संगमनेर मतदारसंघातील 26 हजार मतदारांना ‘रेड कार्ड’! याद्यांच्या शुद्धीकरणाने राजकीय गणिते बिघडणार; पराभवाच्या अंतरापेक्षा वगळलेली नावे दीडपट..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
भारत निवडणूक आयोगाच्या रडारवर असलेल्या मतदारयाद्यांमधील ‘गोंधळा’ला अखेर चाप बसला आहे. राज्यात सुरु असलेली मतदारयाद्यांच्या शुद्धीकरणाची धडक मोहीम संगमनेर विधानसभा मतदारसंघात सोमवारी (ता.17) रात्री पूर्ण झाली. या मोहिमेतून तब्बल 26 हजार 593 बोगस, दुबार आणि स्थलांतरित मतदारांची नावे यादीतून हद्दपार करण्यात आली आहेत. मतदारसंघातील एकूण मतदारांपैकी तब्बल 9.18 टक्के मतदारांना वगळल्याने संगमनेरच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, या ‘छाटणी’चा नेमका फायदा कोणाला आणि फटका कोणाला? यावर आता राजकीय आखाड्यात चर्चा रंगू लागल्या आहेत.


गेल्या महिनाभरापासून निवडणूक आयोगाने मतदारयाद्या अधिक पारदर्शक, दोषरहित आणि ‘बोगस मतदारमुक्त’ करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. आयोगाच्या केंद्रस्तरीय प्रतिनिधींनी (बीएलओ) केवळ कागदी घोडे न नाचवता थेट घरोघरी जाऊन प्रत्यक्ष पाहणी आणि दारोदारी सर्वेक्षण केले. प्रत्येक मतदाराशी थेट संपर्क साधून प्रपत्र भरुन घेण्याची आणि वैध नावांच्या डिजिटलायझेशनची प्रक्रिया काटेकोरपणे राबवली गेली. जे मतदार आढळून आले नाहीत किंवा ज्यांची माहिती संकलित नव्हती, त्यांना सोमवारी रात्रीपर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली होती. या चाळणीतून संगमनेरचे चित्र आता पूर्णपणे स्पष्ट झाले आहे.


या मोहिमेअंतर्गत संगमनेर विधानसभा मतदारसंघातील 2 लाख 89 हजार 746 मतदारांची पडताळणी करण्यात आली. त्यातील तब्बल 26 हजार 593 (9.18 टक्के) मतदारांची नावे वेगवेगळ्या कारणांनी वगळण्यात आली आहेत. यात धक्कादायक बाब म्हणजे, तब्बल 6 हजार 512 मयत मतदार यादीत अस्तित्वात होते. याशिवाय 12 हजार 6 मतदार कायमस्वरुपी स्थलांतरित झालेले आढळले, तर 5 हजार 95 मतदारांची नावे दुबार असल्याचे निष्पन्न झाले. या व्यतिरिक्त 2 हजार 887 मतदार प्रत्यक्ष पत्त्यावर सापडलेच नाहीत आणि 93 जणांनी आवश्यक प्रक्रिया पूर्ण न केल्याने त्यांना वगळण्यात आले. या महाशुद्धीकरणानंतर संगमनेर मतदारसंघाची एकूण मतदारसंख्या आता 2 लाख 63 हजार 153 झाली आहे.


पुढील आठवड्यात याद्यांचे प्रारुप प्रसिद्ध झाल्यानंतर वगळलेल्या मतदारांना दाद मागण्याची संधी असेल. तसेच, 1 ऑक्टोबरपर्यंत 18 वर्षे पूर्ण करणार्‍या नवमतदारांनाही अर्ज करता येईल. 27 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदारयादी जाहीर होईल आणि त्यानंतरच राज्यातील प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे.


मतदारयाद्यांच्या पुनरीक्षणातून तब्बल 9 टक्क्यांहून अधिक नावे वगळली गेल्याने संगमनेरच्या राजकीय समीकरणांची नव्याने मांडणी सुरु झाली आहे. 1985 पासून या मतदारसंघावर निर्विवाद वर्चस्व राखणारे दिग्गज नेते व माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांना गेल्या निवडणुकीत मोठा धक्का बसला होता. कोणतीही भक्कम राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या शिवसेनेच्या अमोल खताळ या नवख्या उमेदवाराने त्यांचा ऐतिहासिक पराभव केला.


