मानोरी येथील शेतकर्याने नैराश्यातून पेटविला कांदा पंचनामे न केल्याने कांदा शेतातच गेला संपूर्णपणे सडून
नायक वृत्तसेवा, राहुरी
तालुक्यामध्ये एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतात काढलेला कांदा भिजल्याने संपूर्ण कांदा सडून गेला. तरी देखील शासनाने काढलेल्या कांद्याचे पंचनामे न केल्याने तो कांदा सडू लागल्याने मानोरी येथील शेतकर्याने नैराश्यातून या कांद्याची होळी करून शासन विरोधात तीव्र रोष व्यक्त केला आहे.
राहुरी तालुक्यातील मानोरी येथील शेतकरी अमोल विलास भिंगारे या शेतकर्याने तीन एकर उन्हाळी कांद्याचे पीक घेतले होते. मशागतीपासूनच त्यांनी पिकाची काळजी घेतली. सुरुवातीला दर्जेदार बियाणापासून रोपे तयार करून त्या रोपांची आपल्या शेतात मजुरांकडून लागवड केली. रासायनिक खते, महागडी औषधांची फवारणी व कांद्यातील खुरपणीसाठी वारेमाप खर्च केला. त्यामुळे कांदा पीक जोमदार आले. काढणीस आल्याने त्यांनी मजुरांना वाढीव मजुरी देऊन कांदा काढला. त्या कांद्याच्या शेतातच पोळी घालून तो पातीखाली झाकून ठेवला.
मात्र, दुर्दैवाने मागील महिन्यात अचानक अवकाळी पावसाने तांडव केल्याने शेतात असलेला हा कांदा भिजला. त्यानंतर त्यांनी हा कांदा उन्हात सुकविण्यासाठी ठेवला. अवकाळी पावसाने उघडीप दिल्यानंतर उशिरा जाग आलेल्या शासनाने पंचनाम्यांचा ‘फार्स’ सुरू केला. आता आपल्याही कांद्याचा पंचनामा होईल या आशेने भिंगारे यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. शासकीय आधिकारी शिवारात पंचनामे करीत असताना भिंगारे यांनी आपल्याही कांद्याचा पंचनामा करा, अशी त्यांना विनवणी केली.
मात्र, आम्हाला फक्त शेतात उभ्या असलेल्या पिकांचेच पंचनामे करण्याचे वरून आदेश असल्याचे सांगितले. त्यानंतर भिंगारे यांना हा भिजलेला कांदा फार काळ टिकणार नाही याचा अंदाज आल्याने तसेच कांद्याला वास सुटल्याने त्यांनी कांदा विक्रीचा निर्णय घेतला. त्यांनी मजुरांना बोलावून कांदा गोण्यांमध्ये भरण्यास सुरूवात केली असता जवळपास 90 टक्के कांदा सडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. फक्त 10 टक्केच कांदा सुस्थितीत असल्यामुळे ते पूर्णपणे हताश झाले. तीन एकराचा हा कांदा शेतातून बाहेर कसा काढायचा हा प्रश्न त्यांना पडला. कांद्याला भाव नाही, तीन एकर कांद्यासाठी आत्तापर्यंत जवळपास दोन लाख रूपये खर्च झाला. यातून त्यांनी नैराश्यातून कांद्याची पोळी पेटवून देऊन शासनाचा निषेध केला.
शेतात कादा असताना अवकाळी पाऊस झाल्याने कांद्याच्या गाभ्यात पाणी गेल्याने हा कांदा जागेवरच ‘बस्ट’ झाला आहे. तर काही जागेवरच सडला आहे, असा कांदा भुसार्यात भरण्यासाठी योग्य नसल्याने मिळेल त्या भावात म्हणजे पाच ते सहा रुपये किलोने विकला जात आहे. परंतु, हा कांदा व्यापार्यांनी खरेदी केल्यानंतर सडत असल्याने कांद्याचे भाव पडले असल्याचे सांगितले जात आहे. नाफेडची खरेदी सुरु झाल्यानंतर भाव वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे नाफेडने कांदा खरेदी करावा, अशी मागणी आता शेतकरी वर्गातून होत आहे.