जुन्या सरकारी जागेत वेड्या बाभळींचे जंगल!

नायक वृत्तसेवा, अकोले
अनेक वर्षापासून पडीक असलेल्या आणि जागोजागी काट्या उगवलेल्या शहरातील जुन्या सरकारी दवाखान्याच्या जागेत वेड्या बाभळींचे जंगल तयार झाले असून तेथे साफसफाई करून नाविन्यपूर्ण प्रकल्प राबवावेत अशी मागणी ग्राहक पंचायतीने केली आहे.

शहराचे वाढते नागरीकरण, ग्रामस्थांच्या वाढणाऱ्या अपेक्षा, शहरातील अरुंद रस्ते, नगरपंचायतीकडून ज्येष्ठ नागरिकांना, महिला व बाळगोपाळांना न मिळणाऱ्या सुविधा यामुळे सर्वच निरुत्साही आहेत. मात्र अकोले शहरात एवढी मोठी सरकारी दवाखान्याची जागा उपलब्ध असतांना तेथे जंगल निर्माण झाले आहे. हाकेच्या अंतरावर नगरपंचायतचे कार्यालय आहे. विशेष म्हणजे दररोज येथे अध्यक्ष,पदाधिकारी दैनंदिन कार्यालयात वावरत असताना ह्या प्रश्नाकडे कानाडोळा करत आहेत. ही जागा जि.प.ची असून ह्या जागेवर जागृत नागरिकांसह अकोले तालुका ग्राहकपंचायतीने जनहिताच्या दृष्टीने नाविन्यप्रकल्प त्वरित राबवावेत अशी मागणी केली आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, अकोले शहरातील २ ते ३ एकर क्षेत्र हे जि.प.चे मालकीचे आहे. पूर्वी ही शिवकालीन वास्तू म्हणून ह्या वास्तूची ओळख आहे. गेली ३५ ते ४० वर्षापूर्वी अकोले शहरात सर्वात मोक्याची जागा व कार्यालये येथे होती. पूर्वी जुना सरकारी दवाखाना, सार्वजनिक बांधकाम कार्यालय, बाल विकास कार्यालय, महिला बाल कल्याण कार्यालय ,पोस्ट ऑफीस इत्यादी कार्यालय १९९१ पर्यंत कार्यरत होती. आजही येथे पुरातन काळातील गढी आहेत. पूर्वीच्या इतिहासाची साक्ष आज येणाऱ्या प्रत्येकाला खुणावत आहे. पर्यटनाच्या दृष्टीने ओळख असलेल्या प्रवरा नदीच्या काठी ही वास्तू आहे. सध्या अकोले शहराचे शहरीकरण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.ग्रामस्थांना, ज्येष्ठ नागरिकांना व लहान मुलांना खेळण्यासाठी व फिरण्यासाठी कुठेही मैदान नाही, बाल उद्यान नाही. नगरपंचायतने येथे विकास कामातून मोठा निधी आणून संगमनेर शहरातील जाणता राजा मैदानासारखे मोठे मैदान व्हावे, सुशोभीकरण, बाल उद्यान, गार्डन व्हावे, नाट्यगृह, ग्रंथालय त्याचप्रमाणे सामाजिक वाहन पार्किंग ह्या मूलभूत सुविधा अकोलेकरांना उपलब्ध करुन द्याव्यात.अशी मागणी अकोले तालुका ग्राहकपंचायतने केली आहे. त्याचबरोबर याचा प्रस्ताव नगरपंचायतिने बनवावा व तो जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी ,नगरविकास मंत्री,ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र शासनाकडे परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा. ह्या प्रकल्पामुळे तालुक्याच्या व शहराच्या वैभवात निश्चित भर पडणार आहे. असे पत्रकात म्हटले आहे.

या पत्रकावर ग्राहकपंचायतचे जिल्हा उपाध्यक्ष मच्छिंद्र मंडलिक, कार्याध्यक महेश नवले, तालुकाध्यक्ष दत्ता शेणकर, खादी ग्रामोद्योग मंडळाचे संचालक भाऊसाहेब वाकचौरे, सचिव राम रुद्रे, सुनील देशमुख, दत्ता ताजणे, मच्छिंद्र चौधरी , दिपक शेटे, राम भांगरे, सुदाम मंडलिक, प्रमोद मंडलिक, रामदास पांडे , रवि जगदाळे, शरद पानसरे, संपत पानसरे आदींचे नावे आहेत.

Visits: 19 Today: 1 Total: 1100157
