शौचास जाण्याच्या कारणावरुन विवाहितेचा खून! संगमनेर तालुक्यातील धक्कादायक घटना; बापासह मुलगा आणि सून गजाआड..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
मालकीहक्काच्या शेतात शौचास गेल्याच्या रागातून विवाहितेला शिवीगाळ करण्याचा प्रकार घडल्यानंतर त्याचा जाब विचारणार्‍या तिच्या कुटुंबावर तिघांनी चाकूहल्ला करीत एकीचा निर्घून खून केल्याची धक्कादायक घटना तालुक्याच्या पठारभागातून समोर आली आहे. या घटनेत अन्य एका महिलेलाही गंभीर दुखापत झाली असून पुढील उपचारांसाठी तिला प्रवरानगरला हलवण्यात आले आहे. या प्रकरणी घारगाव पोलिसांनी खून व खुनाच्या प्रयत्नासह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (अ‍ॅट्रोसिटी) गुन्हा दाखल करुन मुरलीधर पडवळ याच्यासह त्याचा मुलगा विक्रम आणि त्याची पत्नी अलका या तिघांनाही अटक केली आहे, आज त्यांना न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. या घटनेने संगमनेर तालुक्यात खळबळ उडाली असून अतिशय किरकोळ कारणावरुन एका 28 वर्षीय विवाहितेचा बळी गेल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.


याबाबत घारगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरचा प्रकार मंगळवारी (ता.10) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास तालुक्याच्या पठारभागातील कर्जुलेपठार येथे घडला. या प्रकरणातील फिर्यादी अजित दादाभाऊ वाघ हा आपले वडील दादाभाऊ किसन, आई मंजुळा, पत्नी कविता, भाऊ ज्ञानदेव, त्याची पत्नी रुपाली व बहिण मोनिका असे एकत्रितपणे गावातील मुरलीधर रामकृष्ण पडवळ याच्या घराशेजारी राहतात. वाघ यांच्या घरात शौचालय नसल्याने त्यांच्या कुटुंबातील सदस्य आसपासच्या माळरानासह पडवळ यांच्या गावालगतच्या शेतजमीनीचाही त्यासाठी अनुधनमधून वापर करीत असतं. त्याप्रमाणे नेहमीनुसार मंगळवारी (ता.10) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास रुपाली वाघ पडवळ यांच्या शेतात शौचास गेल्या होत्या.


त्यावेळी वाटेत विक्रम मुरलीधर पडवळ याने त्यांना आमच्या शेतात शौचास का जाता? असा प्रश्‍न करीत शिवीगाळ केली. घडला प्रकार त्यांनी घरी येवून सांगितल्यानंतर रात्री आठच्या सुमारास वाघ कुटुंबातील वरील मंडळी पडवळ यांच्या घरी जावून घडल्याप्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त करीत असतानाच विक्रम पडवळ अचानक आवेशात आला. त्यावेळी तेथे हजर असलेल्या मुरलीधर व अलका पडवळ यांनीही शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. या दरम्यान फिर्यादी व त्याचे कुटुंबिय वारंवार ‘आमच्याकडून चूक झाली, आम्ही माफी मागतो, तुम्ही म्हणाला तर रुपाली वहिणींनाही माफी मागण्यास सांगतो..’ अशा विनवण्या करीत होते. मात्र रागाच्या ज्वाळांनी ग्रासलेल्या पडवळ कुटुंबाने त्याकडे दुर्लक्ष करीत औदसेला आमंत्रण दिले. आपल्या मुलाचा आवेश पाहून बापानेही फिर्यादींना उद्देशून जातीवाचक शिवीगाळ करीत विक्रमच्या रागाग्नीत तेल ओतले.


त्याचा भडका उडून ‘आज तुम्हाला जिवंतच सोडीत नाही’ अशी गर्जना करीत विक्रम पडवळ तडक घरात धावला आणि काही क्षणात धारदार चाकू घेवून आला. त्यावेळी त्याची पत्नी अलकाने सायंकाळी शौचास गेल्यावरुन वाद झालेल्या रुपाली वाघ या 28 वर्षीय विवाहितेचे दोन्ही हात धरले आणि विक्रमनेही कोणताच विचार न करता हातातला चाकू थेट तिच्या पोटात खुपसला. आपल्या वहिणीवरील चाकूहल्ला पाहून तिच्या मदतीला धावलेल्या नणंंदेवरही त्याने वार केल्याने त्यात मोनिका वाघ ही तरुणीही गंभीर जखमी होवून रक्ताच्या थारोळ्यात कोसळली.


या घटनेनंतर भानावर आलेल्या पडवळांनी तेथून धूम ठोकली, तर वाघ बंधूंनी जखमी झालेल्या दोन्ही महिलांना सुरुवातीला साकूरफाटा, त्यानंतर संगमनेरातील खासगी रुग्णालय आणि शेवटी प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या घटनेत रुपाली ज्ञानदेव वाघ (वय 28) या विवाहितेचा मृत्यू झाला असून मोनिकावर उपचार सुरु आहेत. या प्रकरणी मध्यरात्री फिर्याद दाखल झाल्यानंतर घारगाव पोलिसांनी कर्जुलेपठार येथील मुरलीधर रामृकृष्ण पडवळ, त्याचा मुलगा विक्रम व सून अलका या तिघांवर खुनासह खुनाचा प्रयत्न आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (अ‍ॅट्रोसिटी) गुन्हा दाखल करुन आज सकाळी तिघांनाही अटक केली आहे. त्यांना आज दुपारनंतर न्यायालयासमोर हजर केले जाणार असून पोलीस कोठडीची मागणी होणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास घारगावचे निरीक्षक विलास पुजारी करीत आहेत.


या प्रकरणाचा मागोवा घेताना खून झालेल्या विवाहितेच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. मोलमजूरी करुन उदरनिर्वाह करणार्‍या वाघ कुटुंबातील सात सदस्यांमध्ये चार महिला आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तरी उलटली असतानाही संगमनेरसारख्या प्रगत समजल्या जाणार्‍या तालुक्यात शौचास जाण्यावरुन एखाद्या महिलेचा बळी जावा खरेतर ही अतिशय लाजिरवाणी घटना आहे. प्रशासनाने त्याकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची आणि भविष्यात पुन्हा असा प्रकार घडणार नाही याची काळजी घेण्याची गरज आहे.


केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार स्थापन होवून 11 वर्ष झाल्याचा उत्सव सध्या देशभर सुरु आहे. काँग्रेसने सात दशकांच्या राजवटीत गरीबांना घरं, स्वच्छ पाणी आणि शौचालय ही पायाभूत सुविधाही दिली नाही, आम्ही कोट्यवधी गरीबांना त्याचा लाभ देवून हर घर शौचालय अभियान सर्वत्र पोहोचवल्याचा ढोलही भाजपकडून बडवला जात आहे, त्याचवेळी प्रगत म्हणवणार्‍या संगमनेर तालुक्यात स्वातंत्र्यानंतर आजही पाणी, रस्ता आणि वीज या पाठोपाठ आता शौचालयासारख्या मुलभूत गोष्टीही दूरच असल्याचे नवे उदाहरण समोर आले आहे. चार-चार आमदारांचे छत्र लाभलेल्या संगमनेर तालुक्यातील हे चित्र अतिशय धक्कादायक असून सरकारच्या कल्याणकारी योजना केवळ कागदावरच यशस्वी आहेत की काय अशीही शंका निर्माण झाली आहे.

Visits: 416 Today: 2 Total: 1104208

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *