात सापळा रचला आणि या पोलीस ठाण्यातील हवालदार संतोष वाघ रंगहाथ पकडला गेला. अवघ्या दोनच दिवसांच्या अंतरात घडलेल्या या घटनांनी जिल्हा पोलीस दलातील वातावरण ढवळून निघाले.
कडव्या शिस्तीच्या पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी गेल्या महिन्यातच जिल्ह्यातील कोणत्याही पोलीस ठाण्याच्या हद्दित होणारी लाचखोरी, बेशिस्ती व बेअदबी खपवून घेणार नाही. असे कृत्य आढळून आल्यास त्याची शिक्षा त्या पोलीस ठाण्यांच्या प्रभार्यांना भोगावी लागेल असा सज्जड इशारा दिला होता. त्यामुळे या दोन्ही प्रकरणात दोन्ही ठिकाणच्या पोलीस निरीक्षकांवर कारवाई होणार हे त्याच दिवशी निश्चित होते. त्याचा अध्याय मात्र सोमवारी रात्री पोलीस मुख्यालयात लिहीला गेला. संगमनेरमधील लाचखोरीच्या प्रकरणात पोलीस निरीक्षक मुकूंद देशमुख यांच्यावर तर अकोल्यातील लाचखोरीच्या प्रकरणात पोलीस निरीक्षक अभय परमार यांच्यावर कारवाईची वीज कोसळली असून या दोन्ही अधिकार्यांना तात्काळ मुख्यालयात हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या वृत्ताने अवघ्या जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.प्रताप दिघावकर यांनी पदभार घेतल्यानंतर जिल्हा पोलीस दलातील सर्व अधिकार्यांच्या अहमदनगर येथील बैठकीत शिस्तीच्या धड्यांसह लाचखोरी व अवैध धंद्यांना प्रोत्साहनासारखे प्रकार खपवून घेणार नसल्याचा इशारा दिला होता. ज्या पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात विशेष पोलीस निरीक्षकांचे पथक कारवाई करील त्या ठिकाणच्या प्रभार्यांवरही कारवाई होईल असेही त्यांनी त्याच बैठकीत जाहीर केले होते. पोलीस अधीक्षक मनोज पाटील हे देखील याच तत्त्वाचे असून त्यांनीही अशा प्रकारांबद्दल तेथील प्रभार्यांना कारवाईस सामोरे जावे लागेल असे बजावले होते. या दोन्ही वरीष्ठांनी त्यानुसार कारवाई करुन ‘बोले तैसा चाले’ याची प्रचिती दिली आहे. या कारवाईबाबत विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.दिघावकर यांनी दुजोरा दिला आहे.