जिल्हा बँक निवडणुकीत शिवसेनेची एन्ट्री! बिनविरोधाच्या फॉर्म्युल्यात नवा अडसर; संगमनेरमधून तिघांचे उमेदवारी अर्ज..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी जिल्ह्यातील प्रमुख राजकीय शक्ती एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरु असतानाच, महायुतीतील महत्त्वाचा घटक असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने स्वतंत्रपणे उमेदवार मैदानात उतरविल्याने या प्रयत्नांना नवे वळण मिळाले आहे. संगमनेर तालुक्यातून शिवसेनेच्या तीन उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आता बिनविरोधाचा ‘फॉर्म्युला’ कितपत टिकतो, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

संगमनेर तालुक्यातील तीन उमेदवारांनी अर्ज दाखल करताना आमदार अमोल खताळ, आमदार विठ्ठल लंघे आणि माजी खासदार सदाशिव लोखंडे यांची उपस्थिती विशेष चर्चेची ठरली. उपलब्ध माहितीनुसार, शेती सहकारी संस्था मतदारसंघातून निमज येथील बादशाह दत्तू गुंजाळ, शेतीपूरक व शेतीमाल प्रक्रिया व पणन संस्था मतदारसंघातून मंगळापूर येथील शंकर मारुती वाळे, तर अनुसूचित जाती-जमाती राखीव मतदारसंघातून पंढरीनाथ माधव इल्हे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

या घडामोडींकडे केवळ तीन उमेदवारांच्या उमेदवारीपूरते पाहणे संयुक्तिक ठरणार नाही. गेल्या काही दिवसांत जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी जिल्ह्यातील परस्परविरोधी राजकीय गट एकत्र येताना दिसले आहेत. संगमनेरमध्ये झालेल्या बैठकीत माजीमंत्री बाळासाहेब थोरात आणि माजी खासदार डॉ.सुजय विखे-पाटील एकाच व्यासपीठावर आले. दुष्काळी परिस्थिती आणि सहकार क्षेत्रातील स्थैर्याचा मुद्दा पुढे करीत बिनविरोध निवडणुकीसाठी प्रयत्न करण्याचे संकेत या बैठकीत देण्यात आले.

विशेष म्हणजे, गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्याच्या राजकारणात परस्परांचे प्रमुख विरोधक म्हणून पाहिले गेलेले थोरात आणि विखे यांचे एकत्र येणे हीच मोठी राजकीय घडामोड मानली जात असताना, या प्रक्रियेत महायुतीतील सर्वच घटकांमध्ये एकमत आहे का, हा प्रश्न पुढे आला. विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनीच या बैठकीच्या पार्श्वभूमीवर भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली होती. त्यानंतर शिंदे शिवसेनेने स्वतंत्र बैठक घेत निवडणूक पूर्ण ताकदीने लढविण्याचे संकेत दिले.

याच पार्श्वभूमीवर संगमनेरमधून शिवसेनेचे तीन अर्ज दाखल होणे महत्त्वाचे ठरते. विशेषतः हे अर्ज पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या आदेशाने दाखल होत असल्याचे सांगितले जात असल्याने, जिल्हा बँकेच्या जागावाटपात शिवसेनेला किती प्रतिनिधित्व मिळते आणि स्थानिक पातळीवर पक्षाची स्वतंत्र राजकीय ताकद कशी मांडली जाते, याची उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करणे म्हणजे अंतिम लढत निश्चित होणे नव्हे; छाननी, माघारीची मुदत आणि अंतिम उमेदवारांची संख्या यानंतरच निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.

या सर्व घडामोडींमध्ये सभापती प्रा.राम शिंदे यांनी शेवटच्या क्षणी उमेदवारी अर्ज दाखल न करण्याचा निर्णय घेतल्याने जिल्हा बँकेच्या राजकारणात आणखी एक महत्त्वाची घडामोड घडली. गेल्या महिनाभरापासून त्यांनी सहकार क्षेत्रातील नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या आणि काही दिवसांपूर्वी उमेदवारी अर्जही घेतला होता. मात्र 5 ऑक्टोबर रोजी त्यांनी उमेदवारी दाखल न करण्याचे जाहीर केले. आपला निर्णय कोणत्याही दबावामुळे किंवा व्यक्तिगत कारणामुळे नसून विधान परिषदेच्या सभापतीपदाची प्रतिष्ठा लक्षात घेऊन घेतल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी निवडणुकीतून आपण माघार घेतली असली तरी आपल्या समर्थक उमेदवारांना पूर्ण पाठिंबा राहील, असेही त्यांनी सांगितले.

त्यामुळे त्यांची स्वतःची उमेदवारी मागे पडली असली तरी त्यांच्या समर्थकांची भूमिका निवडणुकीत महत्त्वाची राहू शकते. दुसरीकडे डॉ.सुजय विखे-पाटील यांनीही बिनविरोध निवडणुकीसाठी चर्चा सुरु असल्याचे सांगतानाच, आवश्यक वाटल्यास निवडणूक लढण्याची तयारी असल्याचे स्पष्ट केले आहे. सभापती प्रा.राम शिंदे यांना विश्वासात घेऊनच पुढील प्रक्रिया होईल, असेही त्यांनी नमूद केले. म्हणजेच एका बाजूला थोरात-विखे यांच्या माध्यमातून बिनविरोध निवडणुकीचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे, तर दुसर्या बाजूला शिंदे शिवसेनेची स्वतंत्र भूमिका आणि विविध मतदारसंघांतून दाखल होत असलेले उमेदवारी अर्ज या प्रयत्नांसमोर अडसर निर्माण करीत असल्याचे आता दिसू लागले आहे.

