अवैध धंदे करणाऱ्यांच्या मूलभूत गरजा रोखणार  म्हाळादेवी ग्रामपंचायतीचा ग्रामसभेत ठराव

नायक वृत्तसेवा, अकोले 
अवैध दारू विक्रेत्यांच्या  घरावर हल्लाबोल करत अवैध देशी व गावठी दारुच्या बाटल्या उध्वस्त करण्यात आल्याची घटना तालुक्यातील म्हाळादेवी येथे गुरुवार (दि.३१)रोजी घडली. या पार्श्वभूमीवर यापुढे जर गाव व वाडी-वस्तीवर कोणीही अवैध दारू विक्री केली तर संबंधित दारू विक्रेत्याला ग्रामपंचायतीच्या मुलभूत गरजा व शासनाच्या सर्व सुविधा स्थगित करण्याचा ठराव ग्रामसभेत संमत करण्यात आला.
 म्हाळादेवी ग्रामपंचायतीची ग्रामसुरक्षा दल स्थापनेबाबत विशेष ग्रामसभा गुरुवारी बोलविण्यात आली होती. अध्यक्षस्थानी सरपंच किरण उघडे होते. यावेळी माज़ी सरपंच प्रदीप हासे, उपसरपंच शांताराम संगारे, ग्रामपंचायत सदस्या कविता हासे, राणी मुंढे, सुनीता मेंगाळ, मारुती मेंगाळ,ग्रामसुरक्षा दलाचे अध्यक्ष अनिल मुढे, ग्रामविकास अधिकारी एस. बी. रहाणे यांसह ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या ग्रामसभेत ग्राम सुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली. यानंतर लगेचच गावातील अवैध देशी व गावठी दारू विक्री करणाऱ्या विक्रेत्यांच्या घरावर जाण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार म्हाळादेवी गावातील कारवाडी येथे बाळासाहेब दामू हासे यांच्या घरावर मोर्चा नेण्यात आला. यात ग्रामपंचायतीचे आजी-माजी पदाधिकारी, ग्राम सुरक्षा दलाचे तरुण, ग्रामस्थ व महीला मोठ्या संख्येने सहभागी होते. या ग्रामसभेतील चर्चेची कुजबुज दारू विक्री करणाऱ्याच्या कानावर गेल्याने त्याने अवैध दारू लंपास केली.
यापुढे अवैध दारु विक्री केली तर ग्रामपंचायत व शासनाच्या सर्व सुविधा स्थगित करण्याची तंबी यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी हासे याला दिली. यानंतर बाळासाहेब हासे याने आपण यापुढे अवैध दारू विक्री करणार नसल्याची ग्वाही उपस्थित ग्रामस्थांना दिली. यानंतर ग्रामस्थ ठाकरवाडी येथील काळ्या उर्फ रोहिदास उघडे याच्या अवैध दारूच्या गुत्यांवर पोहचले. परंतु त्याला ग्रामस्थ येत असल्याचे समजताच तोही तेथून पसार झाला. त्याच्या गुत्यांवर देशी दारूचे दोन खोके आढळले.ग्रामस्थांनी तेथेच ते फोडून टाकले. वनविभागामध्ये असलेली अनधिकृत पत्राची शेडही ग्रामस्थांनी उध्वस्त केली. त्यानंतर ठाकरवाडी डोंगरावर असलेल्या वस्तीवर सखुबाई भाऊसाहेब उघडे हिच्या घरी जाऊन पाहणी केली असता गावठी दारू बनविण्यासाठी वापरण्यात देणारे रसायन व  तयार झालेल्या दारूचे दोन ड्रम हस्तगत करण्यात आले.
त्यानंतर घराच्या पाठीमागे असलेल्या डोंगराच्या गवतात असणारे गावठी दारूचे पाच सहा ड्रम तरुणांनी शोधून आणले. त्यानंतर माजी सरपंच प्रदीप हासे यांनी अकोले पोलिसांना घटनेची माहिती दिली, त्यानंतर लगेचच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्या अवैध गावठी दारूचा पंचनामा करून रसायन व गावठी दारूचे सँम्पल घेऊन इतर ड्रममधील दारू व रसायन ओतून देण्यात आले. दरम्यान, यापुढे ग्रामसुरक्षा दल व निमंत्रित सदस्यांनी आठवडा भरात  एकदा पेट्रोलिंग करण्याचे ठरले. यामध्ये सर्वानी आपला सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले आहे.  दारूबंदी चळवळीचे सक्रीय कार्यकते हेरंब कुलकर्णी यांनी ग्रामस्थांचे अभिनंदन केले आहे.
Visits: 107 Today: 1 Total: 1107639

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *