साकूरच्या पेट्रोल पंपावर दरोडा घालणारे आरोपी जेरबंद! स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी; कोतवालीच्या हद्दीतील खुनाचाही झाला उलगडा..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या रविवारी (ता.26) घारगावमधील एका पंक्चर दुकान चालकावर सशस्त्र हल्ला करुन त्याची मोटारसायकल पळवून नेण्यासह साकूरमधील एका पेट्रोल पंपावर पिस्तुलाचा धाक दाखवून अडीच लाख रुपयांचा दरोडा घालण्यात आला होता. तिघा सशस्त्र दरोडेखोरांनी केलेल्या या कृत्यानंतर संपूर्ण पठारभागात दहशत निर्माण झालेली असताना अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा नेटाने तपास करीत तिघाही दरोडेखोरांना जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. त्यांच्या चौकशीतून कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या एका खून प्रकरणाचाही उलगडा झाला असून लवकरच या आरोपींना दोन्ही पोलीस ठाण्यांकडे सुपूर्द केले जाणार आहे. स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या या दमदार कारवाईचे जिल्ह्यातून कौतुक होत आहे.

गेल्या 26 फेब्रुवारी रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास एकाच मोटारसायकलवरुन तिघा सशस्त्र दरोडेखोरांनी सुरुवातीला
घारगावजवळील एका पंक्चर दुकानाच्या चालकावर चाकूने हल्ला करीत त्याला जखमी केले व नंतर त्याची मोटारसायकल घेवून तेथून पोबारा केला. या घटनेनंतर अवघ्या अर्धातासाच्या अंतराने याच तिघा दरोडेखोरांनी साकूर-मांडवे रस्त्यावरील आदिकराव खेमनर यांच्या भगवान पेट्रोलियम या पेट्रोलपंपावर दरोडा घातला. सुरुवातीला या तिघांनीही आपल्या ताब्यातील दोन्ही मोटारसायकलमध्ये पेट्रोल भरले व त्यानंतर थेट पंपावरील केबिनमध्ये घुसून तेथील दोघा कर्मचार्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून 2 लाख 50 हजार 747 रुपयांची रोकडे घेवून तेथून लंपास झाले. या घटनेनंतर स्थानिक घारगाव पोलिसांसह अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेनेही घटनास्थळी धाव घेत दोन्ही ठिकाणच्या प्रत्यक्षदर्शीकडून माहिती मिळवण्यासह उपलब्ध असलेल्या सीसीटीव्ही फूटेजचे विश्लेषण करुन आरोपींचा माग काढण्यास सुरुवात केली.

त्यातून राहुरी तालुक्यातील तिघांचा या प्रकरणात सहभाग असल्याची माहिती मिळाल्यानंतर गेल्या चार दिवसांपासून स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी ‘त्या’ तिघांच्याही मागावर होते. अखेर ते आपल्या घरी पतरल्यावर पोलिसांनी एकाचवेळी त्यांच्या घरावर छापा घालीत तिघांनाही जेरबंद केले आहे. सध्या ते तिघेही गुन्हे शाखेच्या ताब्यात असून त्यांच्याकडे केलेल्या चौकशीतून त्यांनी घारगाव येथील अनुदेव अनंत ओटुशेरी या टायरवाल्यावर चाकू हल्ला करुन त्याची मोटारसायकल व साकूर येथील पेट्रोल पंपावरुन अडीच लाखांची रोकड लांबविल्याची कबुली दिली आहे.

याशिवाय अधिकच्या चौकशीत गेल्यावर्षी अहमदनगरच्या कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बायपासवर झालेल्या खुनाच्या प्रकरणाचाही उलगडा झाला असून त्यात या तिघांचाच हात असल्याचेही उघड झाले आहे. अतिशय सराईत असलेल्या या तिघांच्या टोळक्याने जिल्ह्यात अजूनही अनेक गुन्हे केल्याचा पोलिसांना संशय असल्याने सध्या त्यांची नगरमध्ये कसून चौकशी सुरु आहे. त्यानंतर त्यांना घारगाव आणि तोफखाना पोलिसांकडे सोपविण्यात येणार आहे.

वाहतुकीच्या रस्त्यावरील पेट्रोलपंपावर दरोडा आणि त्यासाठी चक्क पिस्तुलाचा वापर झाल्याने पठारभागात दरोडेखोरांची मोठी
दहशत निर्माण झाली होती. मात्र स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या संपूर्ण प्रकरणाला गांभीर्याने घेत अवघ्या सहा दिवसांतच त्याचा तपास करीत तिघाही दरोडेखोरांना जेरबंद करण्यासह त्यांच्याकडून या प्रकरणासह खुनाचा प्रकारही उघड केल्याने जिल्ह्यातून शाखेच्या अधिकारी व कर्मचार्यांचे कौतुक होत आहे. अटक केलेल्या दरोडेखोरांची नावे व त्यांनी लांबविलेला मुद्देमाल याबाबत पोलिसांकडून अद्याप माहिती देण्यात आलेली नाही.

गेल्या काही वर्षात संगमनेर तालुक्याच्या विविध भागात चोर्या, घरफोड्या व दरोड्याच्या घटना घडूनही त्यांचे तपास लागत नव्हते. त्यामुळे एकीकडे नागरिकांमध्ये रोष तर पोलिसांमध्ये नैराश्याचे वातावरण तयार झाले होते. मात्र आता स्थानिक गुन्हे शाखेने साकूरमधील दरोड्याचा अवघ्या सहा दिवसांतच तपास लावून तिघाही दरोडेखोरांना जेरबंद करण्यात यश मिळवल्याने नागरिकांमध्ये समाधान निर्माण होण्यासह पोलिसांमध्येही उत्साह संचारला आहे.

