कुत्र्याच्या किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबात जबर मारहाण मुलासह आई जखमी; घारगाव पोलिसांत चौघांवर गुन्हा दाखल


नायक वृत्तसेवा, घारगाव
शेतीचे वाद हे काही नवीन नाहीये. बांध कोरणे, जागा बळकावणे, शेतपिकाचे नुकसान करणे असे प्रकार नित्याचेच झाले आहे. मात्र, कुत्र्याने शेतातील डोंगळ्याचे नुकसान केल्याच्या कारणावरुन दोन कुटुंबात तुफान हाणामारी झाल्याचा प्रकार साकूर (ता.संगमनेर) शिवारातील चितळकर वस्ती येथे घडली आहे. याप्रकरणी घारगाव पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, साकूर शिवारातील चितळकर वस्ती येथील राहुल शिवाजी देवकाते यांनी आपल्या शेतात कांदा बी तयार करण्यासाठी डेंगळे लावलेले आहेत. या डोंगळ्याच्या शेतात संदीप भागा देवकाते यांचे कुत्रे येऊन नुकसान करत असल्याचे राहुल देवकाते यांनी पाहिले. यावरुन त्यांनी संदीप देवकाते यांना तुमचे कुत्रे बांधून ठेवा, ते शेतात येऊन नुकसान करत आहे असे सांगितले. याचा राग आल्याने संदीप याच्यासह अनिता संदीप देवकाते, विशाल संदीप देवकाते, चेतन संदीप देवकाते यांनी राहुल आणि आई लता यांना शिवीगाळ करुन लाथबुक्क्यांनी जबर मारहाण केली. तसेच संदीप व अनिता देवकाते यांनी लाकडी दांडक्याने आणि गजाने मारहाण केली तर विशाल व चेतन देवकाते यांनी दगड मारुन जखमी केले.

यात जखमी झालेले राहुल देवकाते यांनी थेट घारगाव पोलीस ठाणे गाठले आणि संपूर्ण हकीगत कथन केली. यावरुन पोलिसांनी संदीप भागा देवकाते, अनिता संदीप देवकाते, विशाल संदीप देवकाते, चेतन संदीप देवकाते या चौघांविरुद्ध गुरनं.68/2023 भादंवि कलम 324, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक जी. पी. लोंढे हे करत आहे.

शेतीच्या किरकोळ वादातून थेट खून होण्यापर्यंत घटना सतत घडत असल्याचे पाहायला मिळते. परंतु, कुत्रे शेतात येऊन नुकसान करत असल्याच्या कारणावरुन थेट दोन कुटुंबाचे वाद जबरी हाणामारीपर्यंत पोहोचल्याचा हा बहुधा या भागातील पहिला प्रकार आहे. त्यामुळे त्याची नागरिकांतही चांगलीच चर्चा होत आहे.

Visits: 174 Today: 2 Total: 1106836

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *