खासगी रुग्णालयांनी विनाकारण रुग्णांची लूट करू नये ः खा.लोखंडे
खासगी रुग्णालयांनी विनाकारण रुग्णांची लूट करू नये ः खा.लोखंडे
प्रांताधिकारी कार्यालयात घेतला तालुक्यातील कोरोनाचा आढावा
नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला तर त्याच्यावर योग्य उपचार होणे गरजेचे आहे. परंतु ज्याला खर्या अर्थाने ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची गरज आहे; त्यांना त्या सुविधा नक्की द्या. मात्र ऑक्सिजनच्या नावाखाली विनाकारण खासगी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी व्यवसाय करण्यासाठी रुग्णांची लुबाडणूक करू नये, अशी तंबी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी दिली.
संगमनेर शहरातील यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवनातील प्रांताधिकारी कार्यालयात तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आढावा घेण्यासाठी खासदार लोखंडे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीला प्रांताधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, मुख्याधिकारी डॉ.सचिन बांगर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुरेश घोलप, घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.भास्कर भवर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
सध्या किरकोळ लक्षणे असली तरी ऑक्सिजन लावण्याचे काम खासगी रुग्णालयांकडून होत आहे. यामधून रुग्णांची लूट केली जात असल्याची तक्रार पंचायत समितीचे विरोधी पक्षनेते अशोक सातपुते आणि शहर उपशहर प्रमुख रवी कानडे यांनी केली. त्यावर खासदार लोखंडे म्हणाले, खर्या अर्थाने ऑक्सिजनची गरज असेल तर नक्की द्या. डॉक्टरांनी कोरोनाच्या संकटात माणुसकी धर्म पाळावा. आणि रुग्णांना विनाकारण लुटत असेल तर त्यांच्यावर कारवाई करा असे सक्त आदेश खासदार लोखंडेंनी दिले. तसेच उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांबाबत त्यांनी संबंधित विभागांना सूचना केल्या.
घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील सोनाग्राफी मशीन अनेक दिवसांपासून बंद आहे, अशी सूचना दीपक साळुंके आणि शरद थोरात यांनी मांडली. त्यावर ग्रामीण रुग्णालयाचे सोनाग्राफी मशीन सन 2009 पासून बंद आहे ते चालू करणे शक्य नाही. परंतु ग्रामीण रुग्णालयात सोनोग्राफीसाठी आलेल्या रुग्णांना ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकार्यांच्या सहीची चिठ्ठी दिली तर शहरातील मान्यताप्राप्त सोनाग्राफी सेंटरमध्ये मोफत सोनाग्राफी केली जात असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ.भास्कर भवर यांनी खासदार लोखंडे यांच्या समक्ष सांगितले.