सामान्य व्यक्तीला कोट्यधीश करण्याची म्युच्युअल फंडात क्षमता ः कडलग ‘नव्या युगाचे आर्थिक व्यवस्थापन’ कार्यशाळेतून डॉक्टरांना आर्थिक साक्षरतेचे धडे
नायक वृत्तसेवा, संगमनेर
क्रिप्टो चा खेळ संपलेला आहे, कोणततीही गुंतवणूक असो त्याला नियमन, कायदे आणि सरकारी नियंत्रण आवश्यक असते. क्रिप्टो हा एक सट्टा आहे. त्यात गुंतवणूक करण्याऐवजी सामान्य व्यक्तीला कोट्यधीश करण्याची क्षमता असलेल्या म्युच्युअल फंडात दीर्घकालीन गुंतवणूक करा व आर्थिक महासत्ता म्हणून उदयास येत असलेल्या भारताच्या विकास यात्रेत सहभागी व्हा असा सल्ला एएमएफडी सुनील कडलग यांनी दिला.
नारायणगाव येथील हॉटेल सचिन एक्झिक्युटिव्ह कॉन्फरन्स हॉलमध्ये जुन्नर तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन तर्फे आयोजित नव्या युगाचे आर्थिक व्यवस्थापन या विषयावर ते प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करत होते. अध्यक्षस्थानी असोसिएशनचे व रोटरी क्लबचे प्रेसिडेंट डॉ. हनुमंत भोसले व प्रमुख अतिथी म्हणून सचिव डॉ. निलेश थोरात, एनजे वेल्थचे शाखाधिकारी शुभम कोळी, मनीष पवार, डीएसपी म्युच्युअल फंडाचे पीयूष कासट उपस्थित होते.
अभ्यासपूर्ण मार्गदर्शनात कडलग पुढे म्हणाले, जानेवारी 2023 मध्ये 40 लाख कोटींचा असलेला म्युच्युअल फंड उद्योग येत्या पाच ते सहा वर्षांमध्ये शंभर लाख कोटींचा होण्याची शक्यता आहे. शिवाय सद्यस्थितीत जगात पाचव्या क्रमांकाला असलेली भारतीय अर्थव्यवस्था ही येत्या काही वर्षांत तिसर्या क्रमांकाला असण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. भारत हा युवकांचा देश आहे. युवकांमध्ये खर्च करण्याची क्रयशक्ती आहे. त्यामुळे कंपन्यांच्या उत्पादनाची मागणी वाढत आहे. कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर नफा कमाविल्यास त्याचा फायदा गुंतवणूदारांना होईल. म्हणूनच ज्या देशात खर्च होतो तो देश संपत्ती निर्माण करतो. मंदीच्या पार्श्वभूमीवरही भारत जगामध्ये ब्राईट स्पॉट ठरतो आहे हे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने जाहीर केले आहे. म्हणूनच परदेशातूनही गुंतवणूक मोठ्या प्रमाणात भारतात येत आहे. कोरोना सारखी आपत्कालीन परिस्थिती कधीही निर्माण झाल्यास प्रत्येकाकडे आपत्कालीन निधीची व्यवस्था असायला हवी, त्यासाठी म्युच्युअल फंडातील लिक्वीड फंडस् उपयुक्त ठरू शकतो असेही ते म्हणाले.
भारतीय बँकांमध्ये साधारणतः 150 ते 170 लाख कोटींच्या बचत ठेवी आहेत. त्या तुलनेत म्युच्युअल फंडात मात्र फक्त 20 टक्केच रक्कम आहे. महागाईच्या तुलनेत अधिक परतावा देणार्या म्युच्युअल फंडाकडे सद्यस्थितीत गुंतवणुकीचा कल वाढत आहे. जानेवारी 2023 मध्ये प्रतिमहिना 14000 कोटींच्या एसआयपीचा ओघ शेअर बाजारात येत आहे म्हणून शेअर बाजाराला आता परदेशी गुंतवणूकदारांच्या दयेवर अवलंबून राहण्याचे कारण राहिलेले नाही हे मागच्या वर्षभरात सिद्ध झालेले आहे. याप्रसंगी डॉ. अनिल भोसले, डॉ. उत्तम घोरपडे, डॉ. अविनाश पोथारकर, डॉ. प्रवीण उगले, डॉ. अजित काकडे यांनी विचारलेल्या प्रश्नांना सुनील कडलग, शुभम कोळी, पीयूष कासट यांनी उत्तरे दिली. डॉ. मुक्तांजली पोथरकर यांनी मनोगत व्यक्त केले. असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. हनुमंत भोसले यांनी सन्मानचिन्ह देऊन सुनील कडलग यांचा सत्कार केला. प्रास्ताविक सचिव डॉ. निलेश थोरात यांनी तर सूत्रसंचालन डॉ. आनंद सराईकर यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ. कविता भोसले यांनी केले. डॉ. शशिकांत गुळवे, डॉ. मनोहर कवडे, डॉ. राजेश धुमाळ, डॉ. रामदास उदमले, डॉ. सुजाता गोर्डे आदी मान्यवर उपस्थित होते.