एका तपानंतर घारगाव पोलीस ठाण्याचे स्थान बदलले! ‘डोळासणे’ होणार पठारचे पोलीस ठाणे; सात वर्षांपूर्वीचा अखर्चित निधी वापरणार..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
मंजूरी मिळाल्यानंतर तब्बल बारा वर्ष भाड्याच्या जागेतून कारभार पाहणार्या पठारभागातील पोलीस ठाण्यासाठी आता स्वहक्काची जागा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्हाधिकार्यांनी याबाबतचा आदेश बजावला असून डोळासणे येथील राज्य सरकारची सुमारे 64 गुंठे जागा गृहविभागाला देण्यात आली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटीशांसाठी विश्रामगृह आणि घोड्यांची पागा असलेल्या या प्रशस्त जागेत आता डोळासणे पोलीस ठाण्याच्या इमारतीसह पोलीस अधिकारी आणि अंमलदारांची 33 निवासस्थानेही उभी राहणार आहेत. त्यासाठी सन 2015 सालीच शासनाने 5 कोटी 79 लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून त्यातून या इमारतींचे काम केले जाणार आहे. जवळपास बारा वर्षांच्या प्रतीक्षेनंतरही आवश्यक जागा उपलब्ध न झाल्याने सदरचे पोलीस ठाणे घारगावहून डोळासणे येथे हलविण्यात आले आहे.

जिल्ह्यातील सर्वात मोठे क्षेत्रफळ आणि लोकसंख्या असलेल्या संगमनेर तालुक्यात कधीकाळी शहर आणि तालुका अशी दोन
पोलीस ठाणी होती. त्या माध्यमातून पूर्व-पश्चिम सुमारे 38 किलोमीटर तर दक्षिण-उत्तर सुमारे 50 किलोमीटर पसरलेल्या संगमनेर तालुक्याची शांतता व सुव्यवस्था कायम राखण्याचे काम पोलीस दलाकडून केले जात. भौगोलिक दृष्टीकोनातून संगमनेर तालुक्यातील 46 गावे आणि वाड्या-वस्त्या वरच्याभागात म्हणजे पठारभागात आहेत. आणि हा संपूर्ण भाग लांबलचक क्षेत्रात पसरलेला असल्याने पठारावरची सुव्यस्था राखण्याचे महादिव्य पोलिसांना पार करावे लागत. त्यासाठी उपाय म्हणून घारगाव येथे पोलीस दूरक्षेत्र कार्यान्वित करण्यात आले होते. मात्र त्यातून पठारभागातील चोर्या, दरोडे व अन्य असामाजिक कृत्यांवर नियंत्रण मिळवण्यात पोलीस सतत अपयशी ठरल्याने पठारभागासाठी स्वतंत्र पोलीस ठाण्याची मागणी होवू लागली.

त्यामुळे राज्य सरकारने संगमनेर तालुक्याचा सखोल अभ्यास करुन संगमनेर शहर व संगमनेर तालुका या दोन पोलीस ठाण्यांशिवाय तालुक्यासाठी नव्याने आश्वी व घारगाव पोलीस ठाण्यांना बारा वर्षांपूर्वी मंजुरी दिली. आश्वी पोलीस ठाण्यासाठी आवश्यक असलेली जागा उपलब्ध झाली, मात्र घारगावसाठी 2010 सालापासून जो संघर्ष सुरु झाला, तो आजवर कायम होता. जागाच उपलब्ध होत नसल्याने गृहविभागाने अखेर अगदी मुळा नदीच्या काठावर जलसंपदा विभागाच्या जलमापक केंद्राची जागा मिळवली. मोडकळीस आलेल्या या इमारतीतूनच 2010 साली तत्कालीन पोलीस निरीक्षक रविंद्र तायडे यांनी घारगाव पोलीस ठाण्याचे कामकाज सुरु केले. 16 जून, 2011 रोजी तत्कालीन शहर निरीक्षक वसंत तांबे यांची घारगावला बदली झाली आणि पहिल्यांदा त्यांनी स्वखर्चातून या इमारतीची डागडूजी आणि रंगरंगोटी केली.

तेव्हापासून याच इमारतीत पठारभागाची शांतता व सुव्यवस्था राखण्याचे काम सुरु आहे. दरम्यानच्या कालावधीत 2014 साली
अनिल नलावडे यांनी घारगावचा पदभार स्वीकारला. त्यांच्याच कारकीर्दीत 13 जुलै, 2015 रोजी घारगाव पोलीस ठाणे व तेथे कार्यरत तीन अधिकार्यांसह 30 कर्मचार्यांसाठी निवासस्थानांचे काम करण्यासाठी 5 कोटी 79 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला. मात्र इमारती बांधण्यासाठी जागेचीच वाणवा असल्याने तेव्हापासून सदरचा निधी अखर्चित असून आजही पडून आहे. गेल्या बारा वर्षांच्या कालावधीत या पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावणार्या बहुतेक सर्वच अधिकारी व कर्मचार्यांनी मोठ्या महद् प्रयासाने आपली सेवा बजावली. या दरम्यान त्यांना नदीपात्रातून बाहेर पडणारे विविध विषारी व बिनविषारी सर्प, अजगर व अन्य श्वापदांचाही अनुभव मिळाला.

