टाकळीभान येथील दुकानदाराच्या घरी धाडसी चोरी एक लाख रुपयांसह 8 तोळे सोन्याचे दागिने घेऊन पोबारा

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
तालुक्यातील टाकळीभान येथे चोर्यांचे सत्र सुरूच असून येथील बसस्थानक परिसरातील प्रकाश गाडेकर यांच्या घराच्या मागील बाजूचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर चोरट्यांनी कपाटातील एक लाख रुपये रोख रकमेसह 8 तोळे सोन्याचे दागिने, किमती साड्या असा पाच लाखांपेक्षा जास्त रकमेचा ऐवज चोरून नेला आहे.

प्रकाश गाडेकर यांचे बसस्थानक परिसरात श्रीरामपूर-नेवासा रस्त्यावर प्रिया ऑटोमोबाईल्सचे दुकान व राहण्याचे घर आहे. मंगळवारी (ता.14) रात्री अज्ञात चोरट्यांनी घराच्या मागील बाजूचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. घरात असलेल्या पर्समध्ये उचकापाचक केली असता पर्समध्ये कपाटाच्या चाव्या चोरांना सापडल्या. या चाव्यांच्या साह्याने चोरट्यांनी बैठक खोलीतील व स्वयंपाक खोलीतील कपाट उघडून कपाटाच्या तिजोरीतील सोन्याचे 8 तोळ्याचे दागिने व रोख रक्कम 1 लाख रुपये असा पाच लाखांचा ऐवज चोरून नेला आहे. सोबत दोन सुटकेस भरलेल्या किमती साड्याही नेल्या आहेत.
![]()
चोर आले तेव्हा गाडेकर कुटुंब गाढ झोपेत होते. प्रकाश गाडेकर व त्यांची पत्नी बेडरूममध्ये झोपले होते तर आई, आजी व मुले हॉलमध्ये झोपलेले होते. सकाळी हे कुटुंब झोपेतून उठल्यावर घरात चोरी झाल्याचे दिसून आले. चोरीची माहिती पोलिसांना दिल्यावर पोलीस घटनास्थळी आले व त्यांनी पाहणी केली. त्यानंतर तत्काळ श्वान पथकास पाचारण केले. श्वानाने येथील सोसायटीच्या मागील बाजूस वाडगाव रस्त्यापर्यंत माग काढला. याठिकाणावरून चोरटे वाहनाने पसार झाले असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. या चोरीपूर्वी चोरटे येथील विलास पटारे यांच्या वस्तीवर गेले व चोरीचा प्रयत्न केला. मात्र विलास पटारे जागे झाल्याने चोरटे निघून गेले. पटारे यांनी या परिसरात रहाणार्या नागरिकांना फोन करून चोर आल्याची माहिती दिली. त्यामुळे या परिसरातील सर्व नागरिक जागे झाल्याने इतर ठिकाणी कुठेही चोरीचा प्रकार घडला नाही. चार ते पाच दिवसांपूर्वीच येथील साईबाबा मंदिरावरील पितळी कळस चोरीला गेला असून घोगरगाव रस्त्यावरील वसंत कोकणे यांच्या घराजवळ असलेल्या भैरवनाथ मंदिरावरील 11 हजार रुपये किमतीच्या पितळी कळसाचीही चोरी झालेली आहे. श्रीरामपूर-नेवासा रोडवरील दुकानदारांचे आठ सीसीटीव्ही कॅमेरे चोरी झाले असून टाकळीभान येथे सुरू असलेल्या चोरीच्या सत्रामुळे ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.

यापूर्वी देखील टाकळीभान येथे अनेक लहान-मोठ्या चोर्या झालेल्या आहेत. मात्र अद्यापपर्यंत या चोरांचा तपास लावण्यात पोलिसांना अपयश आलेले आहे. पोलीस चौकीच्या हाकेच्या अंतरावर चोर्या करून चोरटे पोलिसांना वारंवार आव्हान देत असले तरी पोलिसांची तपासाची गती शून्य असल्याने पोलीस यंत्रणेविषयी नागरिकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
