संगमनेरच्या नावाला ‘बट्टा’ लावण्याचा प्रयत्न! चक्क प्रवाशांनाच शस्त्रांचा धाक; जिल्ह्यातील गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ..

श्याम तिवारी, संगमनेर
श्रीरामपूरमधील हॉटेल व्यावसायीक आकाश दुबय्या यांच्या क्रूर हत्येनंतर ‘काही’ पोलिसांच्या मदतीने जिल्ह्यात फोफावल्या गुन्हेगारी विश्वाचे रहस्य उलगडत असतानाच संगमनेरातील एका कथित गुन्हेगारी टोळीचे कृत्य चव्हाट्यावर आले आहे. हजारों प्रवाशांची वर्दळ असलेल्या आणि संगमनेरच्या वैभवाचे प्रतिक मानल्या जाणार्या बसस्थानकातच हैदोस घालणार्या एका गुन्हेगारी टोळीने थेट प्रवाशांनाच धमकावण्याचा प्रयत्न केला. या टोळीकडून सुरक्षित शहराच्या वातावरणाचा भाव मनात घेवून बसची प्रतिक्षा करणार्या प्रवाशांना लक्ष्य केले गेले. त्यामुळे प्रवाशांमधील सुरक्षिततेची भावनाही डळमळीत झाली असून शहराच्या नावाला एकप्रकारे ‘बट्टा’च लागला आहे. दिवसभरात दहा हजारांहून अधिक प्रवाशांची वर्दळ असलेल्या जिल्ह्यातील सर्वाधीक व्यस्त संगमनेर बसस्थानकात महिलांचे दागिने लुटण्याच्या घटना अविरत असतानाच त्यात आता थेट प्रवाशांना शस्त्र दाखवून लुटण्याचा प्रकार घडल्याने जिल्ह्यासह संगमनेरातही कायद्याचे वाभाडे निघाले आहेत. धक्कादायक म्हणजे धाडस करुन पोलिसांना पाचारण करणार्या कोपरगावच्या प्रवाशाने घडल्या प्रकाराची तक्रार देण्यास नकार दिला म्हणून रात्रपाळीचा अधिकारी कोणतीही कारवाई न कारताच हात हलवित परतला. यातून पोलिसांचे आरोपींशी संगनमत तर नाही? अशीही शंका व्यक्त होवू लागली आहे.

याबाबत विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरचा प्रकार आज (ता.17) पहाटे तिनच्या सुमारास हजारों प्रवाशांच्या 24 तास वर्दळीमुळे सुरक्षित मानल्या जाणार्या संगमनेर बसस्थानकात घडला. कोपरगावमध्ये राहणारा एक प्रवाशी बसची प्रतिक्षा करीत असताना तरुणांच्या एका टोळक्याने त्याला गाठून शस्त्राचा धाक दाखवला व त्या जोरावर त्याला लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रसंगावधान राखून सदर प्रवाशाने आरडाओरड करीत मोबाईलवरुन 112 क्रमांकावर फोन करुन पोलिसांची मदत मागितली. त्यामुळे आरोपी तेथून पसार झाले.

‘त्या’ प्रवाशाच्या फोनला प्रतिसाद देत काही वेळाने दाखल झालेल्या पोलीस अधिकार्याने घटनेची माहिती घेतल्यानंतर संबंधित प्रवाशाला तक्रार दाखल करण्यासाठी शहर पोलीस ठाण्यात येण्यास सांगितले. मात्र या घटनेत आपला ऐवज लुटण्यापूर्वीच आपण फोन केल्याने कोणतेही नुकसान झालेले नाही. त्यामुळे नाहक तक्रार देवून न्यायालयाच्या खेट्या नकोत म्हणून त्या प्रवाशाने तक्रार देण्यास नकार दिला. त्यामुळे घटनास्थळी दाखल झालेला अधिकारी चक्क इतक्या गंभीर घटनेनंतरही हात हलवित माघारी निघून गेला. खरेतर हा प्रकार अतिशय गंभीर असून संगमनेरसारख्या सुसंस्कृत शहरातील बसस्थानकात ‘अतिथी’ म्हणून प्रतिक्षा करणार्या प्रवाशांना धाक दाखवून लुटण्याच्या प्रकारावर तत्काळ कारवाई होण्याची गरज होती. मात्र केवळ तक्रारदार नाही म्हणून अधिकार्याने माघारी फिरावं हा प्रकार गुन्हेगारीला खतपाणी घालणारा आणि पोलिसांविषयी संशय निर्माण करणारा आहे.