गेल्या महिन्यात 19 फेब्रुवारी रोजी संगमनेरातील सीसीटीव्ही कॅमेर्यांच्या लोकार्पणाचा कार्यक्रम पार पडला. त्याच दिवशी या
अखर्चित निधीबाबत दैनिक नायकने सविस्तर वृत्त प्रसिद्ध करताना जागेअभावी घारगावमध्ये कार्यरत असलेल्या पोलिसांचा संघर्ष मांडला. सदरचे वृत्त लोकार्पण सोहळ्याचे अतिथी असलेले राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्यासमोर आल्यानंतर या प्रकरणाने अधिक वेग घेतला. संगमनेरच्या प्रांताधिकार्यांनीही पठारावरील पोलीस ठाण्यासाठी व अंमलदारांच्या निावासस्थानासाठी डोळासणे येथील राज्य सरकारच्या सर्व्हे नं.382 मधील 0.64 आर. (64 गुंठे) जागेबाबतचा सविस्तर अहवाल जिल्हाधिकार्यांना पाठविला. त्यांच्या या अहवालाला मंजुरी मिळाली असून पुणे-नाशिक महामार्गाच्या अगदी लगतच डोळासणे शिवारात असलेल्या स्वातंत्र्यपूर्व काळातील तत्कालीन विश्रामगृह व घोड्यांच्या पागेची जागा आता पोलीस ठाणे व निवासस्थानांसाठी देण्यात आली आहे. सदरच्या सर्व्हे नंबरमध्ये शासनाची एकूण 83 गुंठे जागा असून त्यातील 19 गुंठे जागा महामार्ग प्राधिकरणाच्या पुणे विभागाकडे आहे, तर उर्वरीत 64 गुंठे जागा महसूल विभागाच्या अखत्यारित आहे, हिच जागा आता पोलिसांना देण्यात आली आहे. या बांधकामासाठी निधीची तरतूद होवून तब्बल सात वर्षांचा कालावधी लोटला आहे. आता त्यासाठी जागाही उपलब्ध झाल्याने लवकरच पठारभागासाठी नव्याने डोळासणे पोलीस ठाणे उभे राहील असे चित्र दिसू लागले आहे.

तालुक्याच्या पठारभागात गुन्हेगारी घटनांची संख्या खूप मोठी आहे. डोळासणे हे केंद्र पठारच्या मधोमध असून पूर्वी ब्रिटीश येथील विश्रामगृहातूनच आसपासच्या भागावर लक्ष्य ठेवीत असत. त्यामुळे येथील पोलीस ठाणे महामार्गालगत असण्यासोबतच पठारावरील 46 गावे व 30 वस्त्यांमध्ये विखुरलेल्या सुमारे 92 हजार लोकसंख्येसाठी मध्यवर्ती ठिकाण म्हणून सोयीचे ठरेल. यापूर्वी पोलीस दलाने पोलीस ठाण्यासाठी आंबी खालसा येथीलही जागेची पाहणी केली होती, मात्र ती जागा वनविभागाची असल्याने त्याच्या मंजुर्या मिळवण्यातच दमछाक झाली असती. पर्यायाने डोळासणे येथील जमीन महसूल विभागाच्या ताब्यात असल्याने त्याबाबतचा वापर करार करण्यास कोणतीही अडचण येण्याची शक्यता दुर्मिळ आहे.

पूर्वीचे घारगाव पोलीस ठाणे अगदी मुळा नदीच्या काठीच असल्याने गेल्या बारा वर्षात पोलीस ठाण्याला कधीही पाण्याची चणचण भासली नव्हती. मात्र आता सदरचे पोलीस ठाणे डोळासणे येथे स्थलांतरीत होणार असल्याने व डोळासणे म्हणजे दुष्काळाला नेहमीच बळी पडणारे ठिकाण असल्याने एक तप पाण्याचा सुकाळ अनुभवणार्या पोलिसांना डोळासणे पोलीस ठाण्यात आणि आपल्या निवासस्थानात पाण्यासाठी मात्र संघर्ष करावा लागणार आहे. या पोलीस ठाण्याच्या बांधकामासोबतच तेथील पाण्याचा प्रश्नही सोडविला गेला तर भविष्यात या पोलीस ठाण्याचे प्रश्न शिल्लक राहणार नाहीत.

