अखेर संगमनेरच्या शिवस्मारकाचा ऐतिहासिक करार! डॉ.आंबेडकर स्मारकाच्या कामालाही गती; आमदार तांबे यांच्या निधीतून पन्नास लाख..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या अनेक वर्षांपासून शिवप्रेमींकडून होत असलेली अश्वारुढ प्रतिमेसह शिवस्मारकाची मागणी आता पूर्ण होताना दिसत आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या जागेबाबत राज्य परिवहन महामंडळाने संगमनेर नगरपालिकेशी करारही केला असून स्मारकाच्या प्रत्यक्ष कामाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यासोबतच भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या सुशोभिकरणाचे कामही सुरु होणार असून त्यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांनी आपल्या निधीतून 50 लाखांची घोषणा केली आहे. आज नागपंचमीच्या दिवशी हा करार झाल्याने त्याला ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले असून तब्बल पाच दशकानंतर संगमनेर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वारुढ प्रतिमा उभारली जाणार आहे. या विषयावरुन आगामी काळात शहरातील राजकारण रंगण्याचीही शक्यता आहे.

संगमनेर शहराला मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. दोन वर्ष वय असलेल्या औरंगजेबासह त्याचा भाऊ दाराशुको आणि लावण्यावती आई मुमताज बेगम यांना तब्बल दोन वर्ष संगमनेरच्या गढी किल्ल्यात ओलीस ठेवण्यात आले होते. त्या शिवाय या परिसरात शहाजीराजे व जिजाऊ साहेबांचाही वावर असल्याचे दाखले इतिहासात सापडतात. शिवकालात 1679 साली जालना लुटीनंतर माघारी परतताना छत्रपती शिवाजीराजे संगमनेरमार्गे पट्टेकिल्ल्यावर गेले होते. संगमनेर परिसरात मुघली सैन्याशी मराठ्यांचा सामना झाल्याच्याही कथा आहेत, मात्र त्याला कागदोपत्री संदर्भ आढळत नाहीत.

पेशवाईच्या काळातही संगमनेरला विशेष महत्व होते. अगदी प्राचिनकाळापासून संगमनेर, सिन्नर व जुन्नर येथील बाजारपेठांना अनन्य महत्व असल्याचे दाखलेही सापडतात. संगमनेर शहरात 1860 साली नगरपरिषदेची स्थापना झाली होती. स्थापनेनंतर तब्बल 120 वर्षांनी पालिकेच्यावतीने अरगडेगल्लीतील आजच्या ठिकाणी अधार्र्कृती शिवप्रतिमा बसवली होती. तेव्हापासून संगमनेरचे ऐतिहासिक महत्व लक्षात घेवून शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ प्रतिमेसह भव्य स्मारक असावे अशी असंख्य शिवप्रेमींची मागणी होती.

त्यासाठी 2018 मध्ये तत्कालीन नगराध्यक्षा दूर्गा तांबे यांच्या सूचनेवरुन पालिका कौंसिलने ठराव करुन बसस्थानकाच्या आवारात अश्वारुढ प्रतिमा बसवण्याचा संकल्प केला होता. मात्र राज्य परिवहन महामंडळाकडून जागा देण्यास टाळाटाळ झाल्याने या दरम्यान चार वर्षांचा कालावधी निघून जाण्यासह पालिकेवर प्रशासकांचे राज्य आले तर, राज्यातही मोठी उलथापालथ झाली. त्यातून नाट्यमय घडामोडीनंतर नाशिक पदवीधर मतदारसंघातून अपक्ष निवडून आलेल्या आमदार सत्यजीत तांबे यांनी 2023 मध्येच तत्कालीन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकरवी बसस्थानकाच्या उत्तर-पूर्व प्रवेशद्वाराजवळील 1.25 मीटर बाय 4 मीटर आकाराची जागा देण्यास मंजूरी मिळवली. मात्र पालिकेने किमान दोन हजार चौरस फूटाची मागणी केल्याने गेल्या तीन वर्षांपासून हा विषय अधांतरीत होता.

दरम्यानच्या काळात पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांसाठी निधी देण्याची घोषणा केली. विधानसभा निवडणुकीनंतर आमदार अमोल खताळ यांनीही या दोन्ही स्मारकांचा वारंवार उल्लेख करीत हा विषय आपल्या राजकीय अजेंड्यावर घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पालिकेच्या निवडणुकीतही स्मारकांचा विषय जिव्हाळ्याचा म्हणून जाहीरनाम्यात स्थान मिळवून गेला. इतक्या सगळ्या घडामोडी घडूनही प्रत्यक्षात मात्र कोणतीच कृती घडत नसल्याने शिवप्रेमींमध्ये मात्र मोठी चलबिचल होती.

अखेर आजचा नागपंचमीचा मुहूर्त साधून पालिकेने संगमनेरच्या शिवप्रेमींसह आंबेडकरी जनतेला सुखद धक्का दिला असून राज्य परिवहन महामंडळाने जाहीर केलेल्या क्षेत्रफळाबाबतचा करार पूर्ण झाला आहे. एस.टी.चे विभागीय नियंत्रक व पालिकेचे मुख्याधिकारी या दोघांनी या ऐतिहासिक करारावर सह्या केल्याने बसस्थानकाच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ प्रतिमेचा प्रश्न सुटला असून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सध्याच्या स्मारकासह त्यालगतच्या पालिकेच्या चेकनाक्याच्या जागेचा वापर करुन भारतरत्नांची पूर्णाकृती प्रतिमा उभारली जाणार आहे.

या दोन्ही स्मारकांसाठी प्रत्येकी एक कोटी रुपयांचा खर्च होणार असून त्यातील 50 लाखांचा निधी पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे आपल्या विकास निधीतून देणार आहेत. याशिवाय लोकवर्गणी आणि उर्वरीत रक्कम पालिका खर्च करणार आहे. या करारामुळे गेल्या अनेक वर्षांपासूनची शिवप्रेमी व आंबेडकरप्रेमींची मागणी आता पूर्ण होणार असून या दोन्ही स्मारकांच्या कामाबाबतच्या निविदा यापूर्वीच प्रसिद्ध झाल्याचेही सांगण्यात आले आहे.

संगमनेरातील छत्रपतींचे अश्वारुढ स्मारक गेल्या पाच वर्षात राजकीय चर्चेत राहीले असून त्यावरुन वेळोवेळी मोठा श्रेयवाद रंगल्याचेही बघायला मिळाले आहे. विशेष म्हणजे वर्षभरापूर्वी या स्मारकासाठी जिल्हा नियोजन फंडातून एक कोटी रुपये देण्याची घोषणाही झाली होती. मात्र त्या उपरांतही शहरातील शिवस्मारक चर्चेच्या पलिकडे गेले नव्हते. अखेर या विषयात आता आमदार सत्यजीत तांबे यांनी बाजी मारली असून आजच्या नागपंचमीचा मुहूर्त साधून त्यांनी परिवहन महामंडळाच्या जागा हस्तांतरणाचा करारही पूर्ण करुन घेत 50 लाख रुपयांचा निधी जाहीर केल्याने येणार्या काही महिन्यांतच संगमनेरातील ही दोन्ही बहुचर्चीत स्मारके प्रत्यक्षात दिसण्याची शक्यता आहे.