या प्रकरणाचा मागोवा घेतला असता बुधवारी मध्यरात्रीनंतरही या टोळीने बसस्थानकाच्या परिसरात धुडगूस घातला होता. त्यातून वादावादी होवून काही प्रवाशांनी या गुन्हेगारी टोळीतील काहींना लाथाबुक्क्यांनी तुडवून काढले होते. त्यानंतर दुसर्याच दिवशी पहाटे प्रवाशाला शस्त्राचा धाक दाखवून त्याच्याकडील ऐवज लुटण्याचा प्रयत्न झाल्याने जिल्ह्यासह संगमनेरात गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहीला की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. वास्तविक हा प्रकार समोर येताच रात्रपाळीच्या अधिकार्याने पूर्वेतिहास माहिती असलेल्या आणि यापूर्वी अशा कृत्यांमूळे गजाआड होवून आलेल्या संशयीत टोळीच्या मुसक्या आवळण्याची गरज होती. मात्र तसे न करता पोलिसांनी तक्रारदार नसल्याची सापट शोधून पळवाट काढल्याने संशय निर्माण झाला आहे.

श्रीरामपूरमधील हॉटेल व्यावसायीक आकाश दुबय्या या तरुणाचा निर्घृन खून झाल्यानंतर पाच दिवस शहर बंद ठेवून तेथील नागरिकांनी शहरावरील गुन्हेगारी टोळ्यांच्या दहशतीचे चित्र पहिल्यांदा जगासमोर आणले. त्याचे धागे उलगडत असताना चक्क पोलीस दलात कार्यरत असलेल्या डझनावर कर्मचार्यांचा वापर करुन या टोळ्यांनी जिल्हाभर आपल्या गुन्हेगारी कृत्यांचे जाळे विस्तारल्याचे वास्तवही समोर आले. एकीकडे कायमस्वरुपी बदनाम असलेल्या अन्य व औषध प्रशासनात महिन्याभरापूर्वी तुकाराम मुंढे नावाच्या वादळी अधिकार्याची ‘एन्ट्री’ झाली आणि राज्याला पहिल्यांदाच दूध, पनीर, खाद्यपदार्थातील भेसळीसह गुटखा बंदी काय असते याचे ज्ञान झाले.

गुन्हेगारांच्या वर्चस्वामुळे जिल्ह्यात ढासळलेल्या कायदा व सुव्यवस्थेला सुरळीत करण्यासाठी जिल्ह्यात मोठ्या अंतराने ‘आयपीएस’ अधिकारी धाडण्यात आला. त्यांची पार्श्वभूमी पाहता कडवी शिस्त त्यांच्या ठायी असल्याचे समजले. त्यावरुन जिल्ह्यात आता कायदा दृष्टीस पडेल अशी अपेक्षा निर्माण होत असताना श्रीरामपूरच्या घटनेने त्याचे वाभाडेच काढले. त्याचवेळी अखंड निष्क्रियतेची साखळी ओवणार्या संगमनेर तालुका पोलिसांकडून एकाही प्रकरणाचा तपास शून्य असतानाच समोर आलेल्या गुटखा तस्करीच्या प्रकरणात नामचीन माफीया युसुफ दादा चौगुले याचे नाव समोर येवूनही त्याच्यावर कारवाई करण्यात होणारी चालढकल चांगलीच चर्चेत आली. या प्रकरणात ‘मकोका’ प्रमाणे कारवाई होवू नये यासाठी मोठी तडजोड झाल्याच्या चर्चाही रंगल्या. रुग्णालयात दाखल आरोपी अचानक गायब होण्याचा प्रकारही थेट संशय निर्माण करणाराच ठरला. माध्यमांमध्ये त्याची चर्चाही झाली, मात्र पोलीस अधीक्षकांना त्यामागील गांभीर्यच समजले नाही, किंवा त्यांचाही या प्रकारांना पाठींबा असावा. मात्र या सगळ्या घटनांचा परिपाक जिल्ह्यात कायदा अदृष्य झाला असून गुन्हेगारी टोळ्यांचे वर्चस्व निर्माण होत असल्याचे धक्कादायक चित्र दिसू लागले आहे.

गेल्या दोन-तीन दशकांत जिल्ह्यात येवून गेलेल्या सुधांशू राय, विश्वास नांगरे-पाटील, कृष्णप्रकाश यासारख्या धडकेबाज पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यातील भल्या-भल्या टोळ्यांचे कंबरडे मोडून त्यांना कारागृहाचे गज मोजायला लावल्याची उदाहरणे आहेत. त्यावेळी त्यांनी जिल्ह्यात केलेल्या कारवायांची चर्चा राज्यात व्हायची. आज तशीच स्थिती ‘आयएएस’ तुकाराम मुंढे यांच्या कारवायांनी निर्माण केली असून राज्यभर त्यांच्या कर्तव्याचा गौरव होत असताना धडाकेबाज आणि शिस्तप्रिय अशी बिरुदं पाठी घेवून चंद्रपूरहून अहिल्यानगरच्या पवित्रभूमीत आलेल्या ‘आयपीएस’ सुदर्शन मुम्मका यांच्याकडूनही तशीच अपेक्षा आहे. मात्र श्रीरामपूर पाठोपाठ संगमनेरातील गुटखा माफियांविरोधातील ‘मकोका’ कारवायांवरुन होणारी दिरंगाई पाहता त्यावर संशयाचे मळभ निर्माण झाले असून ते दूर सारण्याची जबाबदारीही त्यांचीच आहे.

