विकास कामे पहावत नसल्याने भ्रष्टाचाराचे आरोप! आरोप करणाऱ्यांवर कारवाई करा : जोर्वे ग्रामस्थ

नायक वृत्तसेवा, संगमनेर
ज्यांना चाळीस वर्षे सत्ता असूनही ४० कामे जमली नाहीत आणि आता गावातील विकासकामे जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून सुरू आहेत.हा चालू असलेला विकासकामांचा वाढता आलेख काहींना झेपत नसल्याने नाहक भ्रष्टाचाराचे आरोप करत आहे. या सर्व आरोपांची लवकरात लवकर चौकशी करावी. जर आरोप सिद्ध झाले नाही तर आरोप करणार्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर्वे ग्रामपंचायतीच्या सत्ताधारी विखे गटाने पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेंद्र ठाकूर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

जोर्वे येथील सत्ताधारी विखे गटाच्या कार्यकर्त्यांसह ग्रामस्थांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जोर्वे गावामध्ये ग्रामपंचायत कार्यालय, ट्रॅक्टर, ट्रॉली, टँकर, ब्लोअर, रुग्णवाहिका, दवाखाना, अमररथ, पथ दिवे, सौरदिवे, गटारी, विजेचे रोहित्र, पाणीपुरवठा,सभामंडप, रस्ते,वैयक्तिक लाभाच्या योजना अशी विविध प्रकारची विकासकामे पूर्ण झाली आहेत.तर काही विकास कामे चालू आहेत. गावातील मुख्य चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे काम सुरू होणार आहे. या गावात सुरू असणारी विकास कामे विरोधी थोरात गटातील नेत्यांना पाहवत नसल्यामुळे ते सत्ताधारी विखे गटावर भ्रष्टाचाराचा आरोप करुन समाज माध्यमांवर बदनामी करण्याचे काम करत आहे. मात्र, महिला सरपंच आहे म्हणून काहीही आरोप तुम्ही करत असाल तर आम्ही कदापिही सहन करणार नाही.

इतकी वर्षे जनतेला कायम वेठीस ठेवलं जात आहे. ते आता बंद करा. गावातील महिलांना मोफत शिलाई मशिनचे प्रशिक्षण देऊन मशिन वाटल्या, मोफत बेकरी प्रशिक्षण दिलं. तसेच चांगल्या चाललेल्या प्रत्येक कामात अडथळा आणणे, ग्रामसेवकांना अरेरावीची भाषा करणे हे शोभत नाही असेही निवेदनात म्हटले आहे.राजकीय वरदहस्त व दादागिरीच्या बळावर एका थोरात गटाच्या ग्रामपंचायत सदस्याने ग्रामपंचायतीची जागा व विहीर बळकावण्याचा प्रयत्न केला, हे मुद्दे आम्ही बोललो म्हणून आम्ही भ्रष्टाचार केला असे ते सांगत आहेत. त्यामुळे विरोधकांनी जे सत्ताधारी विखे गटावर बिनबुडाचे भ्रष्टाचाराचे आरोप केलेले आहे त्याची चौकशी व्हावी अशी मागणी पंचायत समिती प्रशासनाला सत्ताधारी जोर्वेच्या सरपंच प्रिती दिघे, शिवाजी कोल्हे, बाबासाहेब काकड,सचिन दिघे,संपतराव राक्षे,हरीष जोर्वेकर, प्रकाश काकड,विशाल थोरात, शिवाजी काकड, नंदू थोरात, रमेश इंगळे, प्रशांत इंगळे, सचिन मोकळ,अभिषेक चव्हाण, बाबासाहेब थोरात, जगदीश इंगळे, भाऊसाहेब वाकचौरे, रविंद्र गाडेकर, बंडू इंगळे, मिरा थोरात,लता काकड,मिना इंगळे, वनिता चव्हाण, अलका चव्हाण, अनिता लोणारी, दुर्गा लोणारी, निशिगंधा इंगळे, सुनीता बर्डे, अनिता मोरे,रंजना जाधव, सरला जोर्वेकर आदींनी गटविकास अधिकारी राजेंद्र ठाकूर यांच्याकडे केली आहे.

इतिहासात कधी झाली नाही एवढी विकासकामे व योजना गरिबांपर्यंत ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून पोहोचविल्या आहेत.आमची वाढलेली लोकप्रियता बघून आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत जोर्वे गटात उभे राहण्यासाठी धडकी भरलेले आणि कोणतेही विकास कामे न करता फक्त सामान्य जनतेला वेठीस धरत राजकारण करण्यासाठी हे उद्योग सुरु केले आहे. मागच्या चाळीस वर्षांत काहीच न केल्यामुळे जनतेने विधानसभा निवडणुकीत त्यांना धडा शिकवला आहे. आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कमीत कमी जोर्वे गटात तरी इज्जत राहावी म्हणून त्यांचा चाललेला हा शेवटचा केविलवाणा प्रयत्न आहे. ‘पब्लिक, यह सब जाणती है’असे माजी सरपंच गोकुळ दिघे यांनी सांगितले.

Visits: 87 Today: 2 Total: 1113915
