संगमनेरच्या लव्ह जिहादचा सूत्रधार आता गुटखा तस्करीत! अलिशान वाहनाच्या अपघाताने फोडले बिंग; शेकडों किलोमीटरच्या सुरक्षित प्रवासावरुनही संशय..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
दोन वर्षांपूर्वी पठारभागात घडलेल्या ‘लव्ह जिहाद’ प्रकरणाचा सूत्रधार युसुफ दादा चौगुले पुन्हा चर्चेत आला असून यावेळी ‘अपघाता’ने घडलेल्या ‘अपघातात’ चकनाचूर झालेल्या अलिशान वाहनाने आता त्याच्या गुटखा तस्करीचे बिंग फोडले आहे. धक्कादायक म्हणजे ‘लव्ह जिहाद’ प्रकरणात तब्बल नऊ महिन्यांनी सशर्त जामीन मिळताच त्याला मध्यप्रदेशात हत्यारांची तस्करी करताना पकडण्यात आले होते. त्यातून सुटका झाल्यानंतर शहरानजीकच्या गांजा कारवाईतही त्याच्या नावाची चर्चा झाली, मात्र नंतर ती अर्थपूर्ण पद्धतीने विरली. आता संगमनेरसह संपूर्ण महाराष्ट्रात गुटखा मिळणं दूरापास्त झाल्याने त्याला सोन्याचे मोल प्राप्त झाले आहेत. अशा स्थितीत तस्करीच्या पैशातून धर्मांधता पसरवणार्या चौगुलेसारख्या पांढरपेशा गुन्हेगाराच्या आकांक्षा न फुलतील तर नवलच. आश्चर्य म्हणजे गुजरातमधून खचाखच भरुन आणलेल्या गुटख्याची शेकडों किलोमीटरच्या प्रवासात कोठेही तपासणी झाली नाही. कदाचित हा अपघातच घडला नसता तर हा गुटखा त्याच्या गंतव्यापर्यंत सहज पोहोचला असता, त्यावरुन सुरक्षा यंत्रणांबाबतही संशय निर्माण झाला आहे. या घटनेत चौगुलेचे दोघे पंटर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सदरचा अपघात आज पहाटेच्या सुमारास कर्हेघाटात घडला. नाशिकहून भरधाव वेगाने येणार्या टोयोटो इनोव्हा या अलिशान कारच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्याचे वाहन घाटातील सुरक्षा कठड्यांना धडकून नव्या आणि जुन्या घाटाच्या दरम्यान असलेल्या दरीत जावून कोसळले. या अपघातानंतर आसपासच्या नागरिकांसह काही वाहनचालकांनी तत्काळ जखमींना मदत करुन त्यांना वाहनाबाहेर काढले व उपचारार्थ खासगी रुग्णालयात पाठवले. या घटनेची माहिती तालुका पोलिसांना मिळताच त्यांनीही घटनास्थळी धाव घेतली. काही कर्मचार्यांनी दरीत उतरुन वाहनात आणखी कोणी आहे का याची पडताळणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकच्या गोण्या खचाखच भरलेल्या दिसल्या.

या गोण्यांमध्ये काय आहे याची तपासणी झाली असता त्यात गुटखा आणि त्यात वापरली जाणारी सुगंधीत तंबाखू असल्याचे आढळून आले. दिवस उजेडताच पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने दरीतील वाहन बाहेर काढून घटनास्थळाची पाहणी केली असता अपघातानंतर वाहनाच्या सर्व काचा फूटल्याने त्यातून काही गोण्या व त्यातील गुटख्याचे पुडे इतरत्र जावून पडल्याचे दिसून आले. त्या सर्वांना एकत्रित केले असता ‘त्या’ वाहनात तब्बल 20 ते 25 गोण्यांमध्ये गुटखा भरल्याचे स्पष्ट झाले. तो पर्यंत अपघातग्रस्त झालेल्या इनोव्हा (क्र.एम.एच.01/बी.बी.9149) कारची पार्श्वभूमी पडताळली असता या संपूर्ण उद्योगात वारंवार गुन्हेगारी कृत्यात आढळणारा, प्रत्येकवेळी यंत्रणांना हाताशी धरुन गैरकृत्य करणारा मात्र नैसर्गिक अडकणारा युसुफ दादा चौगुले असल्याचेही उघड झाले.

दोन वर्षांपूर्वी पठारभागातील एका 19 वर्षीय तरुणीचे मंचरमधून अपहरण करुन जबरदस्तीने तिला मुंबईला नेण्यात आले होते. तेथे शादाब तांबोळी नावाच्या तरुणाशी तिचा निकाह लावून बळजबरीने तिचे धर्मांतरण करण्यात आले होते. या घटनेने संपूर्ण संगमनेर तालुक्यात जातीय तणावाचे वातावरण निर्माण झाल्यानंतर तत्कालीन पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी वेगाने सूत्रे हलवून अपहृत मुलीला मुंबईतून संगमनेरात आणले. या प्रकाराने मानसिक धक्का बसलेली तरुणी सावरल्यानंतर महिन्याभराने या प्रकरणी घारगाव पोलिसांमध्ये तक्रार दाखल झाली आणि संगमनेर तालुक्याच्या इतिहासात उघडपणे घडलेल्या लव्ह जिहादच्या पहिल्याच प्रकरणात तत्कालीन शरद पवार गटाच्या ग्रंथालय विभागाचा उत्तर विभागाचा प्रदेशाध्यक्ष युसुफ दादा चौगुले याचे नाव सूत्रधार म्हणून समोर आले व त्याला त्याच दिवशी श्रीरामपूरमधून अटक झाली.

तेव्हापासून फेब्रुवारी 2025 पर्यंत तो कारागृहात कैद होता. या दरम्यान पठारभागासह मुंबईतील मिळून तिघांना अटक होवून त्यांची नंतर सुटकाही झाली. मात्र युसुफ चौगुलेला कोणत्याही न्यायालयाकडून दिलासा मिळाला नाही. अखेर सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर तब्बल नऊ महिन्यांनी तो गजाबाहेर आला आणि त्यानंतर महिनाभरातच मध्यप्रदेशातून गावठी कट्ट्यांसह जिवंत काडतुसांची चोरटी वाहतूक करताना पकडला गेला आणि पुन्हा गजाआड पोहोचला. तेथून जामीन होण्यापूर्वीच स्थानिक पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाच्या शर्तींचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आणून देताना त्याचा कोठडीतील मुक्काम वाढवला. मात्र त्यानंतर त्याने नियमित जामीनासाठी अर्ज करुन स्वतःची सुटका करुन घेतली.

अतिशय कट्टर मानसिकतेच्या युसुफ चौगुलेला मोठ्या दिव्यानंतर दुसर्यांदा दिलासा मिळाल्याने आतातरी त्याच्यात सुधारणा होईल अशी अपेक्षा असताना काही महिन्यांपूर्वी शहरालगत झालेल्या गांजावरील एका ‘कथीत’ कारवाईतही त्याच्या नावाचे फुगे उडाले होते. मात्र ‘ती’ संपूर्ण कारवाईच संशयास्पद ठरल्याने नंतर अर्थपूर्ण पद्धतीने त्याचे नाव हवेतच विरले. त्यानंतर काही महिन्यांतच पुन्हा एकदा गुन्हेगारी कारवायांमध्ये त्याचा सहभाग आढळून आला आहे. सध्या संगमनेरसह संपूर्ण महाराष्ट्रात गुटखा मिळणं दूरापास्त झाल्याने गुटख्याचे भाव गगनाला भिडले आहेत. त्याचा परिणाम गुन्हेगारांच्या अनेक टोळ्या आता ‘गुटखा तस्करी’कडे वळाल्या असून कर्हेघाटातील अपघाताने त्याचे बिंग फोडले आहे. धक्कादायक म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये जाणारा गुटखा गुजरातवरुन व्हाया संगमनेरच पोहोचवला जात असल्याचे यापूर्वीचे अनेक दाखले आहेत.

मात्र आजवर एखादा अपवाद वगळता कधीही गुटख्याची वाहतूक करणार्या मालट्रक, कंटेनर अथवा अन्य वाहनांवर कारवाया झाल्याचे उदाहरण ऐकिवात नाही. यंत्रणा आणि तस्करांच्या दुर्दैवाने युसुफ दादा चौगुले नामक संगमनेरातील कुख्यात गुन्हेगाराचे गुटख्याने भरलेले अलिशान वाहन आज पहाटे अपघातग्रस्त होवून दरीत कोसळले. या अपघातात विनाअडथळा गुजरातपासून संगमनेरच्या हद्दिपर्यंत गुटखा वाहून आणणारे दोघेही तस्कर गंभीर जखमी झाल्याने त्यांचा प्रवास थांबला. आसपासच्या नागरिकांसह काही संवेदनशील वाहनचालकांनी मानवतेच्या दृष्टीकोनातून दोघांनाही बाहेर काढून उपचारांसाठी रुग्णालयात धाडले. पोलीस येण्यापूर्वीच अनेकांनी अपघातग्रस्त वाहनाचे आणि त्यात खचाखच भरलेल्या गुटख्याचे चित्रीकरण करुन आपापल्या समूहात ‘शेअर’ केल्याने गुटखा वाहनाची बोंब उठली. त्यामुळे पोलिसांचाही नाईलाज झाला आणि गुजरात ते महाराष्ट्र विनाअडथळा सुरु असलेला गुटख्याचा चोरटा व्यापार चव्हाट्यावर आला.

गुटखा तस्करीत आढळणार्या आरोपींवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंध अधिनियमानुसार (मकोका) कारवाई करावी असे स्पष्ट निर्देश राज्याचे अन्न व औषध आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत. या प्रकरणात नाव समोर येत असलेल्या युसुफ दादा चौगुले याची काळी पार्श्वभूमीही गुटखा तस्करीतूनच जन्माला आली आहे. त्यामुळे तालुका पोलीस अपघाताने समोर आलेल्या या मोठ्या गुटखा तस्करीत आपली प्रतिमा स्वच्छ असल्याचे दाखवतात की नेहमीप्रमाणे आपल्या सोयीने कायद्याचा वापर करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. विशेष म्हणजे आयुक्त मुंढे यांच्या सूचनेनंतर विभागाच्या सर्व उपायुक्तांनी गेल्याच आठवड्यात आपापल्या कार्यक्षेत्रातील जिल्हा पोलीस प्रमुखांची भेट घेवून त्यांना ‘मकोका’प्रमाणे कारवाई करण्याबाबतचे अधिकृत पत्रही सोपवले होते. त्यानंतर घडलेला हा पहिलाच गुन्हा असल्याने यातून जिल्हा पोलीस अधीक्षकांची मनशाही स्पष्ट होणार आहे.