या निवडणुकीतील आकडेवारी अत्यंत बोलकी आहे. थोरात यांना 1 लाख 1 हजार 826 (46.47 टक्के) मते मिळाली, तर अमोल खताळ यांनी 1 लाख 12 हजार 386 (51.29 टक्के) मते घेत थोरातांचा तब्बल 10 हजार 560 मतांनी पराभव केला होता. या दोघांमधील मतांचे अंतर अवघे 4.8 टक्के होते. आता याद्यांच्या शुद्धीकरणातून तब्बल 26 हजार मते कमी झाली आहेत, तो आकडा थोरातांच्या पराभवाच्या अंतरापेक्षा अडीचपट मोठा आहे. त्यामुळे वगळलेली मते आजवर कोणाच्या पथ्यावर पडत होती? हा प्रश्न निर्माण झाला आहे.


संगमनेरचा गतकाळ पाहिला, तर 2004 पासून सलग चार निवडणुकांमध्ये थोरातांचे मताधिक्य 55 हजारांच्या खाली कधीच आले नव्हते. त्यांच्या विजयाचे अंतर नेहमीच 32 टक्क्यांहून अधिक असायचे. 2004 च्या निवडणुकीत त्यांनी शिवसेनेचे उमेदवार संभाजीराजे थोरात यांचा तब्बल 75 हजार 757 मतांच्या फरकाने दारुण पराभव करत आपल्या राजकीय कारकिर्दीतील सर्वोच्च यश मिळवले होते. त्यावेळी दोघांमधील मतांचे अंतर तब्बल 44.8 टक्के इतके होते. मात्र, गेल्या निवडणुकीत त्यांच्या चार दशकांच्या राजकीय कारकिर्दीच्या आलेखाची मोठी पडझड झाली आणि दोन दशकांत पहिल्यांदाच थोरातांना 50 टक्क्यांहून कमी मते मिळाली. दुसरीकडे, अमोल खताळ यांनी 32.2 टक्क्यांचा पारंपरीक फरक ओलांडून थेट 51.29 टक्क्यांवर झेप घेतली. सरासरी 76 टक्के मतदान झालेल्या त्या निवडणुकीत दोघांनी मिळून 97.76 टक्के मते घेतली, तर इतरांना अवघी 2.24 टक्के मते मिळाली होती.


निवडणूक आयोगाच्या या धडक मोहीमेमुळे आगामी निवडणुकांची गणिते बदलणार हे निश्चित आहे. एका अटीतटीच्या निवडणुकीनंतर 9.18 टक्के मतदारांची नावे कमी होणे, हा साधा बदल नाही. गेल्या निवडणुकीतील मतांचा फरक पाहता, शुद्धीकरणातून कमी झालेल्या 26 हजार मतांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. या ‘बोगस’ आणि ‘स्थलांतरित’ मतांच्या कुबड्या आतापर्यंत कोणाला तारत होत्या आणि आता त्यांची नावे वगळल्यानंतर प्रत्यक्ष मैदानात कोणाची दमछाक होणार याचे चित्र आगामी काळात स्पष्ट होईलच, पण सध्यातरी या शुद्धीकरणाने संगमनेरच्या राजकीय वातावरणात खळबळ उडवून दिली आहे.


माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांचा अभेद्य किल्ला मानल्या जाणार्‍या संगमनेरात गेल्यावेळी त्यांना पहिल्यांदाच पराभव पत्करावा लागला. राजकारणातील नवख्या अमोल खताळ यांनी त्यांचा 10 हजार 560 मतांनी केलेला पराभव केवळ एका निवडणुकीचा निकाल नव्हता, तर तो साचलेल्या असंतोषाचा स्फोट होता. सततची सत्ता, नेत्याच्या भोवती निर्माण झालेले कोंडाळे, थेट संवाद साधण्यात आलेले अडथळे, ठराविक वर्तुळाची गुर्मी आणि गावागावातील पारंपरिक गटांमध्ये उफाळून आलेली धुसफूस, ही या पराभवाची प्रमुख कारणे मानली गेली. आता वर्षभरातच मतदारयादीतून तब्बल 26 हजार नावे वगळली गेली आहेत. पराभवाच्या अंतरापेक्षा वगळलेल्या मतदारांची संख्या अडीचपट असल्याने, आता हा फटका कोणाला बसणार? यावर पारावरच्या गप्पा रंगू लागल्या आहेत.

Visits: 2 Today: 2 Total: 1994044

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *